Rose flower Gardening Tips: आपल्या बाल्कनीमध्ये विविध प्रकारची रोपं लावून त्याची शोभा वाढविण्यासाठी आपण रोज काही ना काही उपाय करीत असतो. त्यात गुलाब हे बहुतेक जणांच्या आवडीचं फूल असल्याने प्रत्येकाला त्यांच्या बाल्कनीत भरगच्च फुलांनी भरलेलं गुलाबाचं रोप हवं असतं. फुलांमुळे आपल्या बाल्कनीबरोबरच घराचीदेखील शोभा वाढते. तसेच बऱ्याच ठिकाणी नित्य जीवनक्रमात फुलांचा वापर केला जातो..
गुलाबाच्या झाडाची थोडी जरी काळजी घेतली तरी झाड वर्षभर भरगच्च फुले देत राहते. पण या झाडाला अशीच फुले येत राहण्यासाठी आणि झाड कळ्या-फुलांनी भरगच्च फुललेलं राहावं यासाठी वर्षभरात अदलून-बदलून खताचा वापर करणे महत्त्वाचं ठरतं.
आपल्या घरातल्या फळे-भाज्या यांपैकी टाकून दिल्या जाणाऱ्या बऱ्याचशा वस्तू अशा असतात की, ज्यांचा तुम्ही खत म्हणून वापर करू शकता. गुलाबाच्या झाडाला खत व पाणी देण्याबरोबरच सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन गोष्टीही योग्य प्रमाणात मिळायला हव्यात. गुलाबाची कुंडी अशा ठिकाणी ठेवा, ज्या ठिकाणी त्या झाडाला दिवसभर भरपूर ऊन मिळेल. भरपूर ऊन मिळाले, तर झाड चांगले वाढते.
गुलाबाच्या झाडासाठी खतयोग्य तीन टाकाऊ वस्तू
कांद्याच्या साली
गुलाबाच्या झाडासाठी आपण खत म्हणून ज्या ३ वस्तूंचा वापर करणार आहोत. त्यातील पहिली वस्तू म्हणजे कांद्याच्या साली. कांद्याच्या सालीमध्ये फॉस्फरस, पॉटॅशियम, सल्फर, झिंक यांसारखे पोषक घटक जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे झाडावर फुले जास्त येतात आणि फुलांचा आकारही मोठा होतो, तसेच रंगही गडद होण्यास मदत होते.
कांद्याच्या सालींचा खत म्हणून जितका वापर होतो, त्याचप्रमाणे त्यांचा कीटकनाशक म्हणूनदेखील चांगला वापर होतो. कांद्याच्या साली पाण्यामध्ये दोन दिवस भिजत ठेवायच्या. आणि जे पाणी तयार होईल. त्यात तितक्याच प्रमाणात पाणी मिसळून, तुम्ही त्या पाण्याचा फवारा झाडावर करा. तुमच्या या छोट्या; पण उपयुक्त कृतीमुळे झाडावर कोणत्याही प्रकारची कीड लागली असेल, तरी ती निघून जाण्यासाठी हे जंतुनाशक पाणी साह्यभूत ठरेल. झाडावर कीड जास्त प्रमाणात असेल, तर याचा आठवड्यातून दोन वेळा फवारा करावा म्हणजे खूप चांगला परिणाम पाहायला मिळेल.
संत्र्याच्या साली
संत्र्याच्या सालीदेखील झाडांना फुले येण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. फुले येण्यासाठी आवश्यक असणारे सगळे घटक या सालीमध्ये असतात. या साली आम्लधर्मी आहेत आणि झाडांना फुले येण्यासाठी आम्लयुक्त मातीची गरज असते. त्यामुळे या सालीचा वापर केला, तर कुंडीतील माती आम्लयुक्त होण्यास मदत मिळते.
केळीच्या सुकलेल्या साली
केळीच्या साली झाडांना कळ्या फुले जास्त प्रमाणात येण्यासाठी उपयुक्त आहेत. कारण- या सालींमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस असे पोषक घटक जास्त प्रमाणात असतात. केळीच्या साली सुकवून, त्याची पावडर तयार करा. मग या पावडरीचा तुम्ही वर्षभर खत म्हणून वापर करू शकता.
झाडाच्या बुंध्याभोवती गोल वर्तुळ करून, एक मूठभर केळी, संत्री व कांद्याच्या साली वापरा. सर्व साली मातीमध्ये मिसळून भरपूर पाणी द्या. त्यामुळे पोषण घटक झाडाच्या मुळाशी पोहोचल आणि झाडाला चांगला फायदा होईल.