Salt to exfoliate skin: बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या राज्यसभा खासदार जया बच्चन या नेहमीच त्यांच्या साध्या राहणीमानामुळे आणि कठोर बोलण्यामुळे चर्चेत असतात. याशिवाय, जया बच्चन अनेकदा त्यांची नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्येही दिसतात, जिथे त्या अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर मोकळेपणाने बोलतात. आजपर्यंत या पॉडकास्टमध्ये त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली आहे, ज्यात अगदी पूर्वीच्या काळी शूटिंगदरम्यान मासिक पाळी आल्यास त्या काय करायच्या या विषयांवरही त्या मोकळेपणाने बोलल्या आहेत. आता अशात एका पॉडकास्टदरम्यान त्यांनी त्वचेची काळजी घेण्याच्या दिनचर्येबद्दल सांगितले आहे.
जया बच्चन म्हणाल्या की, त्या आठवड्यातून एक किंवा दोनदा अंघोळीसाठी मीठ वापरायच्या. त्या त्वचेवर मीठ लावतात आणि हळूवार घासतात, मीठ नैसर्गिक एक्सफोलिएंट म्हणून काम करते आणि तुमची त्वचा खूप चमकदार आणि स्वच्छ दिसते. आता प्रश्न असा आहे की, शरीरावर थेट मीठ लावल्याने काही नुकसान होऊ शकते का? यासाठी आम्ही तज्ज्ञांकडून या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली.
तज्ज्ञ काय म्हणतात?
प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ अंकुर सरीन यांनी नुकताच त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर या प्रकरणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्वचातज्ज्ञ स्पष्ट करतात की, ‘मिठाचा म्हणजेच सोडियम क्लोराईडचा pH ७ आहे, तर तुमच्या शरीराचा pH ५.५ आहे. अशा परिस्थितीत त्वचेवर थेट मीठ लावणे हानिकारक ठरू शकते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘कोणत्याही प्रकारचे शारीरिक एक्सफोलिएशन त्वचेसाठी चांगले नाही, यामुळे त्वचेच्या नैसर्गिक अडथळ्याला नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत त्वचेवर थेट मीठ लावणे हानिकारक ठरू शकते. यामुळे त्वचेवर जळजळ, हायपरपिग्मेंटेशन होऊ शकतो; म्हणजेच तज्ज्ञ थेट त्वचेवर मीठ न लावण्याचा सल्ला देतात.
योग्य मार्ग कोणता?
ते थेट त्वचेवर लावण्याऐवजी तुम्ही पाण्यात थोडेसे गुलाबी हिमालयीन मीठ घालून अंघोळ करू शकता. काही संशोधनातून असे दिसून आले आहे की, असे करणे त्वचेसाठी फायदेशीर आहे. यासाठी अंघोळीचे पाणी थोडे कोमट करा. जर तुम्ही बाथटबमध्ये अंघोळ करत असाल तर त्यात एक छोटा कप गुलाबी हिमालयीन मीठ घाला, ते पाणी १० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर हलक्या हाताने घासून अंघोळ करा.