रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर सुंदर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. यामिनित्तने गेल्या काही आठवड्यांपासून रंगीबेरंगी राख्यांनी बाजार फुलून गेला आहे. या सणाला प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी सर्वात सुंदर राखी निवडण्याचा प्रयत्न करत असते. भारताप्रमाणेच परदेशातही रक्षाबंधन हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. पण परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी यंदाचे रक्षाबंधन वेगळे असणार आहे.
यावर्षी परदेशात राहणाऱ्या बहिणी गायीच्या शेणापासून बनवलेली राखी आपल्या भावाच्या मनगटावर बांधणार आहेत. यासाठीची तयारी आता शेवटच्या टप्प्यावर असून लवकरच या राख्यांची डिलिव्हरी केली जाणार आहे. या राख्या बनवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी जयपूरहून १९२ मेट्रिक टॅन गायीच्या शेणाची निर्यात करण्यात आली आहे.
राख्यांमधून येणार नाही शेणाचा दुर्गंध
हॅनिमन चॅरिटेबल मिशन सोसायटीच्या सेक्रेटरी मोनिका गुप्ता म्हणाल्या की, लोक गायीचा आदर करतात. त्यामुळेच शेण आणि औषधी बियांपासून राखी बनवली जात आहे. गायीचे शेण उन्हात चांगले वाळवले जाते, त्यामुळे शेणाचा वास ९५ टक्क्यांपर्यंत दूर होतो. यानंतर, गाईचे तूप, हळद, पांढरी चिकणमाती आणि चंदन मिसळून कोरड्या शेणाची बारीक पावडर इतर सेंद्रिय पदार्थांसह पिठाप्रमाणे मळून रंगीबेरंगी राख्या बनवतात. संपूर्ण प्रक्रियेत कोणतेही रासायनिक पदार्थ वापरले जात नाहीत.
राख्यांचा शास्त्रीय वापर
मोनिका म्हणाली की, बहुतेक लोक काही वेळाने राखी काढतात आणि रक्षाबंधनानंतर काढून टाकली जाते. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेली राखी काही दिवसांनी कचऱ्यात सापडते. या शेणाच्या राख्या पर्यावरणपूरक असण्यासोबतच यामध्ये तुळशी, अश्वगंधा, काळमेघ आदी बिया टाकल्या जातात. त्यामुळे राखी फेकण्याऐवजी लोकांनी कुंडीत किंवा घराच्या अंगणात ठेवावी. या उपक्रमामुळे वृक्षारोपण होण्यास मदत होणार आहे.
Raksha Bandhan 2022: यंदाच्या रक्षाबंधनासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींकडून घ्या खास Fashion Tips
‘या’ देशातून मिळाली मोठी ऑर्डर
ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर असोसिएशन ऑफ इंडियाचे अतुल गुप्ता म्हणाले की, ४० हजार राख्यांची ऑर्डर अमेरिकेतून आली आहे, तर २० हजार राख्यांची ऑर्डर मॉरिशसमधून मिळाली आहे. असोसिएशनच्या महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा संगीता गौर यांच्या म्हणण्यानुसार, “यंदा गायीच्या शेणापासून बनवलेल्या राख्या केवळ भारतातच नाही तर परदेशातही आकर्षणाचे केंद्र असतील. या राख्या सनराईज ऑरगॅनिकमध्ये देशी गायीच्या शेणापासून बनवल्या जातात. या राख्या प्रवासी भारतीयांसाठी भाऊ आणि बहिणीच्या पवित्र बंधनाचे प्रतीक असतील.”
Raksha Bandhan 2022 : भावाच्या हातावर चुकूनही बांधू नका ‘ही’ राखी; ज्योतिषशास्त्रानुसार मानली जाते अशुभ
शेणाच्या राख्यांमधून मिळणारे उत्पन्न गाईच्या संरक्षणासाठी अर्थपूर्ण प्रयत्नांसाठी वापरले जाईल. तसेच या प्राचीन राख्या बनवून हॅनिमन चॅरिटेबल मिशन सोसायटीच्या महिला बचत गटातील महिला आपला उदरनिर्वाह करून स्वावलंबी होतील. याशिवाय लोकांना चिनी राख्या तसेच पर्यावरण प्रदूषित करणाऱ्या राख्या वापरण्यापासून परावृत्त केले जाईल. याशिवाय मनगटावर शेणाची राखी बांधल्याने रेडिएशनपासून संरक्षण मिळेल.