कधी एखाद्या सहलीला जाण्यासाठी तर कधी कामानिमित्त नाहीतर नातेवाईकांकडे जाण्यासाठी आपण रेल्वेने प्रवास करतो. रेल्वे प्रवासाला जास्त वेळ लागत असला तरीही तो आरामदायी असतो. याशिवाय रेल्वेचा प्रवास फारसा खर्चिकही नसतो. मात्र रेल्वेने प्रवास करत असताना काही किमान नियम पाळणे आवश्यक असते. यासाठी त्या नियमांची पुरेशी माहितीही असायला हवी. त्यामुळे आपला रेल्वे प्रवास जास्त सुखाचा होऊ शकतो. आता काय आहेत हे नियम आणि ते पाळल्यामुळे आपला काय फायदा होतो याविषयी…

१. मधली सीट वापरण्याची वेळ

रेल्वेमध्ये थर्ड एसी आणि स्लिपरसाठी ३ सीट असतात. यामध्ये वरच्या दोन सीटवरील लोक दिवसा खालच्या सीटवर एकत्र बसतात. मधले सीट जर वर केले तर खालच्या सीटवरील लोकांना व्यवस्थितपणे बसता येत नाही. त्यामुळे यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष नियम केला आहे. त्यानुसार प्रवाशांना रात्री १० ते सकाळी ६ या वेळातच मधले सीट उघडता येईल असे स्पष्टपणे म्हणण्यात आले आहे. त्यानंतरही प्रवाशाने हे सीट उघडे ठेवले तर ते नियमाच्या विरोधात असल्याने या प्रवाशाच्या विरोधात तक्रार होऊ शकते.

२. श्रेणी अपडेट करता येणार

तुम्ही तिकीट काढल्यानंतर काही वेळा ते वेटिंगवर असते. स्लीपरमध्ये तिकीट वेटिंगवर असेल आणि थर्ड एसीमध्ये जागा रिकाम्या असतील तर तुम्हाला ही सीट मिळू शकतात. थर्ड एसीमध्येही सीट नसतील तर सेकंड एसीमध्ये जागा असल्यास तिथे जागा नक्की होऊ शकते. ही सुविधा रेल्वेने नव्याने सुरु केली असून ती ग्राहकांसाठी अतिशय फायदेशीर आहे. विशेष म्हणजे ही अपग्रेड करण्याची सुविधा प्रवाशांना मोफत देण्यात आली आहे. मात्र रेल्वे आरक्षण करताना सीट अपग्रेडेशन असा एक पर्याय असतो. त्यावर क्लिक केल्यासच ही सुविधा मिळू शकते.

३. रेल्वेला उशीर झाल्यास पैसे परत

आपल्याकडे अनेकदा विविध कारणांनी रेल्वे उशीरा येतात. यामध्ये रेल्वेला तीन तासांहून जास्त वेळ उशीर झाला आणि तुम्ही तिकीट रद्द केले तर तुम्हाला तिकिटाची पूर्ण रक्कम परत मिळते. यामध्ये एकही रुपया कापला जात नाही. मात्र रेल्वेला उशीर झालेला नसला आणि आपण तिकीट रद्द केले तर २५ ते ५० टक्केच रक्कम परत मिळते.

४. ओळखीचा वैध पुरावा

तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्याकडे तुमच्या ओळखीचा पुरावा असणे आवश्यक असते. हा पुरावा म्हणून तुमच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे नसतील तर तुम्ही आरक्षित केलेल्या जागेवर हक्क सांगू शकत नाही. त्यामुळे विना ओळखपत्र प्रवास करणे रेल्वेच्या नियमांनुसार चुकीचे आहे.

Story img Loader