Raw vs Cooked Carrots: थंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं कंदमुळ म्हणजे गाजर. बीटा कॅरेटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये तरी नक्की खावं. गाजर रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारांपासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढते. मात्र तुम्हाला माहितीये का कच्चे की शिजवलेले गाजर? कोणते आरोग्यदायी आहे? चला जाणून घेऊयात.
जेव्हा पौष्टिकतेचा प्रश्न येतो तेव्हा खरा प्रश्न असतो की कोणते आरोग्यदायी आहे. कच्चे गाजर की शिजवलेले गाजर? अलीकडेच, फिटनेस कोच आणि डिजिटल निर्माते रॅल्स्टन डिसूझा यांनी याच प्रश्नाला उत्तर देत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
कच्च्यापेक्षा शिजवलेले गाजर जास्त पौष्टिक असतात का?
या व्हिडीओमध्ये त्यांना विचारले, “कच्चे गाजर शिजवलेल्या गाजरांपेक्षा आरोग्यदायी आहेत का?” त्याचे उत्तर: “खरंच नाही. गाजर बीटा-कॅरोटीनमध्ये समृद्ध असतात, जे तुमचे शरीर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करते, डोळ्यांच्या आरोग्यासाठी, प्रतिकारशक्तीसाठी आणि त्वचेसाठी आवश्यक पोषक घटक गाजरातून मिळतात. फिटनेस तज्ञांच्या मते, “जेव्हा तुम्ही कच्चे गाजर खाता तेव्हा तुमचे शरीर फक्त ३ ते ४ टक्के बीटा-कॅरोटीन शोषून घेते, तर शिजवल्यानंतर शोषण सुमारे ४० टक्के वाढते.” त्यामुळे शिजवलेले गाजर खाणे अधिक फायदेशीर आहे.
कच्च्या गाजरांचे फायदे देखील योग्य आहेत. फायबरने भरलेले, ते पौष्टिकतेने समृद्ध आहेत आणि बद्धकोष्ठता कमी करताना जास्त काळ पोट भरण्यास मदत करतात. दुसरीकडे, भाजी दूषित असल्यास शिजवलेले गाजर आजारपणाचा धोका कमी करतात.
गाजर हे कंदमूळ निसर्गाकडून मनुष्याला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे. ते जमिनीखाली येते म्हणूनच ते कंदमूळ या प्रकारात मोडते. फळ व भाजी अशा दोन्ही स्वरूपात गाजराचा उपयोग केला जातो. तसेच औषधी वनस्पती म्हणूनही त्याचा वापर केला जातो. संपूर्ण जगात गाजराचे उत्पादन घेतले जाते. भारतातही ते सर्वत्र मिळते. गाजराच्या हिरव्या पानातही औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याचाही आरोग्य चांगले राखण्यासाठी लाभ होतो. सहसा गाजर हे थंड हवेच्या डोंगराळ प्रदेशात जास्त प्रमाणात उगवते.
गाजरामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, अ, ब, क जीवनसत्त्व त्यात असते. त्याचबरोबर प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतुमय व पिष्टमय पदार्थही असतात. गाजरामध्ये कॅरोटिन हा घटक विपुल प्रमाणात असतो. आयुर्वेदानुसार गाजर हे मधुर, अग्नीप्रदीपक, कृमीनाशक, दीपक, पाचक आहे. गाजरामध्ये असणाऱ्या या सर्व गुणधर्मामुळे शरीर स्वच्छ व शुद्ध राहते. गाजर चावून खाल्यामुळे दात व तोंड स्वच्छ होते. त्याचबरोबर ते अल्कली गुणधर्माचे असल्यामुळे रक्त शुद्ध होऊन संपूर्ण शरीराला रसरक्त पुरवठा सुरळीत होतो. त्यामध्ये असणाऱ्या तंतुमय पदार्थामुळे पोटातील आतडय़ांमधील मळ पुढे ढकलण्यास उत्तेजना मिळते व त्यामुळे शौचास साफ होऊन शरीर स्वच्छ राहते. आतडय़ांच्या आतमध्ये असणारा श्लेष्मल भाग गाजरामुळे निरोगी राहून पोटातील कृमी शौचावाटे बाहेर पडतात. यामुळे गाजर नियमितपणे खावे.