माणसाचे मन वाचता येत नाही, पाहता येत नाही, त्याचा थांग लागणे अशक्य असते, पण आता वैज्ञानिकांनी माणसाच्या मनात नेमके काय चालले आहे हे ओळखण्यासाठी मेंदूच्या प्रतिमा घेऊन त्यांचा अर्थ लावून दाखवला आहे. साक्षीदारांच्या मनातील गुन्हेगाराची प्रतिमा, प्रियकराच्या मनातील प्रेयसीची प्रतिमा अशा अनेक गमतीदार गोष्टी त्यामुळे कळू शकतील. अमेरिकी वैज्ञानिकांनी मनाची छायाचित्रे टिपणारे हे यंत्र तयार केले असून, ब्रेन स्कॅनरच्या माहितीनुसार मानवी चेहऱ्यांची जुळणी करून दाखवली आहे. वैज्ञानिकांनी सांगितले, की माणसाची स्वप्ने, स्मृती व कल्पनाशक्ती यांची जुळणी यापुढे या छायाचित्रांच्या मदतीने करता येणार आहे. कॅलिफोíनया विद्यापीठाचे मेंदूविषयक तज्ज्ञ अलन कोवेन यांनी सांगितले, की चेहऱ्यांची जुळणी मेंदूशास्त्राच्या मदतीने करता येते हे या पद्धतीतून दिसून आले आहे. चेहऱ्याचे आकलन, स्वप्ने, स्मृती व कल्पनाशक्ती यांसारखे ऑफलाइन दृश्यअनुभव नेमके काय असतात, त्यांचा अर्थ लावण्याची क्षमता यामुळे माणसाला प्राप्त होणार आहे, असे ‘संडे टाइम्स’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. या संशोधनात एमआरआय स्कॅनरच्या मदतीने सहा स्वयंसेवकांना तीनशे चेहरे दाखवण्यात आले. या प्रक्रियेत त्यांनी कुरळे केस, निळे डोळे, काळी त्वचा व दाढीधारी चेहऱ्यांना कसा कसा प्रतिसाद दिला हे पाहण्यात आले. त्यांच्या प्रतिसादाच्या माहितीचा संच तयार करण्यात आला. मेंदूच्या प्रत्येक भागात त्या वेळी काय प्रतिमा निर्माण झाल्या याचा डेटाबेस (माहितीसंग्रह) तयार करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक स्वयंसेवकाने प्रत्येक चित्राला काय प्रतिसाद दिला याचा डेटाबेसच्या मदतीने तुलनात्मक अभ्यास करून काही निष्कर्ष मांडण्यात आले. कोवेन व त्यांचे सहसंशोधक न्यूयॉर्क विद्यापीठाचे ब्राइस कुल व येल विद्यापीठाचे मारविन चुन यांनी असे सांगितले, की अशाप्रकारे माणसाच्या मेंदूत चेहऱ्यांच्या उमटणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास करणे म्हणजे एकप्रकारे मनाचे वाचन करणाऱ्या भविष्यातील यंत्राची ही पहिली पायरी आहे.

Story img Loader