सॅमसंग कंपनीने मागील बाजूला चार कॅमेरे आणि पुढील बाजूला एक कॅमेरा असलेला एकूण पाच कॅमेऱ्यांनी युक्त गॅलेक्सी ए9(2018) हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. 20 नोव्हेंबरपासून या स्मार्टफोनसाठी नोंदणी सुरू झाली असून 28 नोव्हेंबरपासून विक्री सुरू होणार आहे. मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप ही या स्मार्टफोनची खासियत असून चार रिअर कॅमेरे असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन असल्याचं सांगितलं जात आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी एका कार्यक्रमात हा फोन लाँच करण्यात आला. गेल्या महिन्यात मलेशियामध्ये हा स्मार्टफोन कंपनीने सादर केला होता. जाणून घेऊया काय आहे याची खासियत आणि किंमत –
Galaxy A9 अॅन्ड्रॉइड 8.0 ओरियोवर कार्यरत असेल. यामध्ये 6.3 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2280 पिक्सल) इन्फिनिटी डिस्प्ले असेल. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन 6 जीबी आणि 8 जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यात इनबिल्ट स्टोरेज 128 जीबी असणार आहे, मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येईल. यातील मागील बाजूला असलेला मुख्य कॅमेरा 24 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे, यामध्ये एलईडी फ्लॅश आणि एफ 1.7/अपर्चरचा समावेश आहे. तर, 10 मेगापिक्सलचा दूसरा टेलीफोटो कॅमेरा आहे. यासोबत देण्यात आलेला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा 120 डिग्री लेंस आणि एफ/2.4 अपर्चरसोबत असेल. अखेरचा म्हणजे चौथा कॅमेरा 5 मेगापिक्सलचा (अपर्चर एफ/2.2) डेप्थ कॅमेरा असेल. याशिवाय सेल्फीप्रेमींसाठी Samsung Galaxy A9 (2018) मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 24 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फेस अनलॉक, बिक्सबी असिस्टंट आणि सॅमसंग पे हे फिचर असतील. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4जी व्हीओएलटीई, वाय-फाय 802.11एसी, ब्ल्यूटुथ 5.0, यूएसबी टाइप-सी, एनएफसी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक आहेत. एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, जायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर, प्रॉक्सिमिटी सेंसर आणि आरजीबी लाइट सेंसर हे फिचर देखील असतील. याशिवाय फास्ट चार्जिगला सपोर्ट करेल अशी 3800 एमएएच पावरची बॅटरी यामध्ये असणार आहे. या स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 36 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 39 हजार 990 रुपये ठेवण्यात आली आहे. ब्लॅक, ब्ल्यू आणि पिंक या तीन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे.