जगातील सर्वात महागड्या iPhone ची एन्ट्री झाली आहे. हा कोणत्याही प्रकारचा नवा iPhone नाही.  iPhone 11 Pro या फोनला मॉडिफाय आणि रिडिझाईन करण्यात आलं आहे. रशियन कंपनी Caviar ने या iPhone च्या डिझाईनमध्ये बदल केले आहेत. हे नवं डिझाईन गेल्या वर्षी Elon Musk च्या Tesla द्वारे लाँच करण्यात आलेल्या Cybertruck पासून प्रेरित होऊन तयार केलेला आहे. या आयफोनची किंमत तब्बल ९३ लाख रूपये इतकी असू शकते.

कॅविअर ही कंपनी सोनं आणि हिऱ्यांच्या मदतीनं गॅजेट्सना रिडिझाईन करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. लाखो रूपये खर्च करून हायटेक गॅजेट्स खरेदी करणाऱ्या श्रीमंतांसाठी ही कंपनी गॅजेट्सना रिडिझाईन करत असते. यावेळी कंपनीनं iPhone 11 Pro ला रिडिझाईन केलं आहे. यापूर्वी कंपनीनं स्मार्टवॉच आणि टॅबदेखील रिडिझाईन केले होते.

टायटॅनिअम बॉडीचा वापर
या मोबाईलच्या सुरक्षेसाठी कंपनीनं यामध्ये टायटॅनिअम बॉडीचा वापर केला आहे. हा संपूर्ण फोन मेटल प्लेटने ढाकलेला असल्याचं आपल्याला पहायला मिळतं. हा फोन हातून पडला तरी या फोनला कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. तर वापर करताना फोनच्या आऊटर शेलला फोल्ड करता येऊ शकते. फोन वापरत असतानाही याचं आऊटर शेल फोल्ड करता येणं शक्य आहे. फोन पाहताक्षणीच हा मजबूत टेस्ला सायबरट्रक सारखा तयार करण्यात आल्याचं आपल्याला दिसतं.

एक कोटी रूपयांच्या घरात किंमत
कॅविअर या कंपनीनं केवळ ९९ आयफोन ११ रिडिझाईन केले आहेत. या मोबाईलची किंमत किती असेल याबाबत मात्र कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. ज्यांना हे मोबाईल विकत घ्यायचा आहे, त्यांनाच या मोबाईलची किंमत सांगण्यात येईल, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यापूर्वी कंपनीनं अशाप्रकारे डिझाईन केलेल्या मोबाईलची किंमत ९३ लाखांपर्यंत होती. या फोनचीही किंमत एक कोटीच्या घरात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Story img Loader