Republic Day 2025 Speech Ideas : दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने देशभरात सध्या जोरदार तयारी सुरू आहे. यंदा भारत ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. १९५० रोजी या दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली. त्यामुळे हा राष्ट्रीय उत्सवाचा दिवस असतो. २६ जानेवारीनिमित्त दरवर्षी नवी दिल्लीतील इंडिया गेटपासून भव्य परेड समारंभ आयोजित केला जातो. यावेळी देशातील विविधता, सार्वभौमत्व, अखंडता यांचे दर्शन घडते. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशभरातील शाळा, महाविद्यालये, कार्यालयांत आणि इतर अनेक ठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देशभक्तीपर गाणी, नाटक आणि विविध राज्यांतील प्रसिद्ध लोकनृत्येही सादर केली जातात. त्यासह विविध मान्यवर व्यक्तींकडून देशभक्तीशी निगडित विचार मांडले जातात. यंदा तुम्हीही प्रजासत्ताक दिनी विचार मांडण्यासाठी उत्तम भाषणाच्या शोधात असाल, तसेच कमी वेळेत प्रभावी भाषण कसे द्यायचे याविषयी आयडिया सर्च करीत असाल, तर आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही प्रजासत्ताक दिनी दमदार भाषण द्याल आणि प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाटातून दाद मिळवाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण (Republic Day Speech Ideas for Students)

सर्व आदरणीय अतिथिगण, शिक्षक, मुख्याध्यापक, माझे प्रिय सहकारी आणि इतर सर्व उपस्थितांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आज आपण सर्व जण २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. या दिवशी म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. तेव्हापासून प्रजासत्ताक दिन दरवर्षी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी या दिवशी विजय चौकापासून संचलन सुरू होते आणि कर्तव्य मार्गाने लाल किल्ल्यावर जाते. या संचलनामध्ये विविध राज्यांची झलक दाखवली जाते, तसेच सुरक्षा दलेही यात भाग घेतात.

१९४७ मध्ये ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने आपली राज्यघटना स्वीकारून एक लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली. भारतीय संविधान हे जगातील सर्वांत मोठे लिखित संविधान आहे आणि ते आपल्या लोकशाही अधिकारांचे संरक्षण करते. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य व न्यायाची वागणूक मिळते. जेव्हा आपण आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडू आणि समाजाप्रति असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू तेव्हाच आपण एक मजबूत आणि समृद्ध देश घडवू शकतो हे आपण समजून घेतले पाहिजे. शिक्षण, मेहनत आणि एकजुटीने आपण आपल्या देशाला जगात एक मजबूत स्थान मिळवून देऊ शकतो.

मला असे म्हणायचे आहे की, प्रजासत्ताक दिन हा केवळ सुटीचा दिवस नाही, तर तो आपल्याला आपल्या देशाप्रति असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे. आपण सर्वांनी मिळून या दिवसाचा सन्मान करू आणि आपल्या देशाला नवीन उंचीवर नेण्याची शपथ घेऊ या. धन्यवाद… जय हिंद!

२६ जानेवारीला दमदार भाषणासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स (Republic Day 2025: Speech and essay ideas in Marathi)

१) महापुरुषांच्या संघर्ष आणि बलिदानाचा करा उल्लेख

जर तुम्ही प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भाषण देणार असाल, तर सर्वप्रथम तुम्हाला भारताच्या इतिहासाची माहिती असायला हवी. इतिहासात अनेकांना स्वारस्य नसले तरी प्रत्येक भारतीय नागरिकाला देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्व, तसेच राज्यघटना यांविषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

त्या दृष्टीने तुम्ही तुमच्या भाषणातून महापुरुषांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यांनी देशाप्रति कसे बलिदान दिले याची माहिती देणे अपेक्षित आहे. तसा उल्लेख तुम्हाला करावा लागेल. तुम्ही किंवा तुमचे मूल प्रजासत्ताक दिनी भाषण करणार असेल, तर तुम्हाला भारतीय राज्यघटनेविषयी योग्य माहिती असायला हवी.

२) ऐतिहासिक तथ्ये नीट तपासून घ्या

प्रजासत्ताक दिनासाठी लिहिलेल्या भाषणातील ऐतिहासिक तथ्ये नीट तपासून घ्या. चांगला वक्ता तोच असतो, जो श्रोत्यांचे मनोरंजन करण्याबरोबरच अचूक माहितीही देऊ शकतो.

भाषणात विविध तथ्यांचा समावेश करा. उदाहरणार्थ- आपल्या राज्यघटनेचे महत्त्व, ती कोणी लिहिली किंवा आपल्या राज्यघटनेतील तरतुदी यांबद्दलच्या मुद्देसूद माहितीचा तुमच्या भाषणात योग्य रीतीने समावेश करा.

३) अशा प्रकारे करा भाषणाची सुरुवात

भाषण देण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. भाषण सुरू करण्यापूर्वी स्वतःचा परिचय करून द्या; परंतु हा परिचय सोप्या शब्दांत आणि अगदी लहान असू द्या. त्यानंतर पाहुणे आणि श्रोत्यांना अभिवादन करा. भाषणाचा मुख्य मुद्दा हा प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्वावर केंद्रित करणारा असायला हवा.

४) भाषणात प्रसिद्ध नीतिसूत्रे समाविष्ट करा

भाषणात प्रसिद्ध म्हणी वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे बोलणे प्रभावी होईल. या म्हणींचा वापर भाषण सुरू करण्यासाठी आणि समाप्त करण्यासाठी केला जाऊ शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्यघटना तयार करण्यासाठी मोलाची कामगिरी केली. त्याविषयी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची माहिती देऊ शकता. त्यांनी लिहून ठेवलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात.

५) भाषणाचा सराव करा

भाषण करण्यापूर्वी तुम्ही आत्मविश्वास येण्यासाठी आरशासमोर उभे राहून सराव करा. सराव केल्याने भाषण नीट लक्षात राहते आणि आत्मविश्वासही वाढतो. त्याशिवाय भाषणातील वाक्ये छोटी आणि साधी सोपी असू द्या; जी ऐकायला सर्वांनाच आवडतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Republic day speech bhashan poem in marathi 26 january 2025 speech ideas tips trick for students and teachers powerful topics sjr