Microplastics in Brain:आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे. पाण्याच्या बाटली ते जेवणाचा डबा, वापरा अन् फेका चहाचे कप, प्लास्टि वेष्टनातील खाऊ अशा सगळ्याच ठिकाणी प्लास्टिकचा सर्रास वापर होताना दिसतो. आपण वापरलेल्या प्लास्टिकचा कचरा रस्त्यांवर, उद्यानात, शेतात, पाण्यात सगळीकडे दिसून येतो. पण हेच प्लास्टिक आता मानवी शरीरात आणि तेही डोक्यातही पोहोचले आहे. नेचर मेडिसीन जर्नलमध्ये छापून आलेल्या एका नव्या संशोधनानुसार मानवी डोक्यात चमचाभर म्हणजे जवळपास ७ ग्रॅम प्लास्टिक आढळून आले आहे. मृत शरीराच्या डोक्याची तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. डोक्यात आढळून आलेल्या मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिकमुळे संशोधकही आता गोंधळून गेले आहेत.
संशोधकांनी सांगितले की, २०१६ आणि २०२४ या काळात मानवी शरीरातील प्लास्टिकची पातळी ५० टक्क्यांनी वाढली आहे. या संशोधनासाठी २४ मृत शरीरातील डोक्यातील पेशींचा अभ्यास करण्यात आला. यावेळी डोक्यातून सरासरी ७ ग्रॅम इतके मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले. या संशोधनाचे प्रमुख वैज्ञानिक मॅथ्यू कॅम्पेन यांनी सांगितले की, आपल्या डोक्यात इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे कण आढळतील याची मला कल्पना नव्हती. हे प्रमाण आपल्या आरोग्यासाठी घातक आहे.
मेंदूमध्ये इतर अवयवांच्या तुलनेत सर्वाधिक प्लास्टिक
संशोधकांनी पुढे म्हटले की, मेंदूमधील टिश्यूमध्ये यकृत आणि मूत्रपिंडापेक्षाही अधिक प्रमाणात प्लास्टिक आढळून आले आहे. तसेच डिमेंशिया आजाराने ग्रस्त असलेल्या १२ लोकांच्या मेंदूचीही तपासणी करण्यात आली. यामध्ये असे दिसले की, इतर लोकांच्या तुलनेत डिमेंशिया असणाऱ्या लोकांच्या डोक्यात पाच पट अधिक मायक्रोप्लास्टिकचे कण आहेत. यामुळेच आता मायक्रोप्लास्टिक आणि डोक्याशी संबंधित अल्झायमर आणि पार्किसन्स सारख्या आजारांचा सहसंबंध असल्याचा कयास बांधला जात आहे.
मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय?
तज्ज्ञांच्या मते, आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेले पॅकेजिंग, कंटेनर्स, कपडे, टायर आणि इतर वस्तूंच्या अतिशय बारीक कणांना मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिक म्हणतात. प्लास्टिकचे हे छोटे कण जगभरातील सर्वच वस्तूंमध्ये दिसून येत असून ते मानवी शरीरात आणि मेंदूतही पोहोचले आहेत.
मायक्रोप्लास्टिक आपल्या शरीरात जाण्यापासून रोखायचे असेल तर सिंगल युज प्लास्टिक वापरणे कमी केले पाहीजे, असे तज्ज्ञ सांगत आहेत. पिण्याचे पाणी आणि जेवण प्लास्टिक बाटली किंवा डब्यात ठेवण्याऐवजी धातू किंवा काचेच्या भांड्याचा वापर करावा. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ टाळावेत, यात प्लास्टिकचे प्रमाण अधिक आढळते.