बहीण-भावाच्या नात्याचे महत्त्व आणि या नात्यातील प्रेम दर्शवणारा सॅन म्हणजेच रक्षाबंधन आता जवळ येतंय. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देतो. मात्र आता ओवाळणीच्या वेळी बहिणीला फक्त पाकीट दिलेलं चालत नाही. त्यांना काही ना काही गिफ्ट हवंच असतं. त्यातही ते सुंदर कागदात गुंडाळलेलं आणि आकर्षक पद्धतीने सजावट केलेलं असावं अशी बहिणींची अपेक्षा. मात्र भावांची गाडी, बहिणीला गिफ्ट काय द्यावं यावरच अडकलेली असते. तेही बहिणीला आवडेल की नाही याची खात्री नाही. म्हणूनच आज आपण असे गिफ्ट जाणून घेऊया, जे पाहून तुमच्या बहिणीच्या चेहऱ्यावर हसू खुलेल.
ड्रेस आणि ज्वेलरी : ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाला तुमच्या प्रिय बहिणीला ट्रेंडी ज्वेलरी किंवा एखादा छानसा डिजायनर ड्रेस गिफ्ट करा. तिला हे गिफ्ट कायम स्मरणात राहिल.
मोबाईल फोन : रक्षाबंधनाला स्मार्टफोन किंवा छानसं गॅझेटही गिफ्टसाठी चांगला पर्याय असू शकतो. तुमची बहीण गेल्या काही दिवसांपासून तुमच्याकडे मोबाईलचा हट्ट करत असेल तर रक्षाबंधनाचा योगायोग सााधून तिला एखादा चांगला मोबाईल भेट द्या. सध्या मोबाईल फोनवर ऑनलाईन चांगल्या ऑफर आहेत.
टेम्परेचर कंट्रोल ट्रॅव्हल मग : जर तुमची बहीण चहा किंवा कॉफीची शौकीन असेल तर भेटवस्तू देण्यासाठी ही एक उत्तम गोष्ट आहे. टेम्परेचर कंट्रोल ट्रॅव्हल मगमुळे तुमच्या बहिणीला नेहमी गरमागरम कॉफी किंवा चहा पिता येईल.
स्पा पॅकेज : जर तुमची बहीण एखाद्या कंपनीमध्ये किंवा सरकारी ठिकाणी काम करत असेल, तर या रक्षाबंधनाला ‘स्पा पॅकेज’ गिफ्ट म्हणून एक चांगला पर्याय आहे. यामुळे धावपळीच्या आयुष्यात तिला थोडाफार आराम मिळेल.
घड्याळ : या रक्षाबंधनाला एखादे स्टाईलिश घड्याळ भेट द्या. हे घड्याळ भारतीय आणि परदेशी अशा दोन्ही कपड्यावर मॅच व्हावे याची काळजी घ्या.
इन्स्टॅक्स मिनी कॅमेरा : प्रत्येक चित्र आपल्या मोबाईलवर ठेवणे नेहमीच शक्य नसते. कधीकधी, काही तांत्रिक त्रुटींमुळे, आपण सर्वोत्तम आठवणी कॅप्चर करण्यात अक्षम असतो. तथापि, या इन्स्टॅक्स मिनी कॅमेरासह, आपण केवळ चित्र क्लिक करू शकत नाही तर आपल्याला फोटो क्लिक करताच हार्ड कॉपी देखील तात्काळ मिळू शकते.
फोटो फ्रेम : फोटो ही अशी गोष्ट आहे ज्यात तुमचा आठवणी साठवलेल्या असतात. जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी फोटो मदतगार ठरत असतात. त्यामुळे तुमचा आणि तुमच्या बहिणीचा एखादा जुना फोटो असेल जो घरच्या जुन्या फाटक्या अल्बममध्ये धूळ खात पडला असेल त्याला काढून त्याची एक फ्रेम करूनही तुम्ही तिला गिफ्ट देऊ शकता. खूप जास्त पैसे न खर्च करता नेहमीसाठी तिच्या आठवणीत राहिल असं हे गिफ्ट ठरू शकतं.
पुस्तक : बाजारातील इतर महागड्य़ा वस्तू गिफ्ट देण्यापेक्षा तुमच्या बहिणीला जर वाचनाची आवड असेल तर तुम्ही तिला तिच्या आवडीच्या लेखकांची पुस्तकेही गिफ्ट देऊ शकता.
जेवायला बाहेर घेऊन जा : तुम्ही आणि तुमची बहीण असे दोघेच जेवायलाही बाहेर जाऊ शकता. एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही तिला जेवायला घेऊन जा. यावेळी तुम्हाला एकमेकांसोबत चांगला वेळही घालवता येईल.