Bhuvneshwar Kumar Diet Secret : भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या विकेट्सची नेहमी चर्चा असते. तो त्याच्या फिटनेससाठी खास ओळखला जातो. तुम्हाला भुवनेश्वरच्या डाएट सिक्रेट माहितीये का? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. भुवनेश्वर आयपीएल २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) कडून खेळत आहे. द रणवीर शो पॉडकास्टमध्ये रणवीर अलाहबादियाशी बोलताना त्याने त्याच्या फिटनेसमागील रहस्य सांगितले. तसेच तो शाकाहारी असल्याचेही त्याने यावेळी सांगितले.
भुवनेश्वर कुमारने सांगितले डाएट सिक्रेट
३५ वर्षीय भुवनेश्वर सांगतो की चहा आणि कॉफीमुळे त्याच्या आतड्यांचे आरोग्य बिघडते, हे लक्षात आल्यानंतर त्याने चहा आणि कॉफीचे सेवन टाळले. तो आठवड्यातून एकदा अधूनमधून क्वचितच दूध कॉफी पितो, असे त्याने कबूल केले. भुवनेश्वर सांगतो, “माझे आतड्यांच्या आरोग्यासाठी मी चहा आणि कॉफी पूर्णपणे बंद केली आता मी आठवड्यातून एकदा पितो, पण फार क्वचितच. मी फक्त दूध कॉफी पितो. पण मला त्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटते कारण ते मला अतिरिक्त सेवन वाटते.”
भुवनेश्वर पुढे सांगतो की तो गेल्या तीन ते चार वर्षांपासून आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार डाएट प्लॅनचे शिस्तबद्ध पद्धतीने पालन करत आहे. यामुळे त्याला अनेक अन्नपदार्थ, विशेषतः दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे लागते कारण त्यामुळे त्याचा पोटफुगीचा त्रास वाढतो. भुवनेश्वर सांगतो, “माझ्या आहारतज्ज्ञांनी मला एक डाएट प्लॅन दिला आहे ज्यामुळे मला अनेक पदार्थांचे सेवन टाळावे लागले. मला ग्लूटेन-मुक्त अन्नपदार्थांचे सेवन करावे लागले आणि दुग्धजन्य पदार्थ टाळावे लागले. मला असेही सांगण्यात आले की डाळ खाऊ नका कारण ते पोटफुगीचे कारण ठरू शकते.” त्याने एक वर्षापासून या सर्व पदार्थांचे पूर्णपणे सेवन बंद केले आहे. तो कधी कधी बाहेर जेवताना काही निर्बंध लावलेले पदार्थ खातो.
भुवनेश्वर शाकाहारी जेवणात प्रोटिनचा कसा समावेश करतो?
शाकाहारी असलेला भुवनेश्वर सांगतो, त्याच्या प्रोटिनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो काही काळासाठी आहारात अंडी खात होता पण त्याला चव आवडली नाही म्हणून त्याने अंडी खाणे सोडली. त्याला पर्याय म्हणून तो व्हे प्रोटिन, पनीर, टोफू आणि घेवडा सारख्या पदार्थांचे सेवन करतो. भुवनेश्वर सांगतो की तो आधी शाकाहारी होता, पण नंतर त्याने प्रोटिनसाठी मांसाहारी अन्न खायला सुरुवात केली होती पण त्याला ते कधीही आवडले नाही. म्हणून त्याने मांसाहारी अन्न सुद्धा सोडले. आता तो पूर्णपणे शाकाहारी आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)