नातेसंबंध म्हटले की भांडणे ही ओघाने आलीच. त्यात नवरा-बायकोमधील भांडण म्हटलं की त्याची चर्चा अधिकच रंगते. येणारा प्रत्येक दिवस सगळे गोडीने जाईलच असे नाही. कधीकधी एखाद्या लटक्या भांडणामुळे नात्यामधली मजा आणखीनच वाढते. पण दीर्घकाळ आणि सातत्याने तुमचे नवऱ्याशी भांडण होत असेल तर त्यामुळे कौटुंबिक स्थितीत एकप्रकारचा तणाव निर्माण होतो. त्यामुळे सतत भांडण होत असल्यास दोघांपैकी एकाला ते मिटण्यासाठी पुढाकार घ्यावाच लागतो. भांडण मिटविण्यासाठीच्या काही खास टिप्स…

एकमेकांची परिस्थिती समजून घ्या

तुमचा साथीदार ऑफिसमधील कामे किंवा घरातील काही ताण यांमुळे वैतागलेला असण्याची शक्यता आहे. त्यांना एकटे बसून हा सगळा ताण घालवावासा वाटत असेल. त्यामुळे कधीतरी तो किंवा ती विनाकारण चिडचिड करेल तेव्हा दुसऱ्याने परिस्थिती समजून घ्यावी. आणि समोरच्याला नेमक्या काय अडचणी आहेत ते समजून घ्यावे.

आधी ऐकून घ्या आणि मग प्रतिक्रिया द्या

भांडण झाल्यानंतर जर तुम्ही एकमेकांशी वाद घालत असाल तर दोघांनीही लगेच एकमेकांना उत्तरे देण्याची आवश्यकता नाही. अशावेळी इगो बाजूला ठेऊन शांतपणे दोघांनीही एकमेकांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे. त्यामुळे नेमका मुद्दा काय आहे त्यावर चर्चा होईल आणि भांडण मिटण्यास मदत होईल.

तिसऱ्या व्यक्तीला अजिबात मधे घेऊ नका

नवरा-बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्या व्यक्तीला घेणे ही अतिशय मोठी चूक ठरु शकते. तिसऱ्या व्यक्तीला मधे आणल्यास दोघांनाही असुरक्षित वाटू शकते. तसेच यामुळे भांडण कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीला मधे घेण्याचा पर्याय अतिशय चुकीचा ठरतो.

भांडण मिटविण्याचा प्रयत्न करा

भांडण झाले असल्यास दोघांपैकी एकाने शांतपणे घेणे आवश्यक आहे. दोघांनीही एकमेकांचे म्हणणे शांतपणे नीट ऐकून आणि समजून घ्यायला हवे. त्यामुळे भांडण लवकर मिटण्यास मदत होईल.

माघार घ्यायला शिका

तुम्हाला कोणती गोष्ट महत्त्वाची आहे हे ठरवा. त्यामुळे काही गोष्टी सोडून देणे महत्त्वाचे असते. एखादे भांडण मिटत नसेल तर ते तिथेच सोडून देऊन पुढे जाणे महत्त्वाचे आहे. भांडणापेक्षा नाते आणि ती व्यक्ती आपल्यासाठी जास्त महत्त्वाची असते हे लक्षात ठेवायला हवे.