भारतात आतापर्यंत लाखो लोक कोविड -१९ वर यशस्वीरीत्या मात करून घरी परतले आहे. योग्यवेळी औषधोपचार, सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर करोनाशी मात करत त्यांनी विजय मिळवला आहे. आता करोनातून बरे होऊन घरी आलेल्यांची खरी लढाई सुरु होते ती म्हणजे पूर्ववत आयुष्य जगण्याची. पुन्हा नव्याने उमीद घेऊन जगण्याची, म्हणून शारीरिक आरोग्य सोबत मानसिक आरोग्य चांगलं ठेवणे महत्वाचं आहे.
रुग्णालयातून घरी आल्यानंतर करा व्यायाम:
व्यायामामुळे श्वास घेण्यास होणारा अडथळा कमी होतोआणि स्नायू मजबूत होण्यास मदत होते. त्याचबरोबर मानसिक ताणही कमी होतो. योग्य पद्धतीने व्यायाम केल्याने आत्मविश्वास वाढतो. दरम्यान रुग्णालयात ऑक्सिजनवर ठेवण्यात असलेल्या रुग्णाने व्यायाम करताना आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला सोबत ठेवावे. व्यायाम करताना त्रास झाला तर तात्काळ डॉक्टरांना माहिती द्यावी.
सोपे व्यायाम:
खांदे पुढे-मागे रोल करावेत. उभं राहून किंवा खुर्चीवर बसून डाव्या आणि उजव्या बाजूस थोडं वाकावं. पाय गुडघ्यात वाकवून उचलण्याचा प्रयत्न करावा. याला ‘वॉर्मअप’ असं म्हणतात.
थोडे कठीण व्यायाम
ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या उपचारांनी करोनातून उपचार घेऊन आलेल्या रुग्णाला औषध, इंजेक्शन यांची शक्ती शरीरात अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात शरीरात ताकद राहत नाही या करीता जागच्या जागी चालण्याचा प्रयत्न करावा. बाहेर चालताना शक्यतो सपाट जमीन असेल त्याठिकाणी चालावं. हळूहळू चालण्याचा वेग आणि अंतर वाढवावं.
श्वास कसा घ्यावा?
एका ठिकाणी शांत बसावं. एक हात छातीवर आणि दुसरा पोटावर ठेवून डोळे बंद करून शांत बसावं. नाकाने हळूवार श्वास घ्यावा आणि तोंडाने सोडावा. नाकाने श्वास घेण्यास अडथळा होत असेल तर तोंडाने श्वास घ्यावा. शक्यतो श्वास हळूवार घेण्याचा प्रयत्न करावा.
“करोना व्हायरसमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे कोव्हिडमुक्त रुग्णांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ब्रिदिंग एग्झरसाइज, प्राणायाम, ब्रिस्क वॉकिंग फार महत्त्वाचं आहे. रुग्णालयातून घरी गेल्यानंतर स्वत:च्या तब्येतीवर वेळोवेळी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. चालताना, काम करताना श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करावा.
मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवावं?
करोनामुक्त झालेल्यांमध्ये फुफ्फुसांना इजा होण्याचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे या पुढे करोनातून बरे झाल्यानंतर फुफ्फुसांना इजा झालेल्या रुग्णांसाठी पुनर्वसन फार महत्वाचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आजारानंतरचा ताणतणाव व चिंताग्रस्तता यावर मात करणं हा देखील आजारातून बरं झाल्यानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी, कोव्हिडमुक्त रुग्णांनी पुरेशी झोप घ्यावी. सकस, योग्य आणि पौष्टिक आहार घ्यावा. अॅक्टिव्ह राहावं ज्यामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. लोकांशी बोलावं, मन शांत होण्यासाठी गाणी ऐकावीत, वाचन करावं. ब्रेन एक्सरसाइज करावेत जेणेकरून स्मृती वाढवण्यास मदत होईल.
कोविड-19 शी झुंज दिलेल्या रुग्णांमध्ये व्यायामाचा ताण सहन न होणे, झोपेचं वेळापत्रक बिघडणे, स्नायूंची हानी, भूक न लागणे असे लक्षणीय बदल आढळून आले आहे. नैराश्य, निद्रानाश यासारखे न्यूरोसायकियॅट्रिक परिणाम गंभीर आहेत. त्यामुळे करोनातून बरे होऊन आलेल्या व्यक्तींनी लगेच व्यायाम करणे टाळावे . शक्यतो साधा सोपा व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच व्यायाम करावा.