हल्ली माणसांच्या दिसण्यावरुनच त्यांचं व्यक्तिमत्त्व ठरवलं जातं. शरीराची उंची, जाडी आणि महत्त्वाचे म्हणजे त्वचा निरखून पाहिली जाते. त्यामुळे त्वचेची काळजी घेणे सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी गरजेचं आहे. पण प्रत्येक व्यक्तीच्या त्वचेचा प्रकार वेगळा असतो. त्यात जर तुम्ही जर वर्कआऊट, व्यायाम करत असाल तर वर्कआऊटचा तुमच्या शरीर आणि मनावर सारखाच परिणाम होत असतो. कारण यामुळे घामावाटे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात ज्यामुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभते. पण याचा तुमच्या त्वचेवर काय परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का ? कारण तुम्ही व्यायाम करता तेव्हा तुमच्या त्वचेवर घामाचा खूप थर जमा होत असतो. या घामामुळे तुमच्या त्वचेवरील पोअर्स बंद होण्याची शक्यता असते.
म्हणूनच व्यायामानंतर त्वचा योग्य पद्धतीने स्वच्छ करणं आवश्यक आहे. मात्र व्यायाम केल्यामुळे तुमचा ताणतणाव कमी होतो ज्याचा चांगला परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसू लागतो. पण काहिही असलं तरी व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर त्वचेची योग्य काळजी घ्यायलाच हवी. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत अशा काही सोप्या टिप्स फॉलो करत आहोत. ज्या तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटिनमध्ये जरूर समाविष्ट करू शकता.
वर्कआऊट करण्यापूर्वी मेकअप करू नका –
वर्कआऊट करताना त्वचेचे पोअर्स मोकळे होत असतात. अशावेळी या पोअर्सच्या माध्यमातून तुमचा मेकअप त्वचेच्या खोलवर जाऊन सेट होऊ शकतो. असं झाल्यास पिंपल्स, तेलकट त्वचा अशा अनेक त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. शिवाय वर्कआऊट करताना तुमच्या त्वचेला ऑक्सिजनचा पूरवठा या पोअर्सच्या माध्यमातून होत असतो. मात्र मेकअपमुळे तुमच्या त्वचेचे पोअर्स बंद राहतात आणि त्वचेला ऑक्सिजनचा पूरवठा कमी होतो. तुम्हाला अगदीच बिनामेकअप जीममध्ये जाणं शक्य नसेल तर चेहऱ्यावर मॉईस्चराईझर अथवा सनस्क्रीन लावा
चेहऱ्याला वारंवार स्पर्श करू नका –
व्यायामादरम्यान चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे टाळावे. कारण जिम करताना प्रत्येकजण एक्सरसाइज मशीनला हात लावतो. अशा वेळी तुम्हाला इन्फेक्शनचा धोका असू शकतो. त्यामुळे व्यायामा दरम्यान चेहऱ्यावर हात ठेवू नका.
हेही वाचा – दुधी भोपळ्याचे सेवन करताना कोणती काळजी घ्यावी, ते कसे करावे? जाणून घ्या, काय सांगतात डॉक्टर…
वर्कआऊटनंतर चेहरा स्वच्छ धुवा –
ही एक अतिशय सोपी आणि पटकन करण्यासाठी युक्ती आहे. व्यायाम झाल्यावर लगेचच तुमचा चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील घाम आणि त्यातून निर्माण होणारे जीवजंतू नष्ट होतील. व्यायामानंतर यासाठीच अंघोळ करणं फार गरजेचं आहे. पण तुमची जीम घरापासून फार दूर असेल तर घरी जाऊन अंघोळ करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुण्यास विसरू नका.