रात्रीचे दोन वाजलेत.. काम संपता संपत नाहीये.. त्यातच जोरात भूक लागली आहे.. आणि आता अवेळी काही खावं म्हटलं तर कुठे जायचं? हा प्रश्न अनेकांनाच पडत असणार. पूर्वीसारख्या आता सर्वच नोकऱ्या आठ तासांच्या राहिलेल्या नाहीत. त्यातच दिलेली टार्गेट्स, जबाबदाऱ्या, वेळेचं गणित या साऱ्यांची जुळवाजुळव करताना जीव मेटाकुटीला येतो. ज्याच्यासाठी आपण ही सारी खटपट करतो, त्या पोटाकडे पाहणं मात्र राहूनच जातं. या समस्येवर आता बरेच नवे पर्याय आले आहेत. तर मग जाणून घेऊयात शहरात काही उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल्स, रेस्तराँ यांच्याबद्दल..
बॅचलर्स, मुंबई Bachelorr’s
मरीन ड्राईव्ह इथल्या या कॅफेमध्ये आईस्क्रीम, पिझ्झापासून सँडवीचपर्यंत सर्व काही मिळतं. इथं बसायला पुरेशी जागा नसली तरी तुम्ही पार्क केलेल्या गाड्यांपर्यंत ते ऑर्डर पोहोचवतात. पहाटे ४ वाजेपर्यंत हा कॅफे सुरू असतो. वांद्रे आणि सीएसटी परिसरातही याचे आऊटलेट्स आहेत.
सागर चायनिज, मुंबई Sagar Chinese
देसी चायनिजसाठी मुंबईतील हे हॉटेल प्रसिद्ध आहे. पहाटे ४.३० वाजेपर्यंत सुरु असणाऱ्या हॉटेलमधील ट्रिपल शेजवान राईस आणि चॉपर राईस विशेष प्रसिद्ध आहे. अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळच असल्याने या हॉटेलला चांगली ओळख मिळाली आहे.
कुठे- सुखमणी सोसायटीसमोर, १०वा रोड, जुहू
९४ हाऊस, पुणे 94 House
बर्गर, पिझ्झा, फ्राईस यांसारखं फास्ट फूड इथं मिळतं. या कॅफेतील वातावरण तरुणाईला आकर्षित करण्यासारखं आहे. पहाटे पाच वाजेपर्यंत हा कॅफे सुरू असतो.
कुठे- गणपती चौक, विमान नगर
शर्मा ढाबा, कोलकाता Sharma Dabha
झटपट आणि स्वादिष्ट जेवण या ढाब्यावर मिळतं. पोटभर जेवण्यासाठी कोलकातामधील हे उत्तम ठिकाण आहे. हा ढाबा २४ तास सुरू असतो. त्यामुळे रात्री- अपरात्री कधीही तुम्हाला स्वादिष्ट जेवण मिळू शकतं.
कुठे- बालीगंज मैदान कॅम्पजवळील बालीगंज रोडवर
लिटिल ओल कॅफे, दिल्ली Little Owl Cafe
विविध शाकाहारी आणि मांसाहासी पदार्थ या कॅफेमध्ये मिळतात. बर्गर, पास्तासोबतच इथे मिळणारी मॅगी विशेष प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर हुक्कासाठीही इथं तरुणाई मोठ्या प्रमाणावर येते. पहाटे पाच वाजेपर्यंत हा कॅफे सुरू असतो.
कुठे- सावित्री मार्केट, सेक्टर १८, नोएडा