आपल्या शरीराने आणि हृदयाने अपेक्षेप्रमाणे काम करावं असं वाटत असेल, तर त्याला चांगली झोप हवीच. दीर्घकाळ निद्रानाशाचा विकार असेल तर त्याचा आपल्या हृदयावर परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयाशी निगडीत विकार होण्याची शक्यता असल्याचे काही अभ्यासातून पुढे आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपलं झोपेचं चक्र टप्प्यांमध्ये विभागलेलं असतं. हलक्या झोपेपासून गाढ झोपेपर्यंत आणि नंतर पुन्हा हलक्या झोपेकडे. आपलं शरीर गाढ झोपेच्या टप्प्यात शिरण्यासाठी स्वत:ला सज्ज करतं, तेव्हा हृदयाची गती आणि रक्तदाब कमी होतो. याच काळात आपलं शरीर इंद्रियांना आवश्यक असलेली विश्रांती देऊन स्वत:ला पुन्हा ताजंतवानं करतं. येणारा दिवस आपण चांगल्या पद्धतीने सक्रिय राहावे यासाठी रक्तदाब आणि हृदययाची गती कमी होणं आवश्यक असतं. मात्र गाढ झोपेच्या टप्यात झोपमोड झाली तर हृदयाच्या विश्रांतीचा काळ कमी होतो.

पुरेशी झोप न मिळाल्यास निद्रेला तिच्या या महत्त्वाच्या टप्प्यांतून जाण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे तुम्ही झोपेत असताना तुमच्या आरोग्याची नव्याने बांधणी करण्याचे काम सुरू असते त्यात बाधा येते. पुरेशी झोप झाली नाही तर शरीरात जळजळ वाढते. याची परिणती गंभीर स्वरूपाच्या हृदयाच्या तक्रारींमध्ये होऊ शकते.

याशिवायही अनेक समस्या उद्भवतात. सतत झोप न मिळणे किंवा पुरेशी झोप न झाल्याने दिवसा तणावाचा सामना करावा लागतो, वाढत्या तणावाला प्रतिक्रिया देत राहिल्याने तसेच चिंतेमुळे शरीरात अतिरिक्त कार्टिसोल हार्मोनची निर्मिती होते. हा हार्मोन, तणावाचा हार्मोन म्हणूनही ओळखला जातो. तुम्हाला रात्री नीट झोप लागत नाही, तेव्हा तुम्हाला दिवसभर झोप येत राहते. अनेक दिवस झोप अपुरी राहिल्यास एक कायमची आळशी भावना मनात निर्माण होते आणि त्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते. याउलट नियमित व्यायाम केल्याने कोलस्टेरॉलची पातळी कमी होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.

काय उपाय कराल?

दिनक्रमाचे पालन करा: तुमच्या झोपेच्या वेळेनुसार वेळापत्रक निश्चित करा आणि त्याचे पालन करा. फोन, गॅझेट्स किंवा रात्री उशिराच्या टीव्ही मालिकांसारखी प्रलोभनं दूर ठेवा. वेळेवर आणि चांगल्या झोपेची सवय लावून घेण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करा.

व्यायाम: कोणत्याही प्रकारची शारीरिक हालचाल शरीरासाठी चांगली, हे तर सर्वांना माहीत आहेच. कार्डिओ व्यायाम आठवड्यातून किमान चार वेळा किंवा एक दिवसाआड करा. जॉगिंग, पोहणे, सायकलिंग आणि साधे चालणे यांसारखे कार्डिओ व्यायाम तुमच्या हृदयाची गती वाढवून त्याचे कार्य चांगले राहण्याची काळजी घेतात.

निद्रातज्ज्ञाचा सल्ला घ्या: एवढे करूनही तुम्हाला झोपेसंबंधीत अडचणी असतील आणि तुम्हाला हृदयविकाराचा धोका असल्याची काळजी सतावत असेल, तर निद्रातज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्हाला रात्री नक्की कोणती गोष्ट जागं ठेवते हे कदाचित डॉक्टरांशी बोलल्याने समजू शकेल.

डॉ. प्रीती देवनानी, स्लीप थेरपिस्ट, स्लीप@10 – आरोग्य जागरूकता उपक्रम

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Problems related to sleep side effects of insufficient sleep