Republic Day 2025 Quotes Sologans Poem Charoli : देशभरात २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने लोकशाही राज्यघटना अमलात आणली. त्यामुळे भारतीय राज्यघटनेचे कलम, कायद्याचे पालन करून देशात शांतता सुव्यवस्था राखता येते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभरात आनंद अन् उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. या दिवशी देशभरात सर्व ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शाळा, महाविद्यालये, इमारती आणि सरकारी, बिगरसरकारी कार्यालयांत तिरंगा फडकवला जातो. तसेच देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना देशभक्तीपर कविता, शायरी, घोषवाक्ये पाठवतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी देशभक्तीपर आधारित काही खास मराठी कविता, शायरी आणि घोषवाक्ये घेऊन आलोत.
प्रजासत्ताक दिन २५ जानेवारी २०२५ साठी चारोळ्या | Republic Day Charoli In Marathi
१) जे देशासाठी लढले
ते अमर हुतात्मे झाले!
सोडिले सर्व घरदार
त्यागिला सुखी संसार!
२) स्वातंत्र्यवीरांना करूया…
शतश: प्रणाम!
त्यांच्या नि:स्वार्थी त्यागानेच…
भारत बनला महान
3) उत्सव तीन रंगांचा..
आभाळी आज सजला!
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी भारत देश घडवला!
४) मंगल क्षणी या निनादण्याचे
भाग्य लाभले चौघड्याला
आसमंत तिरंग्यांनी नटले
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला….
देशभक्तीपर मराठी कविता | Republic Day 2024 Marathi Songs and Poem
१) सागरा प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मीं नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊं । सृष्टिची विविधता पाहूं
तइं जननी-हृद्विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्ठिं वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलों या तव वचनीं । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उद्धरणीं । मी
येईन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला
- स्वातंत्र्यवीर सावरकर
२) बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो॥
हे कंकण करि बांधियले जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मरायाला हो॥१॥
वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास अर्पीन
हा तिमिर घोर संहारीन या बंधु सहायाला हो॥२॥
हातात हात घालून हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून या कार्य करायाला हो॥३॥
करि दिव्य पताका घेऊ प्रिय भारतगीते गाऊं
विश्वास पराक्रम दावू ही माय निजपदा लाहो॥४॥
या उठा करु हो शर्थ संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ भाग्यसुर्य तळपत राहो॥५॥
ही माय थोर होईल वैभव दिव्य शोभेल
जगतास शांति देईल तो सोन्याचा दिन येवो॥६॥
- साने गुरुजी
३) हे राष्ट्र देवतांचे
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन् तथागताचे
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे
येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
- ग. दि. माडगूळकर
४) खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
- साने गुरुजी
प्रजासत्ताक दिनानिमित्त थोरांचे विचार | Republic Day Quotes In Marathi
१) न्याय आणि व्यवस्था हे राजकारणाचे महत्त्वाचे भाग आहेत. यापैकी एकाही भागाला दुखापत झाली तरी औषध हे करावेच लागते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
२) या.. आपण सगळ्यांनी मिळून शांती, सद्भाव आणि प्रेमाने यात्रा सुरू करूया.– अटल बिहारी वाजपेयी
३) प्रजासत्ताकचा अर्थ एक राष्ट्र, एक भाषा आणि एक झेंडा – एलेग्जेंडर हेन्री
४) चुका करण्याची मुभा आपल्याला नसेल, तर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नाही. – महात्मा गांधी
५) स्वातंत्र्य घेण्याचे नाही, तर देण्याचे नाव आहे – नेताजी सुभाषचंद्र बोस
प्रजासत्ताक दिन मराठी घोषवाक्ये | Republic Day Message In Marathi
१) प्रजासत्ताक दिन चिरायू होवो
२) भारतीय राज्यघटन जगात आहे महान
तिच्या रक्षणाचे सदा ठेवूया भान
३) विविधतेत एकता आमची शान,
भारत देश आमचा महान
४) प्रजासत्ताक दिनाचा विजय असो