Rose flower grow Marathi Gardening Tips: आपल्या बाल्कनीमध्ये विविध प्रकारची रोपं लावून त्याची शोभा वाढविण्यासाठी आपण रोज काही ना काही उपाय करीत असतो. त्यात गुलाब हे बहुतेक जणांच्या आवडीचं फूल असल्याने प्रत्येकाला त्यांच्या बाल्कनीत भरगच्च फुलांनी भरलेलं गुलाबाचं रोप हवे असते. फुलांमुळे आपल्या बाल्कनीबरोबरच घराचीदेखील शोभा वाढते. तसेच फुलांचा वापर रोजच्या जीवनात बऱ्याच ठिकाणी केला जातो.
रोप लावणं, खतपाणी घालणं, खत बदलणं, त्याला सूर्यप्रकाश मिळावा यासाठीची धडपड आपण अनेकदा करीत असतो. बरं एवढं सगळं करून जर रोपाची नीट वाढ झाली आणि भरगच्च फुलं आली, तर ठीक; नाही तर अनेकदा झाडाला कीड लागणं, कळ्या न येणं अशा समस्यांना सामोरं जावं लागतं. पण, योग्य त्या खताचा वापर करून आपल्याला हे टाळता येऊ शकतं. तसंच गुलाबाला भरपूर फुलं यावीत यासाठीही अनेक घरगुती उपाय केले जाऊ शकतात.
SP गार्डनिंग मराठी या यूट्यूब चॅनेलवर गुलाबाच्या खताबाबत, तसंच कीड लागू नये आणि भरपूर फुलं यावीत याबाबत घरगुती उपाय सुचवले आहेत.
कीड न लागण्यासाठी हळदीचा वापर (Turmeric Usage to prevent insects )
गुलाबाच्या झाडाला कीड लागू नये किंवा जर कीड लागली असेल, तर ती दूर करण्यासाठी वा मारण्यासाठी हळदीचा वापर दोन प्रकारे केला जातो. हळद ही बुरशीनाशक, कीटकनाशक असते.
हळदीचा वापर क्रमांक- १
- एक लिटर साधं पाणी घेऊन, त्यात एक चमचा हळद व्यवस्थित मिश्र करून घ्यावी.
- या तयार केलेल्या पाण्याचा गुलाबाच्या झाडावर व्यवस्थित फवारा मारून घ्यावा. या पाण्याच्या मदतीनं जर झाडांना कोणत्याही प्रकारची कीड लागली असेल, तर ती दूर होण्यास मदत होते.
हळदीचा वापर क्रमांक- २
- हळदीचा दुसऱ्या प्रकारे वापर करण्यासाठी कोरडी हळद अर्धा चमचा मातीमध्ये मिश्र केली, तर त्याचादेखील कीड न लागण्यासाठी खूप चांगला फायदा होऊ शकतो.
गुलाबाच्या वाढीसाठी वापरा ही खते (Fertilizers for Rose Flower Growth)
- गुलाबाची वाढ चांगली व्हावी आणि त्याला भरगच्च फुलं यावीत यासाठी महिन्यातून एकदा कोणत्याही एका नायट्रोजनयुक्त खताचा वापर करणंदेखील आवश्यक असतं.
शेणखताचा वापर
- शेणखतामध्ये नायट्रोजनचं प्रमाण अधिक असल्यने झाडं चांगली वाढतात आणि झाडावर जेव्हा नव्या फांद्या येतात तेव्हा त्या सुदृढ व मजबूत होण्यासाठी हे खत अतिशय उपयुक्त ठरतं.
- जर तुमच्याकडे शेणखत नसेल, तर तुम्ही गांडूळखत, कंपोस्ट यांसारख्या खतांचादेखील वापर करू शकता. या सर्व खतांमध्ये नायट्रोजन भरपूर प्रमाणामध्ये असतं. मात्र जेव्हा तुम्ही शेणखतांचा वापर झाडांसाठी करता, तेव्हा ते जुनं किंवा कुजलेलं असावं, तरच त्याचा झाडाला चांगला फायदा होतो.
- गुलाबाच्या झाडाला खतांप्रमाणेच भरपूर सूर्यप्रकाश मिळेल या दृष्टीनंही काळजी घ्यावी. फुलझाडं अशा ठिकाणी ठेवावीत की जिथे दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश मिळेल. त्यामुळे त्या झाडाची चांगली वाढ आणि फुलं जास्त प्रमाणात मिळण्यास मदत होते.
- कुंडीतील माती दर १५ ते २० दिवसांनी हलवून मोकळी करायची. असं केल्यानं कुंडीतील माती भुसभुशीत राहते, प्राणवायू खेळता राहतो आणि झाडांची वाढ उत्तमरीत्या होते. तसंच खत मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिसळतं.
चुन्याचा वापर
खायच्या चुन्यात कॅल्शियम असल्यानं झाडाच्या खतासाठी चुन्याचादेखील वापर होऊ शकतो. त्यामुळे झाडाच्या फांद्या मजबूत होतात आणि भरगच्च फुलं येण्याचं प्रमाण वाढतं.
कृती
- एक ते दोन ग्रॅम चुन्याचा वापर करून, ते पाणी तयार करून घ्यायचं
- कुंडीतील माती हलवून गोल वर्तुळ तयार करायचं. त्यात दीड ते दोन मूठ शेणखत आणि तयार केलेलं चुन्याचं पाणी महिन्यातून एकदा द्यायचं. असं केल्यानं झाडाची वाढ चांगली होते आणि कळ्या येण्याचं प्रमाण वाढतं.