साखर हा मानवी आहाराचा पुरातन काळापासून घटक राहिला असून भारत आणि चीनमध्ये सर्वात आधी आहारात साखर वापरली गेली, असे सांगितले जाते,  परंतु साखरेपासून मधुमेह, लठ्ठपणासारखे विविध आजार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता आहारात साखरेचे प्रमाण कमी करा, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली असल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
साखरेपासून लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, यकृतविकार, काही कर्करोग होत असल्याचे दिसून आले आहे. जेवण हे काबरेदक, साखर, स्निग्धांश, प्रथिने, धातू आणि पाण्याने तयार झाले असून जेवणानंतर आपले शरीर या अन्नाचे पचन करून उर्जेत रूपांतर करते. कोलेस्टोरॉल, मीठ, साखर, तसेच स्निग्ध घटकांचे प्रमाण मर्यादित ठेऊन सर्व आवश्यक पोषकतत्त्व पुरवणाऱ्या आहाराला सकस आहार म्हटले जाते. भारतात राष्ट्रीय आरोग्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सकस आहार, खेळ आणि व्यायामातून शारीरिक हालचाल, तंबाखू, तसेच मद्य टाळणे आणि तणावाचे नियोजन करण्यावर भर दिला आहे. जेवणात कमी मीठ, तसेच फास्ट फूडच्या अतिरेकाला पायबंद घालण्यासाठी आपल्या राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रमांतर्गत प्राधान्य देण्यात आले असले तरी केवळ मधुमेहासाठीच आहारात कमी साखरेचा सल्ला देण्यात आला आहे.
आहारात साखरेचे प्रमाण अधिक असल्यास किती धोकादायक ठरते, यावर गेल्या काही वषार्ंपासून संशोधन सुरू आहे. एवढेच नव्हे, तर तंबाखू किंवा दारूप्रमाणे साखरेचेही व्यसन लागू शकते, असा दावा काही संशोधकांनी केला आहे. या दाव्याला नागपुरातील मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील गुप्ता यांनी पाठिंबा दिला आहे. इंग्लडमध्ये लठ्ठपणासाठी तेथील तज्ज्ञ डॉक्टरांनी साखरेला जबाबदार धरले आहे. नागरिकांच्या आहारातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेथील तज्ज्ञांनी अन्य उपाय सुचवले आहेत. भारतातील पंजाब, हरियाणा आणि पश्चिम बंगालमध्ये साखरेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या प्रांतातील नागरिक लठ्ठ दिसून येते. तुलनेने महाराष्ट्रात त्याचे प्रमाण कमी असल्याचेही डॉ. गुप्ता यांनी सांगितले.  
लठ्ठपणाची समस्या केवळ इंग्लडपुरती मर्यादित राहिलेली नाही. जगभरात वाढत असलेल्या या समस्येवर जागतिक आरोग्य संघटनेतही गेल्या दहा वर्षांंपासून मंथन सुरू आहे. त्यामुळे आता संघटनेने साखरेबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यापूर्वी जनमत मागिवले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर ही मार्गदर्शक तत्वे ठेवण्यात आली असून त्यावर ३१ मार्चपर्यंत नागरिकांना सूचना मागवण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्वात लठ्ठपणा रोखण्यासाठी आहारातील साखरेचे प्रमाण कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. संघटनेच्या सध्याच्या (२००२ नुसार) शिफारसीनुसार आहारातील एकूण कॅलरीजपैकी (दोन हजार किलो कॅलरी) साखरेचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमीच असावे. याचाच अर्थ, दिवसाला ५० ते ७० ग्रॅम (१२ ते १६ लहान चमचे) साखरेचे प्रमाण योग्य ठरते. नव्या शिफारशीनुसार हे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी असावे. मात्र, ते पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्यास अधिक उपकारक ठरेल, असे म्हटले आहे. यानुसार उंचीच्या प्रमाणात योग्य वजन असलेल्या प्रौढांना दिवसाला आहारातून २५ ग्रॅम (सहा लहान चमचे) साखर योग्य ठरू शकेल. या साखरेच्या प्रमाणात जेवण तयार करताना किंवा तयार जेवणात असलेली ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज किंवा नेहमीची साखर, मध, गूळ, फळांचे रस यांच्यात नैसर्गिकरित्या असलेली शर्करा यांचा समावेश आहे. फळांमध्ये असलेल्या साखरेचा यात समावेश नाही. फळांमध्ये असलेल्या साखरेचा शरीराला अपाय करणाऱ्या घटकांमध्ये समावेश होत नाही. कारण, फळात असलेले तंतू ही साखर शरिरात विरघळवण्याचा वेग कमी करतात.
भारतीय दरवर्षी २६ हजार ५०० मेट्रिक टन साखर रिचवतात. पारंपरिक भारतीय जेवणात वरण, भात, भाजी, पोळी, पापड, दही, चटणी किंवा लोणचे आणि एका गोड पदार्थांचा समावेश असतो. या जेवणात सरासरी २० ग्रॅम साखर असते. आता तंतूमय पदार्थ वाढवायचे असून साखरेचे प्रमाण निम्म्यावर आणावयाचे आहे. तयार जेवणात साखर थेट दिसत नसली तरी ती अनेक प्रकारे लपून बसलेली असते. आपल्याला लागणाऱ्या उर्जेपेक्षा जास्त कॅलरी आहारातून गेल्यास शरिरात गेल्यास ती चरबीच्या माध्यमातून साठवून राहते व त्यामुळे लठ्ठपणा येतो. रोजचे सर्वसाधारण काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला दोन हजार कॅलरीजची आवश्यकता असते, पण प्रत्यक्षात रोजच्या आहारातून यापेक्षा कितीतरी अधिक कॅलरीज पोटात जातात आणि त्यामानाने आपले सध्याचे राहणीमान बैठय़ा स्वरूपाचे झाले असल्याने या कॅलरीज वापरल्या जात नाहीत. गोड पदार्थांची आवड असलेल्यांनी तर याकडे विशेषत्वाने लक्ष दिले पाहिजे, असा सल्लाही डॉ. गुप्ता यांनी यानिमित्ताने दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा