ऑनलाइन मल्टीप्लेअर गेम असलेला पबजी हा गेम दिवसेंदिवस तरुणांना वेड लावत आहे. या गेमचे आकर्षण वाढत असून त्यामध्ये दिवसागणिक नवनवीन अपडेटस येताना दिसत आहेत. फेसबुक आणि यूटय़ूबवर गेम प्ले लाइव्ह करून खेळणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. काही तरुण तर दिवस-रात्रभर हा खेळ खेळतात. जगातील १० कोटींहून अधिक लोकांनी हा गेम स्मार्टफोनवर डाऊनलोड करून तो खेळण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून यातील विकेंडी मॅपचा पबजी खेळणाऱ्यांनी वापर करायला सुरुवात केली आहे. तर याच मॅपसाठीचे पुढील अपडेट आले असून पबजीच्या पुढील अपडेटमध्ये नाइट मोडचा समावेश होणार आहे. या नव्या फिचरमुळे आता प्लेअर्स नाइट मोडमध्येही खेळू शकतील. तसेच त्यांना पोलार लाइट्स दृश्येही पाहायला मिळणार आहेत.
या नव्या अपडेटबाबत पबजी चे निर्माते म्हणाले, पुढच्या आठवड्यापर्यंत युजर्सना हा मोड वापरता येणार आहे. या ट्विट सोबतच पोस्ट करण्यात आलेल्या एका फोटोत विकेंडी मॅपवर नाइट मोड दिसत असून सोबतच ‘aurora borealis’ या पोलार लाइट्सही पाहायला मिळत आहेत. हा फोटो समोर आल्यानंतरच पबजी फॅन्सची उत्सुकता ताणली गेली आहे कारण नाइट मोड सर्वाधिक रेटिंग दिलेल्या फीचर्सपैकी एक आहे. पबजीने पहिल्यांदा कॉप्युटरसाठी १९ डिसेंबरला नाईट मोड लाँच केला होता. हाच मॅप पबजी मोबाइल ग्राहकांना आता उपलब्ध झाला आहे. या विकेंडी मॅपवर येणाऱ्या नाइट मोडला ‘मूनलाइट मोड’ असेही म्हणता येऊ शकते. तसेच विकेंडीमध्ये एक नवीन स्नोबाइक मिळण्याची शक्यता आहे. या बाईकबद्दलही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.