Love Advice: कोणतंही प्रेमाचं नातं हे विश्वासावर टिकून असतं. पण एखाद्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे त्याच्या कोणत्याच कृतीला सवाल करायचा नाही असं नाही. उलट नात्यात पारदर्शकता हवी असेल तर दोन्ही जोडीदारांनी काही प्रश्न एकमेकांना आवर्जून विचारायला हवेत. यामुळे आपण समोरच्याच्या आयुष्यात किती रस घेतो हे तर समजतेच पण नात्याची गाठ आणखी मजबूत व्हायला मदत होते. पण याच्या अगदी उलट असे काही प्रश्न सुद्धा आहेत जे तुम्ही तुमच्या जोडीदाराला विचारले तर कितीही प्रेम असलं तरी तुमच्या नात्यात सुरुवातीला कटुता येऊ लागते आणि कालांतराने नात्यात कायमची फूट सुद्धा पडू शकते.
तुमच्या जोडीदारासोबत सतत भांडणं होत असतील तर कदाचित तुम्ही नकळत कधीतरी विचारलेले हे प्रश्न सुद्धा कारणीभुत असू शकतात. आता हे नेमके प्रश्न काय आणि त्याच्या ऐवजी तुम्ही काय पर्यायी प्रश्न करू शकता हे आपण जाणून घेऊयात..
Ex शी तुलना नकोच
आपल्या जोडीदाराच्या भूतकाळाविषयी जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक असतो. पण असे करणे टाळावे. चुकूनही तुलना करणारे प्रश्न विचारू नका, उदा. मी चांगली आहे की ती? ती माझ्यापेक्षा चांगली दिसत होती का? असे प्रश्न तुमच्यातील कमी आत्मविश्वास दाखवतात. हा स्वभाव कोणत्याच पार्टनरला आवडत नाही. जर तुम्हाला भूतकाळाविषयी माहिती हवीच असेल तर थेट प्रश्न करा, त्याआधी जोडीदार याविषयी बोलण्यास तयार आहे का हे सुद्धा विचारून घ्या.
आई वडिलांविषयी विशेष काळजी
ही समस्या सहसा विवाहित जोडप्याच्याबाबत घडते. जर का तुमचा जोडीदार त्याच्या आई- वडिलांसाठी काही करू इच्छित असेल तर ‘का?’ असा प्रश्न चुकूनही करू नका. जर तुम्हाला आर्थिक समस्येमुळे अमुक गोष्ट होऊ नये असे वाटत असेल तर त्यावर काय उपाय करता येईल याविषयी जोडीदारशी चर्चा करा. तसेच एक्स प्रमाणेच आई वडिलांशी सुद्धा स्वतःची तुलना करू नका.
(Flirting मुळे वाढतंय Confusion? मैत्रिणींनो, नात्यात ‘या’ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका)
मित्रांच्याबाबत सावधान
अनेकदा मित्रांवरून नात्यात भांडणे होणे सामान्य आहे. विशेषतः मुलीचे मित्र आणि मुलाच्या मैत्रिणी या भांडणाला कारण ठरतात. पण अशा बुरसटलेल्या विचारात अडकू नका. तुम्हाला जर असे वाटत असेल की जोडीदाराच्या मित्रांमुळे तुमच्याकडे दुर्लक्ष होत आहे तर जोडीदाराला तुमच्यासोबत प्लॅन करता येतील का? कुठे जाऊयात असे प्रश्न करा. पण तुला सतत मित्रांसोबत का फिरायचं हा प्रश्न चुकूनही करू नका. एखाद्यावेळेस तुम्हाला पार्टनरच्या “फ्रेंड्स” वरून संशय येत असेल तर स्पष्ट संवाद साधा
पासवर्ड
फोनचा पासवर्ड काय? सोशल मीडियाचे पासवर्ड काय हे प्रश्न नात्यात कटुता आणतात. तुम्ही हट्ट केल्यास तुम्हाला कदाचित तुमचा जोडीदार पासवर्ड देईल पण तुमचा अविश्वास बघता तुमच्यापासून गोष्टी लपवणे हिताचे आहे असे त्यांना वाटू शकते. जर तुम्हाला पार्टनरच्या फोनमधील एखादी गोष्ट पाहायची असेल किंवा फोन वापरायचा असेल तर तसे थेट विचारा.
पगार
तुमचा पार्टनर काय कमावतो हे तुम्हाला समजणे आवश्यक असले तरी तुम्ही मुद्दाम विचारणे गैर ठरेल. विवाहित जोडप्याने याविषयी स्पष्ट संवाद साधावा. मात्र वारंवार इतक्या पैशाचं काय केलं? तुझे पैसे कुठे खर्च झाले हे विचारणे टाळा. अविवाहित जोडप्यांमध्ये यावरून विनाकारण गैरसमज होऊ शकतात.
दरम्यान यावरून आपल्या लक्षात आले असेल की कोणताही प्रश्न थेट विचारल्यास तुमचा फायदा आहे, त्यामुळे आढेवेढे घेणे टाळा.