स्कंद पुराणानुसार भगवान शंकरांचा आवडता महिना म्हणजे श्रावण, यंदा २९ जुलै पासून श्रावण मासारंभ झाला असून १, ८, १५, २२ ऑगस्ट या दिवशी अनुक्रमे श्रावणी सोमवार आहेत. सणांचा महिना अशी ओळख असणारा श्रावण हे एकाअर्थी उत्साहाचे, चैतन्यचे प्रतीक मानला जातो, पण यातही शिवभक्तांसाठी श्रावणी सोमवारचे महत्त्व अनन्य साधारण असते. श्रावणातील सोमवारी शंकराच्या पूजेनंतर शिवामूठ वाहतात. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी तिळाची शिवामूठ अर्पण करायची आहे. याबाबतचे नियम व पूजा विधी आपण जाणून घेऊयात…
साधारणतः हिंदू रीतीनुसार, श्रावणी सोमवारी शंकराचे पूजन करून धान्याची मूठ म्हणजेच शिवमूठ शंकराच्या पिंडीवर वाहिली जाते. ही पूजा सोयीनुसार मंदिरात जाऊन अथवा घरी केली तरी चालते. साधारणतः नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतर पहिली पाच सलग वर्षे शिवामूठ वाहावी अशी पद्धत आहे. यंदा पहिल्या सोमवारी म्हणजेच १ ऑगस्ट ला तांदळाची, दुसऱ्या सोमवारी म्हणजे ८ ऑगस्ट ला तिळाची, १५ ऑगस्ट ला मुग व २२ ऑगस्टला जव अशी धान्यांची शिवामूठ वाहायची आहे. ज्या श्रावणात पाचवा सोमवार येतो तेव्हा सातूची शिवामूठ वाहिली जाते.
शिवमूठ वाहताना म्हणायचा मंत्र
‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।’
शिवमूठ वाहून झाल्यावर साधारण पुढल्या दिवशी उत्तरपूजा केली जाते, यावेळी शंकराचे नामस्मरण करावे व आपण वाहिलेले धान्य गोळा करून मग त्यात आणखी थोडी भर करून गरजूंना देण्याची पद्धत आहे. पूजेच्या रूपातून गरजूंची मदत हा उद्देश प्रत्येक सणांमधून जपला जावा हा संदेश श्रावणी सोमवार देऊन जातो.
Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनासाठी अशी सजवा राखीची थाळी; ‘या’ वस्तू चुकूनही विसरू नका
श्रावणात का करावे शंकराचे पूजन?
स्कंद पुराणातील आख्यायिकेनुसार, प्रत्येक जन्मी शंकरालाच वरण्याचे व्रत देवी सतीने घेतले घेते, एका जन्मी वडिलांच्या इच्छेविरुद्ध देवी सतीने भगवान शंकरांशी विवाह केला त्यावेळी वडिलांनी शंकरांचा अपमान केल्याने दुःखी होऊन माता सतीने देहत्याग केला व हिमालयाच्या पोटी माता सतीने पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला. माता पार्वतीने श्रावण महिन्यात कठोर उपवास करून शिव शंकरांना प्रसन्न करून त्यांच्याशी विवाह केला. यातूनच पुढे सोळा सोमवारचे व्रत करण्याची रीत सुद्धा प्रचलित झाली. याशिवाय समुद्रमंथनातुन प्राप्त झालेले हलाहल विष प्राशन करून शिवशंकरांनी मनुष्याला संकटातून तारले होते, यासाठी महादेवांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावणात शंकराचे पूजन आवर्जून करावे अशी हिंदू धर्मियांची धारणा आहे.
Shravan 2022: यंदाच्या मंगळागौरी गाजवा; ‘हे’ ट्रेंडी उखाणे घेऊन वेधा सर्वांचं लक्ष
श्रावणी सोमवारी शिवपूजनासाठी भगवान शंकराच्या आवडत्या गोष्टी म्हणहेच बेलाचे पान, पंचामृत, धोत्रा, चंदन, अक्षता अर्पण केल्या जातात तर तूप व साखरेचा नैवैद्य दाखवला जातो. अनेक शिवभक्त हे एकवेळ भोजन करून श्रावणी सोमवारचा उपवास देखील करतात.