Home Gardening Tips: आपल्यापैकी अनेकजण हे होम गार्डन सजवण्यासाठी फार उत्सुक असतात. अगदी कितीही वेळ कमी असला तरी आपल्या बाल्कनीत, खिडकीत छान हिरव्यागार पानांनी नटलेली अशी छोटीशी बाग असावी अशी अनेकांची इच्छा असते. तुम्हीही हौशीने तुमच्या घरी अशी रोपं लावली असतील आणि त्यांची निगा राखायला तुम्हाला पुरेसा वेळ मिळत नसेल तर आज आम्ही तुम्हाला काही अगदी सोप्या, स्वस्त टिप्स सांगणार आहोत ज्या वापरून तुम्ही कमी वेळात तुमच्या गार्डनची काळजी घेऊ शकता. आठवड्यातून निदान एखाद्या दिवशी तरी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत. तुमच्या घरी असणारी फुलझाडं, कडीपत्ता, मिरची , टोमॅटो किंवा भाज्यांची रोपं सुद्धा या जुगाडू उपायांमुळे छान बहरून येतील. असा हे उपाय काय आहेत? चला पाहूया..
कुंड्यांमध्ये टाकण्यासाठी खत बनवायला वेळ नाही? हे उपाय पाहा
अंड्यांचे कवच
अंड्यांचे कवच जे आपण सहसा फेकून देतो ते मुळात वनस्पतींसाठी कॅल्शियमचा चांगला स्रोत असू शकतात. कॅल्शियम सर्व वनस्पतींसाठी आवश्यक आहे आणि विशेषतः भाजीपाला पिकवण्यासाठी तर याचे महत्त्व खूप आहे. अशावेळी कॅल्शियम पुरवणारी ही अंड्याची सालं आपण मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर बनवून कुंडीत घालू शकता. खत तयार करण्यासाठी अंड्याच्या कवचाची पावडर तुम्हाला कामी येऊ शकते.
नारळ पाणी
नारळपाणी हे खरंच ‘अमृत’ आहे. नारळाच्या पाण्यात भरपूर खनिज पोषक घटक असतात. ५ लिटर पाण्यात १०० मिली नारळ पाणी मिसळा. या द्रावणाने झाडे पूर्णपणे धुवा. सर्व प्रकारच्या फुलझाडाची पाने आणि भाजीपाला वनस्पतींवर याचा वापर करा. रोपांच्या वाढीसाठी याची खूप मदत होऊ शकते.
ताक
ताकामधील प्रोबायोटिक्समुळे हे जगातील सर्वात पौष्टिक आणि आरोग्यदायी पेयांपैकी एक आहे. तुम्हाला माहीत आहे का की ताक तुमच्या बागेतील झाडांना बुरशीजन्य संसर्गापासून वाचवू शकते! कोवळ्या रोपांना बुरशी लागण्याची शक्यता अधिक असते. किंवा अळीमुळे सुद्धा रिपाचे नुकसान होऊ शकते अशावेळी ताकांचे द्रावण पानांवर शिंपडल्याने हे विषाणू रोपांपासून लांब राहतात. लक्षात ठेवा आंबट ताक जुन्या रोपांसाठी वापरले जाते तर कमी आंबट ताक कोवळ्या रोपांसाठी वापरले जाते.
हे ही वाचा<< Garden Tips: फुलझाडांच्या कुंडीत ‘ही’ टाकाऊ गोष्ट टाकून बघाच जादू! सुंदर फुलांनी बहरेल तुमची बाल्कनी
मध
जुना मध देखील वनस्पतींसाठी खूप फायदेशीर आहे. मधामध्ये अनेक कर्बोदके आणि वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त पोषक सत्व असतात. हे रोपांच्या लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेम कटिंग पद्धतीत वापरले जाते. २ कप उकळत्या पाण्यात एक चमचा मध घाला आणि थंड होऊ द्या. या सोल्युशनमध्ये रोपाच्या एका देठाचे टोक बुडवा आणि मग ते टोक मातीतलावा . यामुळे रोपाची मुळे रुजण्यास मदत होते.
तुम्हाला या जुगाडू उपायांचा कसा फायदा होतोय हे कमेंट करून कळवायला विसरू नका .