कामाचा ताण, अपुरी झोप, जागरण सतत होणारा फोनचा [स्क्रीन] वापर अशा कितीतरी कारणांमुळे आपल्या डोळ्याखाली मोठी आणि दिवसेंदिवस गडद होत जाणारी अशी काळी वर्तुळं आलेली असतात. चेहऱ्यावरील काळपटपणा घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो, स्क्रब करतो. मात्र डोळ्यांखालील भाग तसा नाजूक असल्याने आपण डोळे आणि डोळ्याखालील भागावर शक्यतो स्क्रब करत नाही.
मात्र आपल्या स्वयंपाकघरात असणाऱ्या कॉफीच्या साहाय्याने तुम्ही डोळ्याखालील काळ्या वर्तुळांना घालवू शकता. घरगुती, साधा-सोपा असा आय मास्क बनवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि तो कसा वापरायचा याच्या टिप्स पाहा.
काळ्या वर्तुळांसाठी घरगुती आय मास्क
साहित्य
एक चमचा कॉफी
१/४ कप कोमट पाणी
२ बर्फाचे खडे/तुकडे [आईस क्युब्स]
कापूस/गोल कॉटर्न पॅड्स
हेही वाचा : Lip care: सगळे विचारतील तुमच्या ‘नाजूक गुलाबी’ ओठांचे रहस्य!! या सोप्या नऊ टिप्स वापरून पाहा….
कृती
एका छोट्या वाटीत किंवा बाऊलमध्ये एक चमचा कॉफी घेऊन, त्यामध्ये कोमट केलेले १/४ कप पाणी मिसळून घ्या. काही मिनिटांसाठी हे मिश्रण तसेच झाकून मुरण्यासाठी ठेऊन द्या. आता यामध्ये बर्फ़ाचे खडे घालून सर्व मिश्रण थंड करून घ्या. आपले आय मास्कचे मिश्रण तयार आहे.
वापर
कात्रीच्या साहाय्याने कॉटर्न पॅड्स अर्धगोलाकार कापून घ्यावे. आता कापलेले कॉटर्न पॅड्स तयार कॉफीच्या मिश्रणामध्ये बुडवून, बोटांनी हलके पिळून त्यामधील अतिरिक्त कॉफी मिश्रण काढून टाका. कॉफीमध्ये भिजवलेला हा कॉटर्न पॅड्सचे तुकडे डोळ्याखालील काळ्या वर्तुळांवर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. तुम्ही असे करण्यासाठी कापूस किंवा टिशू पेपरचादेखील वापर करू शकता.
दररोज या आय मास्कचा वापर केला तरीही चालणार आहे.
फायदा
कॉफीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. त्यासोबतच यांमध्ये अँटी-एजिंग घटक असतात जे तुमच्या त्वचेला तुकतुकीत ठेवण्यास उपयुक्त असतात. परंतु तुम्ही या आय मास्कचा वापर केवळ एक-दोनदा केलात आणि ताबडतोब उपयोग झाला आहे कि नाही हे पाहिलत, तर तुम्हाला फारसा फरक दिसणार नाही. तुमच्या वापरात सातत्य असेल तरंच काही काळानंतर आपोआप तुम्हाला फरक जाणवू लागेल.