आपल्यापैकी अनेकांना पाऊस खूप आवडतो. काहींना पावसात चिंब भिजायला आवडतं तर काहींना कपभर चहाबरोबर घराच्या खिडकीतून तो मनसोक्त न्याहाळायला आवडतो. मात्र, सुंदर वातावरणासह हाच पावसाळा स्वतःबरोबर डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, कॉलरा, डायरिया, ताप आणि सर्दी हे काही आजार देखील घेऊन येतो. म्हणूनच या ऋतूत स्वतःची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं.आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात FSSAI च्या मते, “पावसाळ्यात रोगांचा धोका वाढतो. विशेषतः या काळात खाद्यपदार्थांमुळे अनेक आजार होण्याची शक्यता वाढते.” त्यामुळे, सद्यस्थितीत असलेला करोनाचा धोका आणि पावसाळा असा दोन्ही गोष्टी लक्षात आपण आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. FSSAI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमार्फत पावसाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? यासाठी खालीलप्रमाणे काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.

(Photo : Pixabay)

FSSAI ने दिल्या ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

  • स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी भाज्या, अन्य आवश्यक पदार्थ स्वच्छ धुवून घ्या.
  • स्वत: सह आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा.
  • स्वयंपाकासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करा.
  • नेहमी ताजं अन्न खा आणि पदार्थ आवश्यकतेनुसार शिजवा.
  • सूक्ष्मजंतूंची वाढ टाळण्यासाठी उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवा.
  • उरलेलं अन्न खाण्यापूर्वी पुन्हा व्यवस्थित गरम करून घ्या.
  • दूध आणि दही यांसारखे नाशवंत पदार्थ नेहमी फ्रिजमध्येच ठेवा.
  • ताज्या आणि विशेषतः आपल्याकडे पिकणाऱ्या स्थानिक अन्नधान्य आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.
  • आपल्या जेवणात मिरपूड, आलं-लसूण, जिरे, धणे आणि हळद यांचा आवर्जून समावेश करा. हे सर्व पदार्थ आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवतात आणि पावसाळ्यात होणाऱ्या बर्‍याच आजारापासून आपलं संरक्षण करतात.

तर यंदाच्या पावसाळ्यात या काही अगदी साध्या-सोप्या गोष्टी लक्षात ठेवून स्वतःची आणि तुमच्या जवळच्या माणसांची योग्य काळजी घ्या, निरोगी राहा!