थंडीचा जोर राज्यभरात वाढला आहे. या थंडीमुळे सर्दी खोकला आणि त्यानंतर ताप येतो. कोणत्याही ऋतूमध्ये आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांनाच तापाचा त्रास जाणवतो. अशावेळी डॉक्टरांकडे जाणे हा उपाय तर असतोच पण त्याचवेळी काही घरगुती उपाय करुन पाहिल्यास शरीराचे वाढलेले तापमान कमी होण्यास मदत होते. पाहुयात काय आहेत हे घरगुती उपाय….
१. पुदिना आणि आल्याचा काढा कुठल्याही प्रकारच्या तापावर उपयुक्त ठरतो. त्यामध्ये मेथी आणि मध घालूनही आपण घेऊ शकतो.
२. तुळशीच्या पानांचा काढा तयार करून त्यात वेलची पूड आणि साखर घालून प्यायल्याने ताप लवकर उतरतो
३. थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्लाने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप उतरतो.
४. जर सर्दी, ताप, थंडी आणि अंग दुखत असेल तर दालचिनीचा तुकडा, सुंठीचा तुक़डा, लवंग, गवती चहा पाण्यात एकत्र करून दिवसातून दोन वेळा घेतल्याने ताप कमी होतो.
५. बेलफळाचं चूर्ण पाण्यात घालून घेतल्याने त्याचा ताप उतरण्यासाठी उपयोग होतो.
६. तापात मनुके खाणे उपयुक्त असते. २० ते २५ मनुके पाण्यात भिजत घालावेत. ते कुस्करून त्यात लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा घ्यावे.
७. आहारात सफरचंद, खिचडी, टोमॅटो सूप, आलं, लसूण, काळी मिरी, शेवगा, कारली या पदार्थांचा समावेश करावा.
८. कपभर उकळत्या पाण्यामध्ये मूठभर ताजी तुळशीची पानं टाका. हे मिश्रण ५ ते १० मिनिटे चांगले उकळू द्या. मिनिटे उकळू द्या. ते गाळून दिवसातून दोनदा प्या. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांसाठी हा काढा फायदेशीर ठरतो. यामुळे ताप कमी होतो.
९. तापामध्ये भरपूर पाणी पिणं फायदेशीर ठरतं. यासोबत संत्र्यांचा रस घेतल्यानेही तापावर आराम मिळतो.
(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)