सरकारतर्फे लवकरच गर्भप्रतिबंधक लस उपलब्ध करण्यात येणार आहे. लवकरच या लसीची वैद्यकीय महाविद्यालये आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये माहिती देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती लोकसभेमध्ये देण्यात आली.
केंद्रीय आरोग्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी याबाबत विस्तृतपणे बोलताना सांगितले. सरकारतर्फे गर्भप्रतिबंधक लस लोकांसाठी उपलब्ध करण्यात येणार असून याची माहिती टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. प्रथम जिल्हा रुग्णालये, मग उपजिल्हा रुग्णालये, सामाजिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे अशी ही माहिती देण्यात येणार आहे. त्यांनी सांगितले की, सध्याच्या अर्थसंकल्पात गर्भनिरोधाबाबत चांगल्या प्रकारे काळजी घेण्यात यावी म्हणून ७७६६५.४५ लाख इतक्या रकमेची तरतूद केली आहे. दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, कुटुंबनियोजनामध्ये सुधारणा व्हावी म्हणून शासनाकडून नवीन उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये नवे गर्भनिरोधक जसे गर्भप्रतिबंधक लस, गर्भनिरोधक गोळ्या असे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यांनी असेही सांगितले की, निरोधांची मागणी वाढावी यासाठी त्याच्यामध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांमधून जनजागृती आणि नसबंदी योजनेची व्याप्ती ११ राज्यांमध्ये वाढवली आहे. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘आशा’ कामगारांकडून गर्भनिरोधासाठी घरपोच सुविधा पोहोचविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)