आपल्यातील अनेक जण कधी मोबाईलवरील गाणी ऐकण्यासाठी तर कधी फोनवर बोलण्यासाठी हेडफोनचा वापर करतात. सध्या बाजारात विविध कंपन्यांचे आणि जास्तीत जास्त चांगल्या सुविधा असलेले हेडफोन्स मिळतात. लोकलने प्रवास करताना किंवा दुचाकी आणि चारचाकी चालवताना हेडफोन वापरणे अतिशय उपयुक्त ठरते. आता हेडफोनची किंमत साधारण किती असते असे आपल्याला कोणी विचारले तर ५००, १००० फारतर २ ते ४ हजारपर्यंत. पण नुकत्याच एका कंपनीने लाँच केलेल्या हेडफोन्सची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. शहराच्या ठिकाणी १ बीएचके घर खरेदी करता येईल इतक्या किमतीचे हे हेडफोन आहेत. एक दोन नाही या हेडफोन्सची किंमत आहे तब्बल ४५ लाख रुपये.

सनहायझर कंपनीने हे हेडफोन्स पुण्यात नुकतेच लाँच केले आहेत. दर्दी रसिकांसाठी आणि संगीत क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा हेडफोन अतिशय चांगला आहे असं कंपनीचं म्हणणं आहे. आता या हेडफोनची किंमत इतकी का आहे याबाबत कंपनीचे इंडियाचे संचालक कपिल गुलाटी म्हणतात, कंपनीने सर्वात उत्तम गुणवत्तेचे हेडफोन तयार करायचे ठरवले. त्यासाठी कंपनीतील इंजिनिअर्सना सांगण्यात आले, तुम्ही हेडफोन बनविण्यासाठी कितीही वेळ घ्या, कोणतेही तंत्रज्ञान वापरा पण आपल्याला जगातील सर्वात भारी हेडफोन्स तयार करायचे आहेत. जगाला आपल्यालादाखवून द्यायचे आहे की ऑडीओच्या बाबतीत आपली कंपनी बेस्ट आहे.

हे हेडफोन्स तयार करण्यासाठी १५ इंजिनिअर्सची टीम मागच्या १०वर्षांपासून काम करत होती. यातील प्रत्येक गोष्टीची खूप जास्त काळजी घेतली आहे. आवाजामध्ये कोणतीही कमी राहू नये याची काळजी घेतली आहे. या हेडफोन्समधील काही तारा या सोने आणि प्लॅटीनमच्या आहेत असेही गुलाटी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. ज्यांना संगीताचे आणि आवाजाचे विशेष ज्ञान आहे त्यांच्यासाठी याची किंमत हा तितका महत्त्वाचा मुद्दा नसेल असेही ते म्हणाले.