स्त्री उपनिषद
डॉ. मीनल कातरणीकर – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय संस्कृतीनुसार अनंत क्षमता असणारी, सर्व स्थित्यंतरांना लीलया पचवणारी आई अत्यंत प्रेमाद्र्र अशी त्यागमूर्ती असते, हे आईचे प्रारूप आपल्या परिचयाचे आहे. साने गुरुजींची ‘श्यामची आई’ व आचार्य अत्रेंच्या ‘दिनूचे बिल’ या कथेतील आई परस्परांशी याच धाग्याने बांधलेल्या आहेत.

शाळेत असताना ‘दिनूचे बिल’ ही कथा वाचनात आली. आपल्या डॉक्टर वडिलांनी रुग्णाला दिलेले उपचारांचे बिल बघून लहान दिनूला एक कल्पना सुचते. आपण घरात केलेल्या लहान-मोठय़ा कामांची यादी तो मोबदल्यासहित तयार करतो. त्या रकमेची बेरीज करून ते बिल तो, अर्थातच मेहनताना मिळण्याच्या अपेक्षेने, आईला देतो. दुसऱ्या दिवशी  सकाळी उठल्यावर त्याला उशीजवळ बिलाचे पैसे व एक कागद दिसतो. ते आईचे बिल असते. दिनूच्या जन्मापासून आईने त्याच्यासाठी काय काय केले याची शून्य मोबदल्यासहित यादी आणि एकूण बेरीज शून्य असे ते बिल असते. ते वाचल्यावर दिनूला रडू कोसळते आणि तो आईची क्षमा मागतो.

‘‘आपल्या आईने आपल्यासाठी केलेल्या कुठल्याही गोष्टीचे मोल करता येत नाही’’ हे त्या वयात मनावर बिंबवणारी ती उत्कृष्ट कथा होती आणि आजही आहे. पण वयाच्या प्रवासाने हळवेपणा कमी होऊन थोडा वैचारिक तटस्थपणा अंगी बाणल्यामुळे या कथेतून निपजणारे आईपणाचे नवनवे पलू दृष्टोत्पत्तीस येऊ लागले आहेत.

आपण आपल्या बाळासाठी त्याच्या जन्मापासून काय काय केले याची यादी आईला करता येईल का? खेळवत खेळवत घास भरवले, बाळाबरोबर रात्री जागून त्याच्या बाळलीला पाहिल्या इत्यादी अनेक नाजूक-कोमल प्रसंग प्रत्येकच आई अनुभवते. पण हे सर्व ती बाळासाठी ‘करत’ असते का? हे तर तिचे बाळाशी असणारे मातृत्वाचे नाते आहे. आणि जरी एखादीने त्याची यादी करायचे ठरवले तरी त्या प्रत्येक गोष्टीचे मोल कसे करता येणार? अगदी व्यवहारी शब्दच वापरायचे तर असे म्हणावे लागेल की आपले घर हे जगातले सर्वात महाग पाळणाघर आणि आई ही सर्वात महागडी ‘बेबी सिटर’ असते. हे दोन्ही इतके महाग असतात की जगातील कशाहीबरोबर त्याची तुलना करता येणार नाही. ‘दिनूचे बिल’ या कथेचा मथितार्थ तोच आहे.

‘श्यामची आई’चा उल्लेख आजच्या जमान्यात अनेकांना आवडत नाही, ती संकल्पनाच कालविसंगत वाटते. आता श्यामच्या आईचे नाही तर श्यामच्या ‘मम्मी’चे दिवस आहेत असं एक सांप्रत मत आहे. पण आई असो वा मम्मी, त्यांच्यात एक घटक समान आहेच.

आपल्या संस्कृतीत ‘ऋण’ ही उदात्त कल्पना आहे. आपण मनुष्यजन्मात येतो तेव्हा अनेकांचे देणे लागतो. सबंध आयुष्यात आपल्याला हे ऋण फेडण्यासाठी नियमबद्ध आचरण करावे लागते.

आई आणि मम्मीचा विशेष असा की त्या ‘ऋण’ संकल्पना फारच गंभीरपणे घेतात. म्हणजे सामान्यत: आपण समाजाकडून, निसर्गाकडून जे जे घेतो त्यातून उतराई होण्याचा प्रयत्न करतो. आईच्या ऋणातून आपल्याला कधीच मुक्त होता येत नाही, हेही आपल्याला ठाऊक असते. पण आई वा मम्मी मात्र सर्वाच्या सदैव ऋणी असतात. याच कृतज्ञभावनेने त्या घरातील सर्वासाठी सदैव काहीतरी करतच असतात. आपल्या कुटुंबातील प्रत्येकानेच आपल्याला समृद्ध केले आहे, या भावनेने त्यांचे घरातील व्यवहार सुरू असतात. त्याची चरमसीमा म्हणजे आपल्या अपत्याबद्दल तिच्या मनात असणारी भावना.

तिला ‘आई’ ही पदवी ज्याच्यामुळे प्राप्त होते त्या अपत्याचे तिच्या मनात काय स्थान असेल! ‘‘बाळा होऊ कशी उतराई’’ असे उद्गार या अनन्यभावनेतूनच येतात. अपत्याच्या जन्माबरोबर तोपर्यंत सोसलेल्या साऱ्या यातना निमिषार्धात विसरून ती नात्यांच्या उतरंडीतील सर्वोच्च पदावर विराजमान होते. ज्याच्यामुळे तिला हा सन्मान मिळतो त्या अपत्याची ती आजन्म ऋणी असते, मग ते अपत्य कसेही असो, मोठेपणी ते तिच्याशी कसेही वागो. तिच्यासाठी तो प्रसादच असतो. त्यामुळे त्या अपत्यासाठी ‘मी काय काय केलं’ याचा काटेकोर हिशोब ती ठेवूच शकत नाही, मग त्याचे मोल करणे तर दूरच!

आपल्या जीवनातील सर्वश्रेष्ठ ‘दाता’ म्हणजे आई. ती इतकी निरपेक्षपणे आपल्याला भरभरून केवळ देतच असते, घेणे हा शब्दच तिच्या शब्दकोशात नसतो. पुढच्या पिढीला तिच्या अनेक गोष्टी खटकतात. त्यांना वाटते, तिने आता जरा हिशोबीपणाने वागावे, जरा स्मार्ट व्हावे. ती स्त्री म्हणून ‘स्मार्ट’ होईल, पण ती आई म्हणून आहे तशीच राहते-कायम देत राहणारी. आणि एक महत्त्वाचे काम ती करत असते – पुढच्या पिढीतील आई घडवण्याचे! ‘‘घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे’’ या सुंदर उक्तीनुसार ती आपले चिरंतन दात्याचे मन पुढच्या पिढीकडे संक्रमित करते; मग ती श्यामची आई असो वा श्यामची मम्मी असो!
सौजन्य – लोकप्रभा