कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लहान मुलांच्या पालकांमध्ये मुलांच्या आरोग्याविषयी अधिक चिंतेचे वातावरण पाहायला मिळते. शाळा ते खेळाचे मैदान अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी मुलांचा वावर असतो. त्यामुळेच आपल्या मुलाला कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पालकांनी विशेष काळची घेणे गरजेचे आहे.

याच पार्श्वभूमीवर ‘एक्स्प्रेस पॅरेंटींग’ने बालरोग तज्ज्ञ डॉ. विजय जोशी यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याकडून याविषयाची माहिती जाणून घेतली.

घाबरून न जाता वेळीच योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. सर्वात महत्वाचे म्हणजे वीस सेकंद हात स्वच्छ धुणे, यात हाताची मागील बाजू, बोटांमधल्या बेचकळ्या आणि नखांच्या खालील भाग स्वच्छ धुण्याचा सल्ला त्यांनी दिला. साबण आणि पाण्याने अथवा ‘हॅण्डरब’ने (अल्कोहोलयुक्त) हात व्यव्स्थित धुवावे असेदेखील ते म्हणाले. मुलांना योग्यप्रकारे हात धुवायला शिकवा. हाच मुलांना प्रादुर्भावापासून दूर ठेवण्याचा प्राथमिक पातळीवरील उत्तम मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळेत काय काळजी घ्यावी

शाळेतदेखील मुलांनी अशाचप्रकारे हात धुवावे असा सल्ला देत शाळेतील इतरांशी जास्त जवळीक न साधता शक्यतो एकमेकांना स्पर्श करणे टाळावे. जर कोणामध्ये सर्दी-पडसे आथवा कोरोनासंबंधी लक्षणे दिसली तर याबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. कोरोनाबाधीत व्यक्तिच्या हातांना स्पर्श केल्यास कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या देशात प्रवास करून आलेल्या कुटुंबाने अन्य कोणाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून दक्षतेच्या कारणास्तव मुलांना काही काळासाठी शाळेत पाठवू नये, असा सल्ला डॉ. जोशी यांनी दिला. तसेच मुलामध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास योग्यती वैद्यकीय मदत घ्यावी असे ते म्हणाले.

शाळांनीदेखील मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेतील टेबल, बेंच, लादी आणि दरवाजे साबण अथवा सॅनिटायझरचा वापर करून स्वच्छ करावेत. खोकला अथवा शिंक आल्यास कशाप्रकारे काळजी घ्यावी हेदेखील मुलांना शिकवावे. खोकतांना अथवा शिंकताना तोडांसमोर रुमाल धरण्याचे महत्व मुलांना पटवून सांगवे, असा सल्ला त्यांनी दिला.

प्रवासादरम्यान काय काळजी घ्यावी

संपुर्ण कुटुंबाने प्रवासादरम्यान हात स्वच्छ धुवावे, स्वच्छ आणि चांगल्या हॉटेलमध्ये राहावे, स्वच्छ ठिकाणीच खावे, असे ते म्हणाले. उत्तमरित्या शिजवलेले गरम अन्नच खाण्याला प्राधान्य द्या. मांसाहार करत असाल तर विशेष करून ही काळजी घ्याच. कोरोनाचे विषाणू प्राण्यांमध्ये आढळून आल्याने उत्तमरित्या शिजवलेले अन्न खाण्यावर त्यांनी भर दिला.

बर्थ-डे पार्टी अथवा शिकवणीला जाताना

मुलामध्ये सर्दी-पडशाची लक्षणे दिसल्यास अथवा कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या देशात प्रवास करून आलेल्या कुटुंबाने अन्य कोणाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून स्वत:च्या मुलाला अशा पार्टीच्या ठिकाणी अथवा शिकवणीला पाठवू नये. कोरोनाचा प्रदुर्भाव झालेल्या मुलांच्या पालकांनी मुलांना गर्दीच्या ठिकाणी न पाठवता विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तसेच तातडीने योग्यती वैद्यकीय मदतदेखील घ्यावी. ज्या मुलांना कोरोनाची बाधा झाली नाही, त्यांनी नेहमी स्वच्छ हात धुवावे, तसेच खोकताना अथवा शिंकताना तोंडासमोर रुमाल धरावा, असा सल्ला डॉ. जोशी यांनी दिला.

Story img Loader