केस हे स्त्री सौंदर्याचे एक मुख्य लक्षण असते. लांबसडक घनदाट केशसंभार स्त्रीच्या सौंदर्यात कैक पटींने वाढ करतो. या केसांची बांधणी करताना त्यांना सुवर्णालंकाराची जोड दिल्यास या नटण्याला एक राजेशाही झालर येत असते. सध्याच्या तरुणाईला ऐतिहासिक पेहराव आणि श्रृंगाराने आकर्षित केले आहे. त्यामुळे इतिहासकालीन व्यक्तिमत्त्वांनी वापरलेल्या दागिने आणि त्यांच्या केशभूषांची भुरळ या फॅशनेबल युगातही कायम आहे. आजच्या आघाडीच्या स्त्री सौंदर्यात भर टाकणाऱ्या केशभूषकांनी (हेअर ड्रेसरनी) आता केसांची सुरेख बांधणी करताना राजे-महाराजांच्या काळातील हेअर ज्वेलरीकडे मोर्चा वळवला आहे.
फॅशनचा अर्थ मुळात नवीन आणि जुन्या संकल्पनांचे मिश्रण. बदलत्या काळाबरोबर फॅशनमध्येही फरक दिसून येत आहे. फॅशनजगतावर चित्रपटसृष्टींचा मोठा प्रभाव दिसून येतो. एखादी फॅशन चित्रपटांधून चित्रित झाली की लगेचच तिचे मोठय़ा प्रमाणात अनुकरण केले जाते. थोडक्यात फॅशन आणि चित्रपट या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नव्या हेअर ज्वेलरी म्हणजेच केशालंकार किंवा केशाभूषणे जुन्या काळातील फॅशनचा आणि चित्रपटांचा प्रभाव दिसून येतो. ‘बाजीराव मस्तानी’ ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘उमराव जान’ अशा चित्रपटांमध्ये हेअर ज्वेलरी मोठय़ा प्रमाणावर दाखविण्यात आली होती. केसांसाठी वापरण्यात येणारे दागिने भारतीय-मुघल शैलीत बनवण्यात येतात. अशा प्रकारच्या दागिन्यांची भुरळ ठाणेकरांनाही पडताना दिसून येते. सध्या ठाण्याच्या बाजारांमध्ये केशालंकारांला अधिक मागणी आहे.
तरुणींची आवड लक्षात घेऊन कारागिरांनी अशी केसांची आभूषणे बाजारात आणली आहेत. यामध्ये पारंपरिक जुडा पिन, टीकली, बिंदी, हेअर पिन, मुकुट, वेणी अशा दागिन्यांचा समावेश होतो. लांब केस असलेल्या तरुणी केसांचा काही भाग वेणीने सजवून त्यामध्ये हेअर पिन्स, मुकुट, बिंदी यांनी सजवू शकतात. तसेच आंबाडा घालून तो जुडा पिनने सजवता येऊ शकतो. आंबाडय़ाचा एका बाजूचा भाग लटकणे लावून सजवता येतो. तसेच एखादी केशभूषा करून तीही केश दागिन्यांनी सजवल्यावर छान दिसते. लेहंगा, साडी, सलवार कुर्ता अशा ड्रेसवर अशी केशभूषा शोभून दिसते. अशी माहिती ठाण्यातील सुरभि ब्युटी केअरच्या प्रणाली यांनी दिली. केशभूषणांमध्ये कुंदन, जरदोसी, सिक्किन यांचा वापर केला जातो. काहीजणी सोन्याची हेअर ज्वेलरी खरेदी करतात. बजेट कमी असेल तर चांदीवर सोन्याचा मुलामा केलेली ज्वेलरीही बाजारात उपलब्ध आहे. याशिवाय मेटलची हेअर ज्वेलरीसुद्धा पाहायला मिळते. अशा प्रकारच्या हेअर ज्वेलरीने केशरचनेचे सौंदर्य द्विगुणित केले जाते. राजस्थान हा आपल्याकडचा दागिन्यांच्या बाबतीत सगळ्यात श्रीमंत प्रदेश म्हटला पाहिजे. घसघशीत मोठाल्या आकाराचे अलंकार हे इथलं वैशिष्टय़. हल्ली केशभूषणांवर पानं, फुलं, वेली, मोर, पोपट, कोयऱ्या यांचाच प्रभाव जास्त दिसतो. अशा नक्षीचा केशालंकार हा सध्या सर्वाधिक लोकप्रिय आहे. मूद, अग्रफूल, वेणी, गुलाब, चाफा यासारखी फुले सोन्यात घडविली जात, पंरतु आता अशा प्रकारचे दागिने कॉपर, सिल्व्हरमध्येही तयार केले जातात.
काही पारंपरिक केशालंकार..
दक्षिणेकडे मानेवर रुळणाऱ्या वेण्या वापरण्याची पद्धत होती. त्याचप्रमाणे तिथे भांगाच्या एका बाजूला सूर्य तर दुसऱ्या बाजूला चंद्र घातला जात असे. तशाच नागाच्या आकाराच्या वेण्या असत. गुजरातमध्ये पोतीचेवा मण्यांचे केशालंकार वापरतात. ओरिसात फिलिग्रीमधली फुलं वा वेण्या विवाहासमयी वधूला घालण्याची पद्धत होती. उत्तरेकडे परांदे वापरण्याची आजही पद्धत आहे. भारतातल्या प्रत्येक प्रदेशातील पारंपरिक अलंकार हे वैविध्यपूर्ण आहेत. आपल्याकडे विविध प्रदेशांतील अलंकारांची ही ओळख होती. आज अलंकार वापरण्याच्या पद्धती बदलल्या असतील, कालच्यापेक्षा आणखी नवे प्रकार आले असतील; पण ते सगळे प्रकार म्हणजे जुन्या अलंकारांनी धारण केलेले नवे रूप आहे. अलंकार म्हटले की आपण सोन्या-चांदीसारखे महागडे धातू वा हिरे, मोती, पोवळी, आदींचाच विचार करतो. पण आपल्याकडे याशिवायही वेगळे अलंकार घडतात, जे पूर्वी तिथली संस्कृती म्हणून वापरले जात, तर आज त्यांची फॅशन तरुणांमध्ये रूढ आहे. या सगळ्या प्रकाराचे दागिने ठाण्यात विविध ठिकाणी उपलब्ध झाले असून समारंभाला जाताना ते परिधान करण्यास प्राधान्य दिले जाते. आपण कोणत्याही संस्कृतीतले असलो तरी या वेगळ्या राज्यातील संस्कृतीचे दागिने एखाद्या प्रसंगी घालण्यास काहीच हरकत नाही.
केशभूषणांची ओळख
जुडा पीन- हा अलंकार सध्या तरुणींच्या सर्वाधिक आवडीचा दागिना बनला आहे. यामध्ये धातूने बनलेल्या चंद्राच्या विरुद्ध प्रतिकृतीवर मोती-हिऱ्यांनी एक आकर्षक रूप देऊन जुडा पीन तयार केले आहे. यामध्ये पीनसोबत साखळीही बाजारात उपलब्ध आहे.
ब्रोच- गजऱ्याला पर्याय म्हणून हा दागिना वापरला जातो. जाड धातूच्या तारेला आकर्षक रंगीत धाग्यांच्या साहाय्याने विणकाम करून सुंदर फुलांच्या लांब गुच्छ किंवा गजऱ्याचा आकार या दागिन्याला दिला जातो. हा आंबाडय़ाच्या एका बाजूला किंवा वरच्या बाजूला लावल्यावर केसांचे रूप अधिक खुलते.
वेणी- लांबसडक केसांना आकर्षक नक्षी म्हणजे विविध आकाराच्या वेण्या. परंतु केवळ काळ्याभोर लांबसडक वेणीला जर सोनेरी फुलांचा पट्टा लावल्यावर तिच्या सौंदर्यात अधिक भर पडते. अशा प्रकारचे वेणींसाठी खास वैविध्यपूर्ण पट्टे बाजारात उपलब्ध आहेत.
झुमर किंवा पास्सा- हा दागिना मुस्लीम तरुणींचा पारंपरिक दागिना आहे. कपाळाच्या डाव्या बाजूला झुंबरासारखा हा दागिना परिधान केला जातो. सध्या बाजीराव मस्तानी चित्रपटामुळे या ‘पास्सा’ अधिक लोकप्रियता प्राप्त झाली आहे.
चेन – हल्ली राजेशाही केशालंकारांची चलती आहे. त्यामध्ये राजस्थानी केशभूषणांना तरुणी सर्वाधिक पसंती देऊ लागल्या आहेत. या अलंकाराचे वैशिष्टय़ म्हणजे हा अलंकार संपूर्ण केसांना लावला जातो. भांगाच्या मध्यभागी एक बिंदीया लावली जाते, तिच्या दोन्ही बाजूला पाच ते सहा मोत्यांच्या किंवा हिऱ्याच्या चैनी लावलेल्या असतात. जेणेकरून संपूर्ण केस त्याखाली झाकले जातात.
फॅशनबाजार : केशभूषणांचा राजेशाही थाट..
तरुणींची आवड लक्षात घेऊन कारागिरांनी अशी केसांची आभूषणे बाजारात आणली आहेत.
Written by शलाका सरफरे
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-02-2016 at 03:08 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Royal hair style