हवामान बदलताच आपल्या सर्वांच्या घरात संध्याकाळच्या सुमारास खिडक्या, दारातून किंवा कोणत्याही बारीकशा फटीतून डासांचा शिरकाव होतो. उन्हाळा आणि पावसाळ्यात तर हा त्रास अगदी हमखास जाणवतो. मग त्यांना घरातून नाहीसे करण्यासाठी आपण अनेक डास मारण्याचे स्प्रे, उदबत्त्या आदी गोष्टींचा वापर करीत असतो. परंतु, या सर्व उत्पादनांमध्ये भरपूर प्रमाणात रसायनांचा आणि इतर घटकांचा वापर केला जातो; ज्यामुळे श्वासासंबंधीचे त्रास उदभवू शकतात.
घरामध्ये डासांचा प्रभाव असल्यास, तुम्हाला किंवा लहान मुलांना डास चावल्यास मलेरिया, डेंग्यू असे आजार पसरण्याची भीती असते. त्यामुळे अशा गोष्टी होऊ नयेत आणि डासांपासून घर सुरक्षित ठेवण्यासाठी काही सोप्या व उपयुक्त अशा टिप्स आपण पाहणार आहोत. त्यामधील काही उपाय काहींना माहीत असतील; तर काही टिप्स या अनेकांना नवीन असतील, पाहा.
डासांपासून संरक्षण कसे करावे? [How to get rid of mosquitoes]
१. डासांना घरात येण्यापासून रोखणे
डासांचा त्रास होऊ नये यासाठी त्यांना घरात येण्यापासून रोखणे हा सर्वोत्तम उपाय आहे. साधारण उन्हे कमी होऊ लागल्यावर, अंधार पडू लागल्यावर घरामध्ये डासांचा शिरकाव होऊ लागतो. तेव्हा संध्याकाळ झाल्यावर जाळी नसणारी दारे-खिडक्या घट्ट बंद करून घ्या. त्यांमध्ये कोणत्याही प्रकारची फट राहू नये यासाठी तुम्ही दारे-खिडक्यांना लावण्यासाठी स्पंजच्या स्ट्रिप्सचा उपयोग करू शकता.
संध्याकाळच्या वेळेत डास सर्वांत जास्त आक्रमक असतात. त्यामुळे वेळेत खिडक्या बंद केल्यास उपयोग होऊ शकतो.
हेही वाचा : Hair care : केसगळतीवर ‘या’ आयुर्वेदिक औषधी ठरतील उपयुक्त! पाहा त्यांचे वापर अन् फायदे….
२. उघड्या जागी पाणी साचू देऊ नका
पाणी आणि डबके असणाऱ्या वा अडगळीच्या ठिकाणी डास आपली अंडी घालतात. त्यामुळे वातानुकूलन यंत्र, पाण्याचे ड्रम, टाकी, पसारा असलेली खोली, अडगळीची खोली अशी कितीतरी ठिकाणे डासांना वास्तव्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. घरात डास होऊ नये यासाठी सर्व अनावश्यक ठिकाणी साचून राहिलेले पाणी ओतून टाकावे. पाणी भरलेली जागा स्वच्छ करून कोरडी करावी. शक्य असल्यास पाणी झाकून ठेवा.
३. पसारा टाळून स्वच्छता ठेवा
ज्या ठिकाणी धूळ आणि अडगळ आहे अशा जागा वेळोवेळी आवरून आणि झाडून साफ करा. घरात किंवा खोल्यांमध्ये पसारा होऊ देऊ नका. शक्य झाल्यास वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी आवरून ठेवा. घर स्वच्छ असल्यास डासांचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
४. डासांपासून संरक्षण करणारी रोपे लावावीत
घरामध्ये किंवा तुम्ही जिथे काम करता, त्या टेबलावर लहान आकाराची आणि डासांपासून सुरक्षा देणारी रोपे ठेवली तरी त्याचा उपयोग होऊ शकतो. रोजच्या वापरातील अशी अनेक रोपे आहेत; जी घरास डासमुक्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यातील काही रोपे ही केवळ डासच नाही तर, उंदीर किंवा इतर कीटकांना पळविण्यासाठीही फायदेशीर ठरू शकतात. घरातील डासांना पळवून लावण्यासाठी तुळस, झेंडू, गवती चहा व सिट्रोनेला [citronella] यांसारखी रोपे लावू शकता.
