Rava Idli Recipe Marathi Tips: इडली, डोसा, मेदूवडा, उत्तपा हे दाक्षिणात्य पदार्थ संपूर्ण भारतात आवडीने खाल्ले जातात. कॉलेज- ऑफिसला जाताना पटकन एखाद्या स्टॉलवर इडली खाऊन तुम्ही पोटभर नाश्ता करू शकता. आता एरवी हे सगळं ठीक आहे पण पावसाळ्यात अनेकदा बाहेरच खाणं म्हणजे भीतीच वाटते. अशावेळी इडली खाण्याचा मोह झाल्यास त्यासाठी एक संपूर्ण दिवस वाट पाहायची काहीच गरज नाही. पावसाळ्यात वातावरण थंड असल्याने अनेकदा इडलीचे पीठ तयार करूनही नीट आंबत नाही अशावेळी सर्वात सोपा पर्याय म्हणजे रवा इडली. अनेकांना हा पर्याय माहित असेल आणि कधी ना कधी तुम्हीही तो करून पाहिला असेल पण रवा इडलीबाबत समस्या अशी येते की इडली लुसलुशीत होण्याऐवजी लगद्यासारखी होते, म्हणजे नुसता रव्याचा गोळाच खातोय की काय असेही वाटू शकते. हे टाळण्यासाठी आज आपण काही भन्नाट टिप्स पाहणार आहोत.
रवा इडली बनवण्यासाठी टिप्स
1)रव्याच्या इडल्या बनवण्यासाठी वापरला जाणारा रवा हा बारीक असेल याची खात्री करून घ्या. जेणेकरून पीठ रवाळ लागेल पण दातात अडकून राहणार नाही किंवा इडलीचा नुसताच लगदाही होणार नाही.
2) इडलीचे पीठ भिजवताना घरी विरजण घालून लावलेले छान घट्ट व आंबट दही वापरावे. आपण रव्याच्या इडल्यांसाठी रात्रभर पीठ आंबवत नाही त्यामुळे निदान कमी वेळात पीठ फुलून येण्यासाठी दह्याची मदत होते, शिवाय यामुळे इडलीला छान चव सुद्धा येते.
3) आता वर म्हटल्याप्रमाणे फार वेळ आंबवण्याची गरज नाही म्हणूनच अनेकजण रव्याच्या इडल्या बनवण्याचा विचार करतात पण तरीही तुम्हाला छान फुलून आलेल्या व स्पंजसारख्या लुसलुशीत इडल्या हव्या असतील तर किमान ३० मिनिट हे पीठ भिजवून बाजूला ठेवावे. आंबवण्याची प्रक्रिया जलद करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता.
4) इडलीच्या पिठातच तुम्ही आले- मिरची यांचे बारीक तुकडे तसेच जिरं- धण्याची पूड मिक्स करू शकता. मीठ सुद्धा पीठ भिजवतानाच घालणे उत्तम ठरेल. तुमच्या चवीनुसार तुम्ही पीठ इडली पात्रात ओतण्याआधी त्याला छानपैकी मोहरीचे दाणे, उडीद डाळीचे दाणे, मेथी दाणे व लाल मिरचीचे तुकडे यांच्या तडतडत फोडणीही देऊ शकता.
हे ही वाचा<< झणझणीत मिसळ मसाला एकदाच बनवून ठेवा! वाटेल तेव्हा गरमागरम मिसळ, उसळ खायला तयार
5) इडलीच्या पिठाचा घट्टपणा हा अगदी पेस्टसारखा घट्ट किंवा डाळीइतका पातळ असू नये. तुम्ही पळीतून पीठ उचलल्यावर त्याची एक संततधार खाली पडेल इतके पीठ पातळ/घट्ट असावे.