अमेरिकी संशोधकांचे मत ’ पौष्टिक भाजीपाल्याचे सेवन करण्याचा सल्ला
गर्भवती महिलांना बटाटय़ाचे अतिरिक्त सेवन टाळावे. कारण त्यामुळे गर्भधारणेचा मधुमेह होण्याची दाट शक्यता असते, असे अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी सांगितले. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ (एनआयएच)च्या अभ्यासकांनी बटाटय़ाऐवजी अन्य पौष्टिक भाजीपाल्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय विविध कडधान्ये किंवा धान्याचे सर्व प्रकार हे गर्भधारणेच्या मधुमेहाची मात्रा काही अंशी कमी ठेवण्यास उपयुक्त ठरत असल्याचेही म्हटले आहे.
गर्भधारणेचा मधुमेह हा गर्भवस्थेच्या कालावधीतील सामान्य अशी समस्या आहे, जी मातेच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढविण्यास कारणीभूत ठरते, तसेच त्यातील विस्कळीतपणा हा भविष्यात माता आणि तिच्या मुलाच्या आरोग्यालाही हानीकारक ठरू शकतो. नवे संशोधन हे गर्भधारणेच्या मधुमेहाला कारणीभूत असणाऱ्या अशाच काही अन्नघटकांशी निगडित आहे. ज्यांच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढते आणि त्यातूनच पुढे गर्भधारणेचा किंवा दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहाची शक्यता अधिक बळावत असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदवले आहे.
नव्या संशोधनाच्या पूर्वी बटाटय़ांचे सेवन करणे हा सर्वसामान्य आहाराचा भाग मानला जात होता. तसेच याच घटकामुळे गर्भधारणेचा मधुमेह होतो हेही समोर आलेले नव्हते. एनआयएचएसचे अभ्यासक इयुनिस केनेडी श्रीवर नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ चाइल्ड हेल्थ अ‍ॅन्ड ह्य़ुमन डेव्लपमेंन्ट आणि हार्वड युनिव्हर्सिटीने आरोग्य अभ्यास २ अंतर्गत जवळपास १५ हजार परिचारिकांचे अध्ययन केले. त्यानी १९९१ ते २००१ दरम्यान बाळंतपणाच्या पूर्वाधात कोणताही आजार किंवा गर्भधारणेच्या काळात मधुमेहाची लक्षणे नसलेल्या महिलांचे परिक्षण केले. दर चार वर्षांनी या महिलांच्या आहारात गेल्या वर्षांभरातील सेवन केलेल्या अन्नाबाबतची माहिती संकलित करण्यात आली. तर महिलांनी बटाटय़ाचे सेवन भाजून , उकडून, चिरून, तळून किंवा बटाटय़ाच्या चिप्स् स्वरूपात खाल्ल्याची विचारणादेखील करण्यात आली. या वेळी कधीच नाही, दिवसातून सहा वेळा किंवा त्यापेक्षाही जास्त वेळा सेवन केल्याची उत्तरे त्यांना मिळाली. संशोधकांना अशा महिलांमध्ये गर्भधारणेच्या मधुमेहाची लक्षणे अधिक आढळून आली ज्यांनी बटाटय़ाचे सेवन अधिक प्रमाणात केले होते. तर दुसरीकडे दर आठवडय़ाला अन्नाबरोबर दोन बटाटय़ाचे सेवन करणाऱ्या महिलांमधील गर्भधारणेच्या मधुमेहाची तीव्रता कमी असल्याचे त्यांना दिसून आले. साधारणपणे दर आठवडय़ाला दोन बटाटय़ांसोबत अन्य भाजीपाला व कडधान्याचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये हे प्रमाण जवळपास १० टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले.
अभ्यासकांनी या संशोधनातील कारणे आणि परिणाम हे स्पष्टपणे मांडण्यात आली नसल्यामुळे गर्भधारणेच्या वेळी होणाऱ्या मधुमेहाला बटाटय़ाचे सेवनच कारणीभूत आहे असा दावा शंभर टक्के खरा असण्याला मर्यादा असल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा