डोक्यावरचे काळेभोर, दाट, लांबसडक केस म्हणजे स्त्री सौंदर्याचं एक लक्षण मानलं जातं. डोक्यावर असे सुंदर केस असणं म्हणजे दैवी देणगीच वाटते. स्त्री असो किंवा पुरूष प्रत्येकालाच असे केस हवेहवेसे वाटतात. पण शरीरावरील अनावश्यक केस मात्र एक मोठी समस्या असते. शरीराच्या इतर भागांवरही केसांमुळे सौंदर्य कमी होतं. पुरुषांच्या चेहऱ्यावर केस असतील तर दाढी मिशी म्हणून ते त्यांना शोभतही. पण स्त्रीयांच्या बाबतीत मोठी अडचण होते. मग असे केस घालवण्यासाठी स्त्रीयांचा हेअर रिमुव्ह क्रीम्सकडे जास्त कल असतो. पण हा पर्याय समाधानकारक तर नसतोच पण त्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही होतो. म्हणून तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही खास घरगुती उपाय…
लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांना सलूनला जाता आलं नाही. त्यामूळे या काळात लोक आपोआप स्वत: हून घरी उपाय करण्याकडे वळले आहेत. हाता-पायांवर, चेहऱ्यावर , मानेवर तसेच छातीवर वाढणाऱ्या केसांना काढण्यासाठी ‘वॅक्सिंग’ सारख्या अत्यंत त्रासदायक पद्धतीचा वापर केला जातो. मात्र अंगावरील अनावश्यक केसांपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरच्या घरीच काही सोपे उपाय शक्य आहेत.
कॉस्मेटोलॉजिस्ट डॉ. गीतिका मित्तल गुप्ता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही खास टिप्स शेअर केल्या आहेत. अंगावर अनावश्यक केसांची वाढ यासारख्या समस्येला सामोरे जाताना काय करावे आणि काय करू नये याबाबत त्यांनी या पोस्टमध्ये मार्गदर्शन केलंय. यात त्यांनी सांगितलं की, “जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर वाढलेले केस घालवायचे असतील तर त्यासाठी किती त्रासदायक आणि कधीकधी वेदनादायक उपाय असतात, हे तुम्हाला माहितीच आहे.” पण या वेदनेशिवाय तुम्ही अनावश्यक केस घालवू शकता. यासाठीचे काही उपाय खालीलप्रमाणे:
१. फेश वॉश, स्क्रबच्या मदतीने आठवड्यातून दोनदा आपली त्वचा एक्सफोलिएट करा.
२. आठवड्यातून एकदा केमिकल एक्सफोलियंटने त्वचा एक्सफोलिएट करा.
३. त्वचा साफ केल्यानंतर नेहमी मॉइश्चराइझ करून घ्या.
४. जर तुम्ही दाढी किंवा वॅक्स करत असाल तर नेहमी कोमट पाण्याने त्वचा ओली करा. केस वाढत आहेत त्या दिशेने वॅक्स किंवा दाढी करा.
५. जर तुम्ही दाढी किंवा वॅक्स करत असाल तर त्याऐवजी लेसर हेअर रिमुव्हच्या पर्यायाचा वापर करा.
६. अनावश्यक वाढलेले केस घालवण्यासाठी आधी सुरूवातील डॉक्टरांना भेटा.
७. तात्पुरते अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी तुम्ही पॉमिस दगडाचा वापर करू शकता. शरीरावर हा दगड घासल्याने केस मूळापासून निघण्यास मदत होते. यामुळे सारेच केस निघत नसले तरीही त्यांची वाढ कमी होण्यास मदत होते.
८. चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढून टाकण्यासाठी साखर आणि लिंबाचा पॅक वापरावा . लिंबातील सौम्य ब्लिचिंग क्षमते मुळे केसांची वाढ रोखण्यास मदत होते.