अनेकांना झणझणीत आणि मसालेदार पदार्थ खायला खूप आवडते. मसालेदार जेवणात लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची टाकल्याने जेवणाची चव वाढते. अशा मसालेदार पदार्थांचा आस्वाद घेण्यात भारतीय नेहमीच आघाडीवर असतात. पण, अशा पदार्थांच्या सेवनामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टरांकडूनही जास्त तिखट पदार्थ न खाण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र, काही लोक तिखट किंवा मसालेदार पदार्थ न खाता राहूच शकत नाहीत. यात काहींना जेवणातील भाजी, डाळही तिखट हवी असते; पण असे का याचे उत्तर शास्त्रज्ञांकडेही नाही.

त्यामुळे काहींना मसालेदार पदार्थ जास्त खाण्यास का आवडतात हे आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. त्याविषयी रिजन्सी हॉस्पिटलचे सल्लागार व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रोहन कुमार यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

एखाद्याला मसालेदार पदार्थ खाणे का आवडते यामागे अनेक मानसशास्त्रीय कारणे आहेत, त्यातील सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे तणावमुक्ती. मसालेदार पदार्थांमधून एन्डॉर्फिन रसायन उत्सर्जित होते; ज्यामुळे तुमच्या शरीरात उत्साह आणि विश्रांतीची भावना निर्माण होते. ही भावना तणाव किंवा खूप चिंतेत असतानाही आरामदायी अनुभव देते.

याबाबत उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सचे जनरल फिजिशियन व संचालक डॉ. शुचिन बजाज यांनी म्हटले की, मसाल्यांमधील उष्णता व तिखटपणा तोंडातील मज्जातंतूच्या रिसेप्टर्सना सक्रिय करतात; ज्यामुळे एन्डॉर्फिन रसायन बाहेर पडते. परिणामी तुमच्या शरीरात उत्साह आणि रोमांचकारी भावना निर्माण होते.

डॉ. बजाज पुढे म्हणाले की, व्यक्ती त्यांच्या आहारात जन्मापासूनच विविधता शोधत असते. मसालेदार पदार्थ ठरावीक चवींच्या तुलनेत भिन्नता देतात, तसेच जेवणात नावीन्यता आणि उत्साह वाढवतात. ज्या लोकांना वेगवेगळे पदार्थ खाण्याची किंवा बनवण्याची आवड असते. ते काहीतरी नवीन खाऊ पाहण्याच्या थ्रिलसाठी अनेकदा मसालेदार पदार्थांकडे आकर्षित होतात.

सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि सामाजिक प्रभाव आपल्या आहारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. जर एखाद्या व्यक्तीच्या घरी मसालेदार पदार्थ खाल्ले जात असतील, तर त्यालाही मसालेदार पदार्थ खाणे आवडू शकते.

मसालेदार पदार्थांकडे आकर्षित होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे कॅप्सॅसिन. हा घटक मेंदूमध्ये एन्डॉर्फिन, नैसर्गिक वेदनाशामक व मूड वाढवणारी रसायने सोडण्यास चालना देतो.

तुम्हाला हे माहीत आहे का की, टॉपिकल कॅप्सॅसिन क्रीम वेदना कमी करण्यासाठी वापरली जातात. विशेषत: संधिवात आणि न्यूरोपॅथिक वेदनांसारख्या परिस्थितीत याचा वापर होतो. कॅप्सॅसिनने निर्माण केलेली उष्णतेची संवेदना अंतर्निहित वेदनांपासून विचलित होऊ शकते, असे डॉ. बजाज यांनी स्पष्ट केले.

Story img Loader