पोटभर जेवण करून तृप्त झाल्यावर ढेकर येतोच. पण एखाद्याला असे सारखेच ढेकर येत असतील तर? आणि ते सुद्धा अतिशय करपट असतील तर? अशा करपट ढेकरांचा अर्थ असतो की तुमचे पोट बिघडले आहे. अशा वेळेस खालीलपैकी एखादी गोष्ट नक्कीच तुमच्या बाबत घडलेली असते.तुम्ही गरजेपेक्षा जास्त प्रमाणात जेवला आहाततुमच्या पचनशक्तीला जड पडतील असे पदार्थ तुम्ही खाल्ले आहेत.तुमच्या जठराच्या आतल्या अस्तरावर सूज आली आहेतुम्ही जेवताना पाणी अजिबात पीत नाहीतुम्ही खूप प्रमाणात चहा, कॉफी, कोलड्रिंक्स घेताअनेक दिवस तुम्ही मद्यसेवन करता आहात तुम्ही बरेच दिवस उपवास करता आहात.
ढेकरा येण्याची तीन मुख्य कारणे
१. जेवताना गिळलेली हवा- तुम्ही जेवताना अन्नाबरोबर हवासुध्दा गिळता. दोन घासांमध्ये सतत पाणी पिण्याची सवय असेल तर असे नक्की होते.तुम्ही ज्यातून गॅस किंवा वायू निर्माण होतो असे पदार्थ किंवा पेये जास्त घेता. उदा. शीत पेये, कोला पेये. विशेषतः ग्लासातून ते पिण्याऐवजी स्ट्रॉ वापरून प्यायल्यास हा त्रास जास्त होतो.
२. पोटात हवा निर्माण करणाऱ्या गोष्टी खाणे- मसालेदार पदार्थ, वाटाणा, हरभरा खाल्ल्यास अनेकांना जास्त ढेकर येतात.
३. पचनसंस्थेचा विकार असणे- हायपर अॅसिडिटी, पेप्टिक अल्सर, गॅस्ट्रोपॅरेसिस हा जठरातील अन्न पुढे न ढकलला जाण्याचा आजार, पित्ताशयातील खडे आणि क्वचित प्रसंगी अन्ननलिकेचा कर्करोग अशा आजारात ढेकरांचे प्रमाण वाढते.
करपट ढेकर म्हणजे ढेकरेमध्ये पोटात अन्नामधून तयार होणारे दुर्गंधीयुक्त वायू मिसळले जातात.
टाळण्यासाठी काय कराल?
१. खाणे आणि पिणे सावकाश होऊ द्यात. भरभर खाण्याने हवा जास्त गिळली जाते.
२. जेवताना तोंडात घास असताना बोलू नका.
३. जेवताना पाणी पिऊ नये, त्या ऐवजी जेवण झाल्यावर अर्ध्या तासाने ग्लासभर पाणी प्या.
४. च्युईंगम्स, थंड पेये, बीअर, सोडा टाकून घेतलेले मद्य वर्ज्य करा
५. शीतपेये, फळांचे रस, शहाळे स्ट्रॉ वापरून पिण्याऐवजी ग्लासमध्ये ओतून प्या.
६. धूम्रपान टाळा. यात तोंडातून छातीत धूर भरून घेताना तो नकळत पोटातसुध्दा प्रवेश करत असतो.
७. ज्यांना दातांची कवळी बसवलेली आहे, त्यांनी ती सैल तर होत नाही ना याची खात्री करून घ्यावी. सैल कवळीमुळे खाताना जास्त हवा पोटात जाते.
८. ताणतणावांचे नियोजन करा. तणावाखाली असलेल्या व्यक्तींमध्ये हवा गिळण्याचे प्रमाण जास्त असते.
९. घरी बनवलेला समतोल आणि पौष्टिक आहार घ्या. जंक फूड्स, मसालेदार खाणे, हातगाडीवरील पदार्थ यामुळे पोट बिघडण्याचे प्रमाण वाढते.
१०. दिवसातून फक्त दोनदा भरपूर जेवण घेण्याऐवजी, चार-चार तासांनी थोडे थोडे खा. पूर्ण उपाशी राहू नका.
११. आवश्यक ती विश्रांती आणि ७ तास झोप घ्या.
१२. जेवल्यावर लगेच आडवे होणे टाळा. जेवल्यावर शतपावली करण्याची सवय लावा. त्यामुळे अन्नपचन तर होतेच आणि असे ढेकर येत नाहीत.
१३. सतत पित्त, छातीत जळजळ होत असेल, ढेकर येण्यापूर्वी पोटात दुखत असेल, ढेकर छातीत अडकून मग सुटत असेल, ढेकर आणि पोटदुखी किंवा छातीत दुखणे असे त्रास होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
१४. पोट साफ होत नसेल तर सकाळी उठल्यावर एक ते दीड ग्लास पाणी प्या. जाहिरातींवर विश्वासून बाजारू लॅक्सेटिव्हज घेऊ नयेत. वैद्यकीय सल्ला घ्या.
डॉ.अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन