एकीकडे परदेशी क्षुधाशांति गृहांच्या साखळ्यांना कडकडून मिठय़ा मारायच्या आणि परदेशात गेल्यावर चित्रपटांनी लोकप्रिय केलेली ‘मक्केकी रोटी और सरसोंका साग’ ही परवलीची म्हण उगाच कुरवाळत बसायची अशी सध्याची आपली विरोधाभासी खाद्यसंस्कृती बनली आहे. नुकत्याच एका अहवालामध्ये भारतीय लोक परदेशात गेले की घरजेवण न मिळाल्याने त्यांची आबाळ होत असल्याचा निष्कर्ष आला आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय खाद्यपदार्थ आणि खाद्यगृहे जगातल्या कानाकोपऱ्यात पसरू लागल्यामुळे उलट भारतीय कधी नव्हे इतके देशी व्यंजनांच्या उपलब्धतेबाबत आश्वस्त झाले आहेत. भारतीय खाद्यपदार्थाच्या वाढत्या विश्वव्याप्तीवर नव्या पाहणीच्या निमित्ताने दृष्टिक्षेप..
‘महा’राष्ट्रांमधील स्थिती
अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागांत भारतीय उपाहारगृहे आहेत, भारतीय वस्तूंची दुकाने आहेत. अनेक मंदिरे आणि गुरुद्वारांमध्ये ‘भोजनप्रसादा’ची सोय आहे आणि तिथे शाकाहारी सात्त्विक खाद्यपदार्थही मिळतात. ब्रिटनमध्ये २००३च्या आकडेवारीनुसार भारतीय खाद्यपदार्थाना अग्रक्रम असलेली १० हजार उपाहारगृहे आहेत. तेथे येणाऱ्या खवय्यांची संख्या दर आठवडय़ाला २५ लाखांच्या घरात असते. ब्रिटनमधील भारतीय खाद्यपदार्थाच्या विक्रीची उलाढाल तीन अब्ज पौंडांच्या आसपास आहे. ‘झालमुरी’ नावाने तेथील रस्त्यांवर आपली भेळ लंडनकरांचे आवडीचे जंकफूड बनले आहे. अमेरिकेत ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने २००७मध्ये केलेल्या पाहणीनुसार सुमारे १२०० भारतीय खाद्यपदार्थ देशभर प्रचलित आहेत. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय उपाहारगृहांची चलती अधिक आहे. अर्थात अमेरिकेतील भारतीय खाद्यपदार्थ हे अस्सल भारतीय म्हणजे मसालेदार वा तिखटजाळ नसून अमेरिकन रुचीनुसार कमी तिखट व कमी मसालेदार बनवले जातात.
नवी पाहणी?
व्यापारी दौऱ्यानिमित्त सतत परदेशवारी कराव्या लागणाऱ्या भारतीयांची एक पाहणी रेगस इंडिया या संस्थेने केली. जगभर कार्यालयांसाठी जागा पुरविण्याची सेवा ही संस्था देते. या पाहणीतून परदेश दौऱ्यावर आलेले भारतीय प्रतिनिधी कोणत्या गोष्टी गमावल्याने दु:खी असतात, याचा शोध घेण्यात आला. त्यानुसार अधिकाधिक लोकांनी घरातील जेवण ‘मिस’ करण्याचे दु:ख आपल्याला वाटते, असे सांगितले. थोडक्यात परदेश वाऱ्या करणाऱ्या भारतीयांच्या दृष्टीने भारतीय खाद्यपदार्थाची उणीव हे परदेश वारीतले एक मोठे संकट वाटते. पण असे असले तरी भारतीय खाद्यपदार्थानी जागतिक समुदायाच्या पोटात वाढते स्थान मिळवायला सुरुवात केली आहे.
दक्षिण आशिया
मलेशिया, थायलंड, सिंगापूर आणि महत्त्वाच्या सर्व दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये भारतीय नागरिकांना मोठय़ा प्रमाणात उत्तर आणि दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृती नांदत असल्याचे दिसते. या राष्ट्रांमध्ये भारतीय शाकाहारी किंवा मांसाहारी खवय्यांची मोठी चंगळ असते.
ऑस्ट्रियातील वाढ
केक, पॅस्ट्रिज आणि मफिनसारख्या पारंपरिक खाद्यपदार्थाची रेलचेल असलेल्या व्हिएन्नातील रेस्तराँमध्ये आता गुलाबजामुन, आंबा लस्सी आणि कुल्फीवर ताव मारणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे. ऑस्ट्रियाची राजधानी असलेल्या व्हिएन्नात ५०हून अधिक रेस्तराँ आणि उपाहारगृहांत भारतीय खाद्यपदार्थ मिळत आहेत. ‘निर्वाण’ या व्हिएन्नातील लोकप्रिय भारतीय रेस्तराँचे मालक पवन बात्रा यांनी सांगितले की, ‘‘सणासमारंभाला आणि जल्लोष साजरा करण्यासाठी केक आणि पॅस्ट्रिजला स्थानिक लोक प्राधान्य देत असत. गेल्या पाच वर्षांपासून मात्र अभारतीय लोकही प्रसंगाची गोडी वाढविण्यासाठी मिठाई, लस्सी, गुलाबजाम, गाजर हलवा यांना प्राधान्य देऊ लागले आहेत.’’ आठ वर्षांपूर्वी बात्रा आणि त्यांच्या पत्नीने हे भारतीय उपाहारगृह सुरू केले. शाकाहारी आणि मांसाहारी भारतीय पदार्थाचे चाहते या कालावधीत बरेच वाढले आहेत, असं त्यांचं निरीक्षण आहे. ऑस्ट्रियाचे अध्यक्षही अनेकदा आमच्या रेस्तराँतील पदार्थाचा आस्वाद घेतात, असं बात्रा अभिमानानं सांगतात. डाल मखानी, रोगन जोश हे त्यांच्या आवडीचे पदार्थ आहेत. व्हिएन्नातच ‘हेलिग कूह’ म्हणजेच पवित्र गाय या नावाचं उपाहारगृह चालविणारे अनिल गुप्ता हे दररोज दहा लिटर आंबा लस्सी विकतात. भेंडी, आलू गोबी, चणा मसाला आणि कढी या पदार्थानी मांसाहारी पदार्थाच्या विक्रीला मागे टाकलं आहे, असंही ते सांगतात. भारतीय खाद्यपदार्थाच्या ग्राहकांमध्ये गेल्या पाच वर्षांत तिपटीने वाढ झाली आहे आणि भारतीय उपाहारगृहांची संख्याही या कालावधीत २०वरून ५०वर गेली आहे.
मध्य आशिया
दुबई, शारजा, आबुधाबी येथे २५ दुकानांची साखळी असलेल्या ‘अल अदिल’मध्ये जानवी जोडसुद्धा मिळतात, असे तिथली मराठी माणसं उत्साहानं सांगतात तेव्हा जानवी सुद्धाच्या ‘सुद्धा’मध्ये सर्वच भारतीय मसाले, पिठं, लोणची, पापड मिळतात, हे ओघानं अध्याहृत असतं.
‘शुगर बड चिपक’
उसाची लागवड करताना त्याचे डोळे म्हणजे बड्स काढून लावत असतात, हे काम फार जिकिरीचे तसेच वेळखाऊ असते, त्यासाठी पसाही मोजावा लागतो. मध्यप्रदेशचे रोशनलाल विश्वकर्मा यांच्यासाठी एका अभियंत्याने दिलेले हे आव्हान त्यांनी गांभीर्याने घेतले आणि त्यांनी ‘शुगर बड चिपक’ नावाचे एक यंत्र तयार केले. सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीयिरग या भोपाळच्या संस्थेने या शोधाबद्दल विश्वकर्मा यांना प्रशंसले आहे. या यंत्रात एक हँडल असून ते दाबलं की उसाचा डोळा म्हणजे बड अलगद निघून येतो. त्यात अर्धगोलाकृती चाकू आहे, तो एका मंचकावर बसवलेला असून हँड लिव्हर दाबावे लागते, त्यात ऊस प्रत्येक वेळी १८० अंशाच्या कोनातून फिरवावा लागतो. तासाला उसाचे २५० डोळे (बड्स) काढता येतात. जर कामगार अनुभवी असेल तर तासाला ४०० डोळेही निघतात. फारसे श्रम न घेता चार तास काम केले व एक तास विश्रांतीनंतर परत काम सुरू करता येते. यात उसाचा लागवड खर्च ९० टक्के कमी होतो. हे यंत्र सहज इकडून तिकडे नेता येते. त्याची किंमत कमी आहे. उसाच्या डोळ्यांची यात थेट जमिनीत लागवड करता येते किंवा आधी काढून नंतरही लागवड करता येते.
स्वस्तातला हिमोग्लोबिन मीटर
नवी दिल्लीच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या संस्थेचे अंबर श्रीवास्तव यांनी मोबाइलच्या आकाराचे हिमोग्लोबिन मीटर तयार केले आहे. ट्र एचबी हिमोमीटर असे या यंत्राचे नाव आहे. नवी दिल्लीच्या आयआयटीने केलेल्या संशोधनावर प्रथमच उत्पादन तयार करण्यात आले आहे. अखिल भारतीय आयुर्वज्ञिान संस्थेने या यंत्राची तपासणी केली असून त्यामुळे अॅनिमिया सहजपणे ओळखता येतो. प्रयोगशाळेमध्ये सीबीसी काउंटर चाचण्या केल्या जातात; त्यातील चांगल्यात चांगल्या हिमोग्रॅम चाचण्या २ ते १० लाख रुपये किमतीच्या यंत्रावर केल्या जातात. ट्र एचबी मीटर या आयआयटीने तयार केलेल्या यंत्राची किंमत अजून निश्चित करण्यात आलेली नाही. तरी, ही किंमत २५ हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
या यंत्रात पेपर कार्ड्सचा वापर केलेला असतो. ट्र एचबी मीटर हे पारंपरिक ग्लुकोमीटरसारखे काम करते. त्यात रक्ताचा एक थेंब डिस्पोजेबल पट्टीवर घेतला जातो व ४५ सेकंदांत तुमच्या रक्तात हिमोग्लोबिन किती आहे हे कळते. हिमोग्लोबिन आकडय़ांच्या अशा १००० वाचनांची नोंदही त्यात होते. आरोग्य कर्मचारी, रक्तपेढय़ा, प्राथमिक आरोग्य केंद्रे या हिमोग्लोबिन मीटरचा वापर करू शकतील, असा श्रीवास्तव यांचा विश्वास आहे. सध्या भारतात अॅनिमियाचे प्रमाण किती आहे, याचे प्रमाण अशा मापनांच्या अभावी निश्चित करता आलेले नाही, हिमोग्लोबिनचे प्रमाण मोजण्याची सुविधा ग्रामीण व शहरी भागात स्वस्तात उपलब्ध करून दिल्यास त्याचा चांगला फायदा होईल. अखिल भारतीय आयुर्वज्ञिान संस्थेच्या रक्तशास्त्र विभागाच्या रेणू सक्सेना यांनी सांगितले की, यातील हिमोग्लोबिनची मापने अचूक आहेत. अखिल भारतीय आयुर्वज्ञिान संस्था व आयआयटी दिल्ली यांच्या संयुक्त प्रकल्पात हे मोलाचे संशोधन झाले आहे.
‘उसेन बोल्टी’ धावण्याचे विच्छेदन
उसेन बोल्ट हा सध्या पृथ्वीतलावरचा सर्वात वेगवान धावपटू आहे व तो जर शनीच्या टायटन या चंद्रावर विंगसूट घालून गेला तर तिथे तो उडू शकेल असे अभ्यासात दिसून आले आहे. उसेन बोल्ट याने एका सेकंदात १२.२७ मीटर अंतर कापले होते व त्याची ही क्षमता विंगसूट घातल्यास शनीच्या टायटन या चंद्रावर उडण्यास मदत करू शकते. उसेन बोल्ट हा ऑलिंपिकमध्ये गाजलेला धावपटू असून त्याला टायटनवर उडण्यासाठी इंधनाचीही गरज लागणार नाही असे इंग्लंडमधील लिसेस्टरशायर विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी सांगितले. या विद्यापीठातील भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी जे हिशेब केले आहेत त्यानुसार तो उडू शकतो, त्यांचे हे संशोधन लिसेस्टर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र व खगोलशास्त्र विभागाच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. टायटन हा शनीचा सर्वात मोठा चंद्र असून तेथील वातावरणात नायट्रोजन जास्त आहे व पृष्ठभागावरील दाब पृथ्वीपेक्षा पन्नास टक्क्यांनी अधिक आहे. जर माणसाने पंखासारखी साधने लावली, तर ती चंद्रापर्यंत उडू शकतील असे एक भाकीतही केले जाते. या विद्यार्थ्यांनी असे दाखवून दिले आहे की, स्कायडायव्हर जे विंगसूट पृथ्वीवर वापरतात त्यांचा चांगला वापर करता येऊ शकतो. टायटनच्या हवेची घनता त्वरण व गुरुत्व यावर उडण्याची क्षमता अवलंबून असते. साधारणपणे विंगसूटचा आकार १.४ चौरस मीटर असतो. उडणाऱ्या पदार्थाची वरची हवा व खालची हवा यांचे गुणोत्तरही महत्त्वाचे आहे. साध्या विंगसूटच्या मदतीने उड्डाणासाठी सेकंदाला ११ मीटर धावण्याचा वेग असावा लागतो त्यामुळे उसेन बोल्ट शनीच्या टायटन या चंद्रावर उडू शकतो. जगातील अनेक लोक या वेगाने पळू शकत नाहीत. उसेन बोल्टने १२.२७ मीटर इतका वेग सेकंदाला गाठला आहे. जे लोक बोल्ट इतका वेग प्राप्त करू शकत नाहीत तेही आमच्या साधनांनी उडू शकतात असा या विद्यार्थ्यांनी दावा केला आहे, पण सध्या तरी या सुविधा सुरक्षित नाहीत. सेकंदाला तुम्ही सहा मीटर पळू शकत असाल तर तुम्हाला विंगसूट घालून उडता येऊ शकते. त्या विंगसूटचा आकार नेहमीपेक्षा तीनपट असतो, त्यामुळे ते जरासे कठीण जाते. प्रत्यक्षात माणसाला उडणे शक्य आहे असे या विद्यार्थ्यांना वाटते. टायटनवर अनेक लोक उडू शकतात असे अनेक दावे ऑनलाइन करण्यात आले होते, परंतु त्याच्या मागचे भौतिकशास्त्र माहिती नव्हते, पण आता ते उलगडले आहे, असे उत्तर लंडनमधील मिल हिल येथील हना लेरमन यांनी सांगितले. पृथ्वीवरही विंगसूटच्या मदतीने उडता येते, पण ते कठीण असते. पण उसेन बोल्ट टायटनवर कुठल्याही साधनाशिवाय उडू शकेल त्यामुळे प्रवास या संकल्पनेला एक नवीन परिमाण प्राप्त होईल असे लेरमन यांचे मत आहे.