Promise Day 2024: दरवर्षी १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात येतो. व्हॅलेंटाईन डेच्या काही दिवसांपूर्वी व्हॅलेंटाईन वीक साजरा होतो. सगळ्यात पहिला ७ फेब्रुवारीला रोज डे, ८ फेब्रुवारी प्रपोज डे, ९ फेब्रुवारी चॉकलेट डे, त्यानंतर १० फेब्रुवारी टेडी डे, ११ फेब्रुवारी प्रॉमिस डे, १२ फेब्रुवारी हग डे, १३ फेब्रुवारी किस डे आणि सगळ्यात शेवटचा खास दिवस म्हणजे १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. प्रत्येक जण हे खास दिवस त्यांच्या आवडत्या व्यक्तींबरोबर अनोख्या पद्धतीत साजरा करताना दिसून येतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रॉमिस डे इतिहास आणि महत्त्व :

तर जोडीदाराला गुलाब देऊन, मनातील भावना व्यक्त करून, भेटवस्तू म्हणून टेडी दिल्यावर येणारा खास दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे. प्रॉमिस डे दरवर्षी ११ फेब्रुवारीला साजरा केला जातो. यंदा हा दिवस रविवारी म्हणजे उद्या साजरा केला जाईल. जोडीदाराला किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीला एकत्र आयुष्य घालविण्याचे वचन देणे तुमच्या नात्याला आणखीन सुंदर बनवते. नात्यात दिलेले हे सुंदर वचन तुमचा जोडीदार किंवा तुमची आवडती व्यक्ती तुमच्या आयुष्याच्या प्रवासात नेहमी बरोबर आहे याची वेळोवेळी जाणीव करून देते. तुमच्या नात्याची सुरुवात केव्हा, कधी झाली याचे एक सुंदर पत्र लिहून तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीलाही देऊ शकता. त्यामुळे हा दिवस एखाद्याला तुमच्या आयुष्यातले महत्त्व पटवून देण्यासाठी खास मानला जातो.

प्रॉमिस म्हणजे एखाद्याला व्यक्तीला विश्वासाने दिलेले वचन. हे वचन फक्त तुम्ही प्रियकर आणि प्रेयसीला न देता, तुमच्या खास मित्र-मैत्रिणी (बेस्ट फ्रेंड्स), तुमचे भाऊ-बहीण किंवा आई-वडिलांना तर स्वतःलासुद्धा देऊ शकता. जर २०२४ या वर्षासाठी तुम्ही स्वतःला काय वचन देऊ शकता हे पाहू…

जर तुम्ही प्रॉमिस डे हा दिवस एखाद्या खास पद्धतीने साजरा करू इच्छित असाल, तर तुम्ही पुढीलप्रमाणे काही वचने (प्रॉमिस) स्वतःला द्या.

१. मनात कोणत्याही गोष्टीचा राग न ठेवण्याचे वचन : तुमच्या कामाचे कौतुक केले नाही, फिरायला जाताना तुमच्या मैत्रिणींनी तुम्हाला बोलावले नाही, तर या गोष्टींचा राग मनात ठेवू नका. स्वतःला वचन द्या की, तुम्ही कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता, स्वतःचे काम प्रामाणिकपणे कराल आणि चेहऱ्यावर नेहमी हास्य ठेवाल.

२. दिवसातून स्वतःसाठी एक तास काढण्याचे वचन : धावपळीच्या जीवनात अनेकदा स्वतःकडे दुर्लक्ष, स्वतःसाठी पुरेसा वेळ काढणे शक्य नसते. पण, आज तुम्ही स्वतःला वचन द्या की, तुम्ही दिवसातून स्वतःसाठी एक तास काढणार आणि तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यात वेळ घालवणार.

३. आरोग्याची काळजी घेण्याचे वचन : घर, ऑफिस किंवा एखादा व्यवसाय करताना अनेकदा जेवणाकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे याचा आपल्या आरोग्यावर परिमाण होतो. आज तुम्ही स्वतःला वचन द्या आणि दररोज वेळेत जेवण करा आणि शरीराला हायड्रेट सुद्धा ठेवा.

४. तुमच्या प्रियजनांशी संपर्कात राहा : अनेकदा आवडत्या मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईक, शेजारी यांच्याबरोबर बोलून तणाव दूर होतो. त्यामुळे अशा लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न कराल, असे स्वतःला वचन द्या.

५. वेळेला महत्त्व देण्याचे वचन : एखादी महत्त्वाची गोष्ट करण्यास टाळाटाळ करू नका. स्वतःला वचन द्या आणि योग्य त्या वेळी किंवा वेळेच्या आधी ठरलेल्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच नंतर तुम्हाला तणाव अथवा टेन्शन येणार नाही.

हेही वाचा…‘कुछ तो मीठा हो जाये’ किराणा दुकानातून सुरु झालेला ‘हा’ चॉकलेट ब्रँड, भारतात कसा प्रसिद्ध झाला?

६. आनंदी जीवनासाठी योग्य ते बदल करण्याचे वचन : तुम्हाला कोणत्या गोष्टी करण्यात आनंद मिळतो आहे हे जाणून घ्या आणि भविष्यात त्या दिशेने तुमचे करिअर करण्याचा प्रयत्न कराल, असे स्वतःला वचन द्या.

७. स्वतःला माफ करण्याचे वचन : माणसांकडून चुका होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे कधी तुम्ही चुकीचा निर्णय घेतला, तर तुमची चूक मान्य करून स्वतःला माफ करायला शिका. तसेच स्वतःच्या चुकांमधून भविष्यात अनेक गोष्टी करणे टाळू, असे वचन स्वतःला द्या.

८. स्वतःवर प्रेम करण्याचे वचन : ते म्हणतात ना की, सगळ्यात आधी तुम्ही स्वतःवर प्रेम करा; मग जगदेखील तुम्हाला स्वीकारेल आणि तुमच्यावर प्रेम करू लागेल. अगदी त्याचप्रमाणे स्वतःला पहिले प्राधान्य द्या.

९. स्वतःवर विश्वास ठेवण्याचे वचन : तुमचा निर्णय योग्य आहे, असा आत्मविश्वास बाळगा आणि स्वतःवर विश्वास ठेवून, त्या दिशेने वाटचाल करा.

१०. शिकण्याची तयारी ठेवा : तुमच्या आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती मग ती लहान असो किंवा मोठी तुम्हाला नकळत काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे प्रत्येकाकडून नवनवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवू, असे वचन स्वतःला द्या. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला प्रॉमिस डेच्या निमित्ताने वचन द्या आणि हा दिवस आणखीन खास करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Promise day 2024 date history significance and make this day unique to promise yourself with these ten things asp