ती भांडते, ती ओरडते, रक्षाबंधनाला तर पार लुटतेच पण तितकीच सावरते, प्रसंगी आई होते, वेळेला मैत्रीण होते, भाऊबीजेला आठवणीने गिफ्ट आणते.. जगात बहुतांश भाऊ बहिणीचं नातं हे असंच असतं. तुझं माझं जमेना आणि तुझ्याविना करमेना! अशा सगळ्या बहिणींसाठी यंदा रक्षाबंधनाच्या आधीच लाड करून घेण्याचा हक्काचा दिवस येत आहे. भारतात ७ ऑगस्ट रोजी सिस्टर्स डे साजरा केला जातो. आपण आजवर मदर्स डे, फादर्स डे अगदी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड डे विषयी देखील ऐकले असेल पण अनेकांना अजूनही सिस्टर्स डे विषयी माहिती नसते. कदाचित बहिणाबाईंना सुद्धा याची कल्पना नसावी, त्यामुळेच या खास दिवशी तुम्हीही तुमच्या बहिणीसाठी खास काहीतरी प्लॅन करून त्यांना रक्षाबंधनाच्या आधीच छान सरप्राईझ देऊ शकता.
भारतात सिस्टर्स डे 2022 कधी ?
भारतात सिस्टर्स डे 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. याच दिवशी भारतात फ्रेंडशिप डे देखील साजरा होणार आहे. त्यामुळे प्रसंगी तुमचा ब्रो, तुमची अगदी बेस्ट फ्रेंड होणाऱ्या बहिणीला खुश करायला विसरू नका. केवळ भारतातच नव्हे तर अनेक पाश्चिमात्य देशात सिस्टर्स डे साजरा करण्याची पद्धत आहे. भावंडांमध्ये शक्यतो कितीही प्रेम असलं तरी प्रेमाने बोलणं फार कमीच होतं त्यामुळे या अशा दिवशी एखादं छान सरप्राईज देऊन तुम्ही बहिणीला एक सुखद धक्का देऊ शकता.
सिस्टर्स डे असा करता येईल खास
- तुमच्या बहिणीला एखादं छान गिफ्ट देऊ शकता, गिफ्ट महाग असण्याची गरज नाही पण तुमच्या बहिणीच्या आवडीचं असावं.
- पॅकेज गिफ्ट किंवा हॅम्पर हा ट्रेंड बराच सोयीचा पडतो.
- तुमची बहीण फूडी असेल तर तिच्या आवडीचे पदार्थ एकत्र घेऊन देऊ शकता.
- तिला फॅशनची आवड असेल तर इअररिंग्स, नोज रिंग, अंगठ्या, किंवा ब्रेसलेट असे सोपे पर्याय तुम्ही एकत्र करून देऊ शकता. पुस्तक प्रेमी बहिणीला शक्यतो पुस्तकाची हार्डकॉपी घेऊन देऊ शकता.
या सगळ्या पलीकडे जर तुम्हाला शक्य असेल तर प्रत्यक्ष समोर उभं राहून किंवा एखाद्या पत्रातून बहिणीच्या प्रति वाटणाऱ्या भावना व तिचं आपल्या आयुष्यातील स्थान यावर व्यक्त होऊ शकता. तुम्हाला सगळयांना सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा!