नवी दिल्ली : भारतात दिवसाची सुरुवात सकाळी चहाने बहुसंख्य करतात. दिवसाची सुरुवात चहाने न करण्याची कल्पनाच बहुतेकांना करवत नाही. अशा तऱ्हेने हे पेय भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पेय आहे. परंतु दिवसा रिकाम्या पोटाने चहा पिणे हितकारक की अहितकारक, याविषयी आहारतज्ज्ञांची काही मते आहेत.
त्यांच्या मते चहाने तरतरी येते. त्यातील ऑक्सिडीकरण विरोधी घटकांमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासाठी मदत होते. चयापचय क्रियेसही चहा पूरक आहे. परंतु, दररोज सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आपले पोट बिघडू शकते. त्यामुळे आपल्या पोटात आम्लवृद्धी होते. त्याचा पचनावर दुष्परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते सकाळी मोकळय़ा पोटी चहा प्यायल्याने खालील दुष्परिणाम होऊ शकतात.
* डोकेदुखी : आपली डोकेदुखी घालवण्यासाठी कधी काही जण रिकाम्या पोटी चहा घेतात. वास्तविक त्यामुळेच त्यांची डोकेदुखी वाढू शकते. चहातील ‘कॅफिन’ या घटकामुळे तसे होते. झोपेआधी योग्य काळ आधी योग्य प्रमाणात पाणी पिणे त्यासाठी हितकारक ठरते.
* अपचन आणि निर्जलीकरण : रिकाम्या पोटी चहा घेतल्याने आपल्या पचनसंस्थेत वातवृद्धी (गॅसची वाढ) होते. चहामुळे मूत्रवृद्धी होते. सकाळी चहा घेतल्यावर आपल्याला जास्त वेळा लघवीला जावे लागते. त्यानंतर पुरेसे पाणी न प्यायल्यास निर्जलीकरणाची जोखीम वाढते. रात्रभर काही तास झोपल्याने आपल्या शरीरात आधीच निर्जलीकरण झालेले असते. तुम्ही सकाळी उठल्यावर पहिल्यांदा चहा प्यायल्याने हे निर्जलीकरण वाढते. चहामध्ये ‘थिओफिलिन’ हा रासायनिक घटक असतो. त्याचा आपल्या विष्ठेवर परिणाम होऊन बद्धकोष्ठता होण्याची शक्यता वाढते.
* पोषक तत्त्वांचे शोषण रोखते : चहामध्ये असलेला ‘टॅनिन’ घटक अन्नातून लोह शोषण्यास अडथळा आणतो; ‘कॅफिन’ पोषक तत्त्वांचे शोषण कमी करू शकते.
* आम्लपित्त वृद्धी : रिकाम्या पोटी चहा घेतल्याने आपल्या पोटातील आम्ल आणि अल्क धर्मीय द्रवांचा समतोल बिघडतो, ज्यामुळे आम्लपित्त वृद्धी (अॅसिडिटी) होते. छातीच्या खालच्या भागात वेदना जाणवू शकतात, जळजळ होते. पोटात चहा गेल्याने हा त्रास होऊ शकतो.
त्यामुळे आहारतज्ज्ञ सांगतात, की आपल्या नाश्त्याबरोबर चहा घ्यावा. चहात साखरेऐवजी गुळाचा वापर करावा. त्यामुळे जीवनसत्त्वे आणि फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आदी क्षार मिळण्यास मदत होते. पचनक्षमतेतही त्यामुळे वृद्धी होते. सकाळी उठल्यावर पेलाभर कोमट पाणी नियमित प्यायल्यास निरोगी राहण्यास मदत होते. खरे तर तज्ज्ञांच्या मते चहा पिण्याची आदर्श वेळ दुपारी तीन वाजताची आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि फ्लू-सर्दी टळू शकते.