हळदीच्या औषधी गुणधर्मांमुळे वर्षानुवर्षे अनेक पदार्थांमध्ये आपण त्याचा वापर करतो. आरोग्यासाठी हळद खूप फायदेशीर मानली जाते. सौंदर्य खुलवण्यासाठी, रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. अनेक लहान-मोठ्या आजारांवर हळद गुणकारी मानली जाते. पण अशा बहुगुणी हळदीचे दूध गरोदर महिलांसाठी फायदेशीर ठरते का हे डॉक्टरांकडून जाणून घेऊ…
हळदीमधील औषधी गुणधर्म
हळदीमध्ये मॅग्नेशियमचे आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासह शरीरातील अवयवांचे संतुलन राखण्यास मदत होते. हळदीमधील कर्क्युमिन घटकामुळे जळजळ कमी करीत फुफ्फुसांचे कार्य सुधारायला मदत होते. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असतात, जे वेगवेगळ्या बॅक्टेरियांच्या वाढीस प्रतिबंध करतात. तसेच अनेक संक्रमणांपासूनही शरीराचे संरक्षण होते. यात कर्करोगाविरोधात लढण्यासाठी काही उपयुक्त घटक असतात. ताप, सर्दी, खोकल्यावर हळद हा रामबाण उपाय आहे.
हेही वाचा : तुमच्याही हाताची त्वचा निघतेय का? मग जाणून घ्या त्यामागची कारणे आणि घरगुती उपाय
हळदीचे दूध गर्भवती महिलांसाठी फायदेशीर?
डॉक्टर राम्या काबिलन यांनी आपल्या ‘इन्स्टाग्राम’ अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी गर्भवती महिलांसाठी हळदीचे दूध फायदेशीर आहे की नाही या संदर्भात मार्गदर्शन केले आहे. डॉ. राम्या काबिलन यांनी म्हटले की, , गर्भवती महिलांनी हळद घातलेल्या दुधाचे कमी प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पण याचे प्रमाण जास्त झाल्यास बाळाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. डॉ. काबिलन यांच्याच मताला सहमती दर्शवत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरुची देसाई यांनीसुद्धा हेच सांगितले आहे. त्यासोबत त्यांनी इतरही अनेक फायदे सांगितले आहेत.
गरोदर महिलांसाठी हळदीचे दूध पिण्याचे फायदे-
हळदीचे दूध हे एक आरोग्यदायी पेय मानले जाते. यामुळे प्रचनक्रिया सुधारण्यास मदत होते. गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदलत असतात, यामुळे सांधेदुखी आणि पाय सुजतात, पण यावर हळदीचे दूध हा एक रामबाण उपाय मानला जातो. यासह विविध आजारांविरोधात रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध उपयुक्त ठरते. अनेक गर्भवती स्त्रियांना पचनासंबंधित समस्या जाणवतात, या वेळी योग्य प्रमाणात हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, गरोदर महिलांनी हळदीच्या दुधाचे सेवन हे योग्य प्रमाणात करणे गरजेचे आहे, नाही तर गर्भातील बाळाला याचा त्रास होऊ शकतो.