Refined Oil Vs Cold Pressed Oil: बदलत्या जीवनशैलीत आहारातील खाद्यतेलाचा वापर हा सार्वजनिक आरोग्याचा विषय ठरला आहे. कोणते तेल वापरावे आणि कोणते वापरू नये असा अनेक वेळा प्रश्न पडतो. रोजच्या जेवणात आपल्याला तेल लागतंच, तेलाशिवाय आपलं जेवण पूर्णच होऊ शकत नाही. मात्र, ते तेल आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का ते पाहणं गरजेचं आहे. आजकाल लोकांच्या आरोग्याच्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. काही अंशी त्याचं मूळ हे तेलाशीही निगडीत आहे, त्यामुळे जे तेल आपण वापरणार असू ते पौष्टिक असणं हे आता फार महत्त्वाचं ठरू लागलेलं आहे. म्हणून आता लोकांचा ओढा घाण्याच्या तेलाकडे वळला आहे. शिवाय हे तेल पारंपरिक पद्धतीने काढले जात असल्याने त्याचे महत्त्वही खूप आहे. तर बरेच जण रिफाइंड तेल रोजच्या जेवणात वापरतात; तर मग रिफाइंड तेल वापरायचे की घाण्याचे? स्वयंपाक आणि तब्येतीसाठी कोणतं तेल योग्य हे जाणून घेऊयात.

रिफाइंड तेल

रिफाइंड ऑइल म्हणजे काय? नावाप्रमाणेच हे तेल रिफाइंड केले जाते, याचा अर्थ ते आपल्यापर्यंत येण्याआधी त्यावर अनेक प्रक्रिया केल्या जातात. हे इतर तेलांच्या तुलनेत दीर्घ काळ टिकते, परंतु शुद्धीकरण प्रक्रियेमुळे तेलातील अनेक नैसर्गिक पोषक घटक काढून टाकले जातात.

घाण्याचं तेल

तेलबियांना उष्णता न देता फक्त दाबून जे तेल काढलं जातं, ते घाण्यावरचं तेल असतं. हे तेल आरोग्यासाठी सर्वोत्तम असतं. या प्रकारे बनवलेल्या तेलाची जडणघडण बदलत नाही. त्यात रासायनिक, हानिकारक द्रव्यं मिसळलेली नसतात, त्यामुळे ते आरोग्यासाठी उत्तम असते.

रिफाइंड ऑइल किंवा घाण्याचं तेल कोणतं स्वयंपाकासाठी आरोग्यदायी आहे?

पोषणतज्ज्ञ शालिनीच्या मते, दोन्ही तेलांचे आरोग्य घटक त्यांच्या हेतूवर अवलंबून असतात. रिफाइंड तेलाचा वापर तळणे आणि बेकिंगसाठी अधिक योग्य आहे. दुसरीकडे, घाण्याचं तेल नियमित स्वयंपाकासाठी वापरावे. आपल्यापैकी बरेच जण हल्ली रिफाइंड तेल टाळतात, पण रिफाइंड तेल वापरणे ठीक आहे; कारण आपण दररोज तळलेले किंवा बेक केलेले पदार्थ खात नाही. मात्र, तरीही लक्षात ठेवा की कोणत्याही तेलाचं अतिसेवन आरोग्याला अपायकारकच असतं. कोणतेही तेल पूर्णपणे आरोग्यदायी नसते, म्हणून ते नेहमी प्रमाणात सेवन करावे.

हेही वाचा >> Foods Help Fight Inflammation : शरीरातील सूज कमी करून आजारांपासून राहा चार हात लांब; ‘या’ पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

घाण्याचे तेल सर्वोत्तम!

ज्या तेलावर सर्वात कमी प्रक्रिया केली जाते, ते तेल आरोग्यासाठी सर्वांत चांगलं असतं. पॅकिंग तेल दोनदा फिल्टर होत असल्यानं त्यातील आवश्यक सत्व नाहीसे होतात. घाण्यातून काढलेले खाद्यतेल कधीही आरोग्यासाठी चांगलंच असतं. त्यातून नैसर्गिक पोषणमूल्य योग्य प्रमाणात मिळतात. कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. शेंगदाणा, मोहरी, खोबरे आणि सूर्यफूल यांचं घाण्याचं तेल आरोग्यासाठी उत्तम असतं.