सायबेरियात सतत गोठलेल्या अवस्थेत असलेल्या भागात सापडलेला तीस हजार वर्षांपूर्वीचा विषाणू जिवंत करण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. फ्रान्सच्या प्रयोगशाळेत हा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे. गोठलेल्या जमिनीत ३० मीटर खोलीवर हा विषाणू सापडला असून त्यामुळे मानव व प्राणी यांना कुठलाही धोका नाही पण यातून इतरही विषाणू अशा प्रकारे भूपृष्ठावर अवतरू शकतात असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. इतक्या काळानंतरही संसर्गजन्य असलेल्या विषाणूचा प्रकार आम्ही प्रथमच पाहिला आहे, असे नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रीसर्च या एक्स मार्सेली विद्यापीठाच्या संस्थेचे जीन मायकेल क्लॅव्हरीन यांनी सांगितले. पिथोव्हायरस सायबेरिकम असे या विषाणूचे नाव असून तो दहा वर्षांपूर्वी शोधून काढण्यात आलेला आहे. हे विषाणू तुलनेने मोठे असून सूक्ष्मदर्शकातून दिसतात. त्यांची लांबी दीड मायक्रोमीटर इतकी आहे. बीबीसीने संशोधकांच्या हवाल्यानुसार म्हटले आहे की, या विषाणूंच्या आवृत्त्या पेट्रीडिशमध्ये तयार करता येतात. हा विषाणू अमिबा या एकपेशीय प्राण्यावर हल्ला करणारा असून मानव व प्राण्यांना संसर्ग करीत नाही. संशोधकांच्या मते हे विषाणू सायबेरियातील नेहमी गोठलेल्या अवस्थेतील भागात दिसून आले आहेत. १९७० पासून कायम गोठलेल्या या भागात बर्फाचा थर हवामान बदलांमुळे काहीसा कमी झाला आहे व तो आणखी कमी होऊ शकतो. त्यामुळे असे विषाणू व पूर्वीचे नैसर्गिक स्रोत दिसू लागतील. क्लॅव्हरिन यांनी असा इशारा दिला आहे की, हे बर्फाचे थर उघडे पडले तर नवीन विषाणूंचा धोका आहे. कांजिण्यांचे विषाणू तीस वर्षांपूर्वी नष्ट झाले, असे आपण म्हणत असलो तरी ते अशा पद्धतीने परत येऊ शकतात. अमिबातील हा विषाणू जसा टिकू शकला किंवा टिकवता आला तसे कांजिण्यांचे विषाणू पृष्ठभागावर येऊ शकतात. त्यामुळे आधुनिक काळात कांजिण्या, देवी यांसारख्या रोगांचा धोका नाकारता येत नाही. पण यात एक गोष्ट खरी की, सर्व प्रकारचे विषाणू अशा प्रकारे लाखो वर्षांनी जिवंत होऊ शकतात का हा खरा प्रश्न आहे. ‘प्रोसिडिंग ऑफ द नॅशनल अ‍ॅकडमी ऑफ सायन्सेस’ या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा