Rujuta Diwekar Shared Weight Loss Tips : आपल्यातील बऱ्याच जणांना वजन कमी करायचेय, तर कोणाला वजन वाढवायचेय, तर कोणाला फिट राहायचेय. पण हे सगळं करताना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. कोणाला जास्त खावे लागते, तर कोणाला खाण्यावर अनेक बंधने ठेवावी लागतात. जाड होणे किंवा बारीक होणे आपल्याला शोभेल (सूट) होईल का? असा विचार आपल्या मनात फेर धरून नाचू लागतो. पण, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण- सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांनी इन्स्टाग्रामवर तीन टिप्स शेअर केल्या आहेत; ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील चमक कायम राहून, वजन कमी करण्यास मदत होईल.
चेहऱ्याची शोभा किंवा त्वचेची चमक न गमावता वजन कमी करण्याचे ३ सोपे मार्ग खालीलप्रमाणे –
१. जेव्हा आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्या सर्वांना लगेच त्याचा परिणाम हवा असतो. ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांचा सल्ला एक वर्षाचा आहे. त्या म्हणतात की, २० दिवसांत १० किलो कमी वजन कमी करण्याचे आश्वासन देणाऱ्या आकर्षक (ट्रान्स्फॉर्मेशन) व्हिडीओंकडे दुर्लक्ष करा. त्याऐवजी एका वर्षात तुमच्या शरीरातील फक्त पाच ते १० टक्के फॅट्स (चरबी) कमी करण्याचे लक्ष्य ठेवा. ही पद्धत आरोग्यदायी आहे आणि तुमच्या त्वचेवरील नैसर्गिक चमक कमी न करता, त्यामुळे वजन कमी करण्यासही मदत होईल.
२. वजन कमी करण्यामध्ये व्यायामाची मोठी भूमिका असते. पण, जास्त व्यायाम करूनही चालणार नाही. तुम्ही नुकतेच वजन कमी करण्यास सुरुवात केली असल्यास, सोपे आणि छोटे ध्येय सेट करा. ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) सुचवतात की, दररोज स्वतःवर व्यायाम करण्यासाठी दबाव आणण्याऐवजी महिन्यातून सात दिवस व्यायाम करायला सुरुवात करा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शरीराला रिकव्हर होण्यासाठी पुरेशी विश्रांती देऊ शकाल. जसे तुम्हाला सोईस्कर वाटेल त्याप्रमाणे हा व्यायाम महिन्यातून सातऐवजी २० दिवसांपर्यंत वाढवू शकता. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला आवश्यक असणारी विश्रांती द्याल, तेव्हा तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक आणखीन वाढते.
३. वजन कमी करण्याच्या प्रवासातील एक सगळ्यात मोठी आणि सामान्य चूक म्हणजे कर्बोदके आणि साखर पूर्णपणे आहारातून काढून टाकणे. हा पौष्टिक पर्याय नसला तरीही मध्यम प्रमाणात त्यांचे सेवन करणे ठीक आहे. ऋजुता दिवेकर (Rujuta Diwekar) यांच्या मते, सर्वांत मोठी समस्या म्हणजे पॅक केलेले स्नॅक्स आणि बरेचदा बाहेर खाणे यावर अवलंबून राहणे. त्याऐवजी घरी शिजवलेल्या जेवणावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या आहारात सर्व काही समाविष्ट असेल याची खात्री करा. अशा प्रकारे तुम्ही तुमची चेहऱ्याची चमक न गमावता, तुमचे वजन कमी करण्याचे लक्ष्य अगदी सहज गाठू शकाल.
वजन कमी करण्याच्या प्रवासात तुमची त्वचा चमकदार ठेवायची असेल, तर पुढील पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करा
बीटरूट, दही, हळदीचे दूध, पालक, लिंबू, फ्लेक्ससीड्स व डाळिंब. अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक पोषक घटकांनी युक्त पदार्थ तुमची त्वचा मोकळी आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करतात.