parenting tips : आपली मुलं मोठी होऊन कशी वागतात, त्यांचा स्वभाव कसा असेल, ते कुठलं करिअर निवडतील हे सगळं त्यांच्या संस्कारांवर, त्यांच्या पालन पोषणावर अवलंबून असतं. मोठेपणी आपल्या मुलाने एक उत्तम व्यक्ती बनावं म्हणून आई-वडील आपल्या बाळाला लहानपणापासूनच चांगल्या सवई लावत असतात. त्यांच्यावर योग्य ते संस्कार करत असतात. पण, याउलट त्यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर ती प्रचंड हट्टी, निरस आणि चिडचिडी बनतात. सध्या आई-वडील दोघेही कामावर जात असल्याने त्यांना पूर्णवेळ घरात लक्ष देता येत नाही. म्हणूनच आत्ताच्या संगोपनामध्ये व पूर्वीच्या संगोपनामध्ये भरपूर तफावत असल्याचे दिसते. मॉडर्न पद्धतीने आपल्या मुलांना चांगल्या सवई कशा लावाव्या याच्या काही सोप्या टिप्स पाहा.
मॉडर्न पेरेंटिंग टीप १ – मुलांसाठी वेळ काढा
आई-वडिलांनी आपल्या मुलांना वेळ देणं हे अत्यंत महत्वाचं असतं. मुलांनादेखील आई-वडील आपल्यासाठी वेळ काढतात ही गोष्ट महत्वाची वाटते. त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्या सोबत संवाद साधा, त्यांचे विचार ऐका व आपले विचार त्यांना सांगा.
हेही वाचा : विश्लेषण : पुरुषांसाठीचे गर्भनिरोधक इंजेक्शन कितपत फायदेशीर? विपरीत परिणाम कोणते?
टीप २ – नियम हे हवेच.
बऱ्याचदा मुलं आपल्या पालकांचं न ऐकता आपली मनमानी करायला लागतात, हट्टी बनतात. असा स्वभाव लहान मुलांमध्ये जास्त दिसून येतो. अशावेळी त्यांच्या या वागण्याला आळा घालण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी काही नियम तयार केले पाहिजे.
टीप ३ – अति लाड नको
नव्या युगातील पालक आपल्या मुलांचे सगळे लाड पुरवतात. पण, हे लाड अति होत नाहीत ना याची खात्री करा. कारण मुलांचं सतत ऐकल्याने त्यांना कोणाचाही धाक राहत नाही. त्यामुळे मोठे झाल्यानंतर जेव्हा बाहेरच्या जगात त्यांना साधारण वागणूक मिळते तेव्हा त्यांना काय करावं हे समजत नाही.
टीप ४ – तुम्हीच आहात मुलांचा खरा आदर्श
लहान मुलं आपल्या पालकांचं अनुकरण करतात. म्हणून तुम्ही जे त्यांना सांगताय तेच तुम्हीदेखील करत आहात की नाही हे एकदा बघा. त्यांना चांगल्या सवई लावताना तुम्हीसुद्धा त्या फॉलो करा, तरच तुम्ही त्यांचे खरे आदर्श बनाल.
टीप ५ – स्वतःची युनिक पॅरेंटिंग स्टाईल असूद्या
पालकांनो, प्रत्येक मूल हे वेगळं असतं, त्यामुळे इतर पालक जर एका पॅरेंटिंग स्टाईलचा वापर करत असतील तर तीच तुम्हीसुद्धा वापरावी हे गरजेचं नाही, हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कोणाच्याही इन्फ्ल्यूएंसमध्ये न येता आपल्या मुलांना काय आवडतंय याचा विचार करून त्यांना वळण लावण्यासाठी तुमची एक युनिक पद्धत ठरवा.