ब्रेकअप म्हणजे दोन व्यक्तींमधील नाते संपुष्टात येणे होय. ब्रेकअपनंतरचा काळ हा खूप वेदनादायी असतो. ब्रेकअपनंतर फक्त नाते तुटत नाही; तर भावनासुद्धा दुखावतात. अशा वेळी काय करावं, कसं वागावं हे कळत नाही. मग फक्त एकच पर्याय उरतो तो म्हणजे मूव्ह ऑन करणे म्हणजेच ब्रेकअपमधून बाहेर पडणे आणि स्वत:ला वेळ देणे; पण हे प्रत्येकाला सहज जमत नाही.
अनेक रिलेशनशिप एक्स्पर्ट सांगतात की, ब्रेकअपनंतरचे २१ दिवस खूप महत्त्वाचे असतात. या २१ दिवसांमध्ये स्वत:ला वेळ देणे खूप जास्त गरजेचे असते. २१ दिवस एकटे राहणे का गरजेचे आहे? चला तर जाणून घेऊ या.
२१ दिवसच एकटे का राहावे?
ब्रेकअपनंतरच्या प्रत्येक दिवशी व्यक्तीच्या भावना बदलत असतात. असे मानले जाते की, संबंधित व्यक्ती तीन आठवड्यांत ब्रेकअप स्वीकारू शकतात; मात्र असे प्रत्येकाबरोबरच होईल, असे नाही. पण, २१ दिवसांत व्यक्तीचा मेंदू चांगल्या प्रकारे कोणत्याही परिस्थितीचा सामना करू शकतो.
भावनांवर आवर घाला
ब्रेकअपनंतर माणसाच्या मनातील भावना वेगवेगळ्या रूपांत बाहेर पडतात. ती व्यक्ती कधी दु:खी; तर कधी उदास असते. कधी रागीट; तर कधी एखाद्या गोष्टीचा तिरस्कार करते. अनेकदा मनावरील ताण (स्ट्रेस) वाढल्यामुळे मानसिक आरोग्य खालावते आणि व्यक्ती नैराश्यग्रस्त होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे भावनांना आवर घालणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत स्वत:ला सांभाळणे आवश्यक आहे.
स्वत:ला व्यक्त होण्याची संधी द्या
ब्रेकअपनंतर दु:ख हे होणारच, हे स्वाभाविक आहे. त्यामुळे हे दु:ख समजून घ्या आणि व्यक्त व्हा. ब्रेकअपमधून बाहेर पडण्याची ही पहिली पायरी असते.
आत्मचिंतन करा
ब्रेकअपनंतर आत्मचिंतन करणे खूप जास्त गरजेचे आहे. ब्रेकअप कशामुळे झाले? तुमची काय चूक होती? समोरच्याची काय चूक होती? या बाबींचा विचार करा. झालेल्या चुकांपासून शिका आणि तशा चुका पुन्हा करू नका. स्वत:च्या अपेक्षा, गरजा आणि आनंद ओळखा.
स्वत:ला सावरण्यासाठी वेळ द्या
ब्रेकअपनंतर स्वाभिमानाला धक्का बसतो. अशा वेळी स्वत:ला वेळ द्या. जर तुम्ही स्वत:ला वेळ न देता, ब्रेकअपनंतर लगेच नव्या व्यक्तीबरोबर नाते सुरू करण्याचा प्रयत्न करीत असाल, तर ते नाते अपयशी ठरू शकते. त्यामुळे ब्रेकअपनंतर स्वत:ला सावरण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)