Natural Skin Care: सौंदर्याचा विचार करताना त्वचेची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. त्वचा तजेलदार असेल तरच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसते. त्वचेचे सौंदर्य कसे साधावे याचे रहस्य अनेकींना माहीत नसतं. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक दिसावी, यासाठी शरीराला तसंच त्वचेला ‘व्हिटॅमिन सी’चा पुरवठा होणे आवश्यक आहे. डाळिंब हे ‘व्हिटॅमिन सी’ चे उत्तम स्त्रोत असलेले फळ आहे. यामुळे त्वचेमध्ये कोलेजन तयार होण्यास मदत मिळते. आपल्या आहारामध्ये जितक्या जास्त प्रमाणात डाळिंबाचा समावेश कराल, तेवढा तुमच्या त्वचेवर नॅचरल ग्लो दिसेल. डाळिंबामध्ये अँटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आहेत. ज्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्यांची समस्या निर्माण होत नाही. नितळ आणि सुंदर त्वचेसाठी तुम्ही डाळिंबाचा घरगुती उपाय म्हणून देखील वापर करू शकता.
डाळिंबाचा रस –
डाळिंबात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते, जे वृद्धत्वाची समस्या कमी करण्यास मदत करते. त्यामुळे सुरकुत्या कमी होऊ शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही सुरकुत्या दूर करायच्या असतील तर डाळिंबाच्या रसाचा आहारात समावेश करू शकता. यामुळे तुमची त्वचा आतून चमकदार आणि तरुण आणि निरोगी दिसेल.
डाळिंबाचे तेल –
त्वचा सुंदर आणि हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही डाळिंबाचे तेलही वापरू शकता. डाळिंबाचे तेल लावल्याने सुरकुत्याची समस्या सहज दूर होऊ शकते. हे तेल चेहऱ्यावरच्या बारीक रेषा कमी करण्यास देखील मदत करते. याशिवाय, त्यातील गुणधर्मांमुळे ते त्वचेला पिंपल्सपासून वाचवतात.
हेही वाचा – Video: नातवाला मारलं म्हणून सुनेची सासूला बेदम मारहाण, मुलगा मात्र व्हिडीओ बनवण्यात व्यस्त
डाळिंबाच्या बिया –
तुम्ही डाळिंबाच्या बिया घालून स्क्रब तयार करू शकता. त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने डेड स्किन नष्ट होते. डाळिंबाच्या बियांचे स्क्रब बनवण्यासाठी तुम्हाला फक्त डाळिंबाचे दाणे बारीक करावे लागतील. त्यात थोडे गुलाबजल टाका आणि नंतर चेहऱ्याला लावा. काही वेळाने थंड पाण्याने हळूवारपणे चेहरा स्वच्छ करा. तुम्हाला तुमच्या त्वचेत नैसर्गिक चमक दिसेल.