नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्मार्टफोनच्या बाजारपेठेत अनेक नवी उत्पादने दाखल होतात. हीच संधी साधून सॅमसंग यंदा गॅलॅक्सी A 8 आणि गॅलॅक्सी A 8 + ही दोन नवी उत्पादने बाजारपेठेत आणणार आहे. जानेवारीमध्ये हे दोन्ही फोन बाजारात दाखल होतील असे कंपनीने सांगितले आहे. सॅमसंग गॅलॅक्सी नोट आणि गॅलॅक्सी एस या दोन सिरीजनंतर कंपनीची गॅलॅक्सी ए ही तिसरी सिरीज आहे. याआधी या सिरीजमधील गॅलॅक्सी A5 गॅलॅक्सी A7 या मॉडेल्सला ग्राहकांची चांगली पसंती मिळाली होती. त्यामुळे या फोनलाही मिळेल अशी आशा आहे. मात्र कंपनीने नेमका फोन कधी दाखल होणार हे अद्याप स्पष्ट केले नाही.
या नव्याने येणाऱ्या दोन्ही फोनमध्ये एस सिरीजमध्ये वापरण्यात आलेला इन्फीनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. गियर व्हीआर या सिस्टीमला हे दोन्ही फोन सपोर्ट करतील. गॅलॅक्सी A 8 चा डिस्प्ले ५.६ इंचाचा असेल तर गॅलॅक्सी A 8 + चा डिस्प्ले ६ इंचाचा असेल. दोन्ही फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला असून ४ जीबी रॅम देण्यात आली आहे. या दोन्ही फोनमध्ये ३२ जीबी आणि ६४ जीबीचा पर्याय उपलब्ध आहे. तर कार्डव्दारे ही मेमरी २५६ जीबी इतकी वाढविण्यात येऊ शकते. गॅलॅक्सी A 8 ला ३००० मिलीअॅम्पियर्सची बॅटरी देण्यात आली असून गॅलॅक्सी A 8 + ला ३३०० मिलीअॅम्पियर्सची बॅटरी देण्यात आली आहे. हे दोन्ही फोन अँड्रॉईड नूगा ७.१.१ या प्रणालीवर काम करतील असेही सांगण्यात आले आहे.