५. लिंबू आणि लवंग यांचा वापर करा
ही युक्ती मध्यंतरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. इंडिया टुडे डॉट इनच्या एका लेखानुसार, डासांना लवंग आणि कोणत्याही लिंबूवर्गीय पदार्थाचा वास अजिबात आवडत नाही. त्यामुळे घरातील डास पळवून लावण्यासाठी लिंबू चिरून, त्यामध्ये काही लवंग खुपसून ठेवा. एका प्लेट वा ताटलीमध्ये ही लवंग लावलेली लिंबे ठेवून, ते ताट घरातील कोपऱ्यांमध्ये किंवा तुम्हाला हव्या असणाऱ्या ठिकाणी ठेवा. लिंबू आणि लवंगाच्या वासाने घरातील डास बाहेर जाण्यास मदत होऊ शकते.
६. डासांसाठी लसणाचा घरगुती स्प्रे
बाजारात डास मारण्यासाठी वा त्यांना घालविण्यासाठी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. मात्र, त्यांमध्ये भरपूर प्रमाणात रसायने आणि घातक घटकांचा वापर केला जातो; ज्यामुळे घरातील सदस्यांना त्यांचा त्रास होऊ शकतो. मात्र, स्वयंपाकघरात अशी एक गोष्ट आहे; जिचा वापर करून तुम्ही अगदी झटपट डासांचा स्प्रे बनवू शकता.
त्यासाठी आपल्याला केवळ लसणाची मदत लागणार आहे. काही लसूण पाकळ्या घेऊन, त्यांना बारीक ठेचून, पाण्यामध्ये काही मिनिटे उकळून घ्या. आता हे पाणी एका स्प्रे बाटलीमध्ये भरून ठेवा आणि घरात सगळीकडे स्प्रे करून घ्या. त्यामुळे डास पटापट घरातून बाहेर जातील.
लसणामध्ये अनेक असे घटक असतात; जे डासांसाठी हानिकारक असू शकतात. त्यामुळे लसणाचे पाणी घरभर शिंपडल्यानंतर डास नाहीसे होतात आणि लसणीचा वासदेखील येत नाही.
७. साबणाचे पाणी वापरणे
तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण साबणाचे पाणीदेखील डासांना घालविण्यासाठी फायदेशीर ठरू शकते, असे इंडिया टुडे डॉट कॉमच्या एका लेखावरून समजते. त्यासाठी एका बाऊलमध्ये साबणाचा फेस होईपर्यंत साबणाचे पाणी तयार करून घ्यावे. डास हे पाण्याकडे आकर्षित होतात. साबणाच्या पाण्याजवळ डास आल्यानंतर, साबणाच्या गुळगुळीतपणामुळे ते बाऊलमध्ये पडून राहतील.
अशा झटपट उपायानेसुद्धा तुम्ही तुमचे घर डासांपासून सुरक्षित ठेवू शकता.
८. बीअर किंवा मद्याचा वापर करा
तुमच्या घरामध्ये मद्य किंवा बीअर उपलब्ध असल्यास, त्यांचाही उपयोग घरातील डास नाहीसे करण्यासाठी होऊ शकतो. डासांना लिंबू आणि लवंगाप्रमाणेच मद्याचा वासदेखील सहन होत नाही. त्यामुळे एका ताटलीत किंवा बाऊलमध्ये थोडेसे मद्य ओतून, तुम्हाला हव्या असणाऱ्या ठिकाणी ठेवून द्या. या पदार्थांचा वास येताच घरातील डास नाहीसे होण्यास मदत होऊ शकते. अशा साध्या, सोप्या आणि उपयुक्त अशा टिप्सची माहिती इंडिया टुडे डॉट कॉमच्या एका लेखावरून मिळाली आहे.